शाळेच्या मदतीसाठी ‘भस्मासुराचा वध’!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

नालासोपारा/वसई -  जिल्हा परिषद शाळेला मदत करायची जिद्द आणि त्यासाठी धडपड करीत वेंगुर्ले येथील विद्यार्थी विरारमध्ये पोचले. त्यांनी ‘भस्मासुराचा वध’ हे दशावतारी नाटक सादर करून निधी जमा केला. त्यांच्या या उपक्रमाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

नालासोपारा/वसई -  जिल्हा परिषद शाळेला मदत करायची जिद्द आणि त्यासाठी धडपड करीत वेंगुर्ले येथील विद्यार्थी विरारमध्ये पोचले. त्यांनी ‘भस्मासुराचा वध’ हे दशावतारी नाटक सादर करून निधी जमा केला. त्यांच्या या उपक्रमाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील अणसूर गावात पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची मराठी शाळा आणि एक इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत फक्त १९ विद्यार्थी आहेत. गोरगरीब कुटुंबांतील मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेणे परवडत नाही. दुसरी शाळा २० ते २५ किलोमीटर अंतरावर आहे. आपली शाळा बंद पडली तर काय, असा प्रश्‍न या विद्यार्थ्यांना भेडसावत होता. या पार्श्‍वभूमीवर शाळेतील माजी विद्यार्थिनी प्रार्थना हळदणकर यांनी पुढाकार घेऊन १५ विद्यार्थ्यांसह ‘भस्मासुराचा वध’ हे दशावतारी नाटक बसवून शाळेसाठी निधी उभारण्याचे ठरवले.

या मुलांनी विरारमधील नगरसेवक प्रशांत राऊत आणि अजीव पाटील यांच्याकडे मदतीची मागणी केली. त्यानुसार बहुजन विकास आघाडी पुरस्कृत श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळाच्या वतीने विरार पूर्वेकडील मनवेलपाडा या ठिकाणी रविवारी (ता. २२) या दशावतारी नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. या वेळी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, तसेच मनवेलपाडा, कारगील नगर परिसरातील ५०० हून अधिक नागरिकांसह बविआचे अध्यक्ष तथा आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर उपस्थित होते. या कलाविष्काराला विरारवासीयांनी भरभरून दाद दिली. राऊत यांच्या श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळाने ५१ हजार रुपयांचा धनादेश दिला. त्याचप्रमाणे आणखी ५० हजार रुपयांची रक्कम जमा झाली. 

समाजप्रबोधन, जनजागृतीसाठी सर्वांनी मदत केली पाहिजे. शाळेसाठी निधी उभारण्याच्या हेतूने ही मुले गावोगावी कला सादर करत आहेत. हे कार्य कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिलेच पाहिजे.
- हितेंद्र ठाकूर, आमदार, वसई

मराठी माध्यमाच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. सरकारने या शाळांना मदत केली पाहिजे. ग्रामीण भागातील मुले आपली शाळा टिकण्यासाठी धडपडत आहेत. त्यांच्या ध्येयनिष्ठेतून आजच्या तरुणाईपुढे एक आदर्श उभा राहिला आहे. 
- प्रशांत राऊत, नगरसेवक, वसई-विरार 

शाळेला मिळाले पाणी...
तिसरी ते सातवीतील प्रथमेश गावडे, साहिल नाईक, देवू गावडे, राज गावडे, गौरव मेस्त्री, जयदेव गावडे, गुरुनाथ नाईक, वीर गावडे, जयेश घुबे, हर्षदा लाड व राजलक्ष्मी लाड आदींचा या पथकात समावेश आहे. या निधीतून जिल्हा परिषदेच्या शाळेचे सुशोभीकरण आणि पाणी, स्वच्छतागृह आदी कामे केली जाणार आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन कलेच्या माध्यमातून रसिकांकडून मदत मिळवण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षी या नाटकाच्या प्रयोगातून २० हजारांची रक्कम मिळाली. त्यातून शाळेसाठी जलवाहिनी टाकण्यात आली, असे मार्गदर्शक प्रार्थना हळदणकर यांनी सांगितले.

Web Title: Sindhudurg News Dashavari Drama for School fund