‘गोमेकॉत’ सिंधुदुर्गातील रुग्णांसाठी ‘डीबीए’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

दोडामार्ग - गोव्यातील गोमेकॉ अथवा जिल्हा रुग्णालयात (म्हापसा) उपचारासाठी जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांसाठी उद्यापासून डीबीए (डायरेक्‍ट बेनिफिट टू अकाउंट) योजना सुरू होत आहे. त्यामुळे भरमसाट शुल्कामुळे ग्रासलेल्या जिल्हावासीयांना दिलासा मिळणार आहे.

दोडामार्ग - गोव्यातील गोमेकॉ अथवा जिल्हा रुग्णालयात (म्हापसा) उपचारासाठी जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांसाठी उद्यापासून डीबीए (डायरेक्‍ट बेनिफिट टू अकाउंट) योजना सुरू होत आहे. त्यामुळे भरमसाट शुल्कामुळे ग्रासलेल्या जिल्हावासीयांना दिलासा मिळणार आहे.

खासदार विनायक राऊत, आरोग्यमंत्री दीपक सावंत आणि पालकमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली. तसेच दोन्ही सभागृहांत आरोग्यमंत्र्यांनी गोव्याकडून निःशुल्क बंद केल्याने दोडामार्गमध्ये सुरू असलेले जनआक्रोश आंदोलन आणि जिल्हावासीयांना न्याय देण्याची गरज, यावर चर्चा केल्याने अखेर शासनाने डीबीए योजना सुरू केली आहे. त्याबाबतचा अध्यादेश उद्या सकाळी निघणार आहे.

याबाबतची माहिती खासदार राऊत आणि पालकमंत्री केसरकर यांनी येथील आंदोलक आणि संयोजकांपर्यंत शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी आणि जिल्हा उपप्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्यामार्फत पोचवला. त्यावेळी डीबीए योजनेबद्दल चर्चाही झाली. चर्चेवेळी उपस्थित संयोजकांनी मात्र ठोस निर्णयाशिवाय आंदोलन स्थगित केले जाणार नसल्याचे सांगितले.

जिल्हावासीयांना डीबीए योजनेऐवजी उपचारच निःशुल्क व्हायला हवेत, अशी मागणी केली. तसेच येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाच्या दर्जानुसार वैद्यकीय अधिकारी, यंत्रसामग्री मिळायला हवी. तेव्हाच आंदोलनकर्ते तालुकावासीय उपोषण थांबवतील, असे स्पष्ट केले. त्यामुळे डीबीए योजनेनंतर आंदोलन थांबवायचे की पुढे चालवायचे याचा निर्णय संयोजन समिती आणि आंदोलनकर्त्यांवर राहिला आहे.
दरम्यान, खासदार राऊत यांनी गोवा आणि सिंधुदुर्गच्या उपचार खर्चासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांनी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशीही चर्चा करून प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

डीबीए काय आहे?
डीबीए योजनेअंतर्गत गोव्यातील रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या उपचार आणि औषधाचा खर्च उद्यापासून शासन करणार आहे. प्रत्येक रुग्णाचा खर्च शासन त्यांच्या खात्यावर तपशील शासनाकडे पोचविण्यासाठी मुंबई आणि गोव्यात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. याबाबतचा अध्यादेश (शासन निर्णय) उद्या निघण्याची शक्‍यता आहे.

आरोग्यमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांबद्दल नाराजी
राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत आणि जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी अद्याप आंदोलनस्थळी भेट दिली नसल्याबद्दल संयोजक आणि उपस्थित उपोषणकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्या वेळी श्री. धुरी यांनी आरोग्याचा प्रश्‍न सुटावा, यासाठी ते वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करीत आहेत. तुमच्या भावना योग्य असल्याने मी त्यांना येथे बोलावण्याचा प्रयत्न करतो; मात्र संयोजकांनी त्यांना यायचे असेल तर ठोस निर्णय घेऊन यायला सांगा, अशी मागणी केली.

 

Web Title: Sindhudurg News DBA for Sindhudurg patient Gomaco