सिंधुदुर्गात भात लागवड क्षेत्रात मोठी घट

भूषण आरोसकर
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

यंदा ६३ हजार हेक्‍टर भात लागवडीयोग्य क्षेत्रापैकी ५३ हजार हेक्‍टर क्षेत्रच लागवडीखाली असून तब्बल १० हजार हेक्‍टर क्षेत्र पडीक राहिले आहे. हे क्षेत्र फळझाड लागवडीखाली आणण्याचा प्रयत्न चालू आहे. सर्वाधिक पडीक क्षेत्र कुडाळ तालुक्‍यात ३०३० हेक्‍टर एवढे राहिले आहे.

सावंतवाडी -  जिल्ह्याच्या कृषी अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या भातपिकाच्या पडीक क्षेत्रात यंदा २ हजार हेक्‍टर क्षेत्राने वाढ झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कृषीप्रधान जिल्ह्यासाठी ही चिंताजनक बाब असून कृषी अर्थव्यवस्थेसमोर ही धोक्‍याची घंटा आहे.

यंदा ६३ हजार हेक्‍टर भात लागवडीयोग्य क्षेत्रापैकी ५३ हजार हेक्‍टर क्षेत्रच लागवडीखाली असून तब्बल १० हजार हेक्‍टर क्षेत्र पडीक राहिले आहे. हे क्षेत्र फळझाड लागवडीखाली आणण्याचा प्रयत्न चालू आहे. सर्वाधिक पडीक क्षेत्र कुडाळ तालुक्‍यात ३०३० हेक्‍टर एवढे राहिले आहे.

गेल्यावर्षी व यंदा सरासरीच्या तुलनेत भातपिकाला पुरेसा पाऊस झाला होता. दरम्यान गेल्या महिन्याच्या उत्तरार्धात झालेला पाऊस शेतकऱ्यासाठी डोकेदुखी ठरला. यावेळी कृषी विभागाकडून झालेल्या सर्व्हेक्षणात भातपिकाखाली लागवडीखाली आलेले क्षेत्राचे मोजमाप झाले. यात धक्कादायक बाब समोर आली आहे.

गेल्यावर्षी जवळपास ६८ हजार ८१० हेक्‍टर क्षेत्र भातपिकासाठी उद्दीष्ट होते. पैकी ६० हजार हेक्‍टर क्षेत्र लागवडीखाली आणण्यात आले. गेल्यावर्षी जवळपास ८ हजार हेक्‍टर क्षेत्र पड राहिले. पडीक क्षेत्राचे हे प्रमाण पुर्वीच्या क्षेत्रापेक्षा वाढीव असल्याचे सांगण्यात आले. गेल्यावर्षी कृषी विभागाला याची जाणीव असूनही भातपिक क्षेत्र वाढीसाठी फारसे प्रयत्न झाले नसल्याचे यंदाच्या आकडेवारीवरुन समजते.

यंदा शासनाने ६३ हजार ३२० हेक्‍टरवर लागवडीचे उद्दीष्ट दिले होते. पैकी फक्त ५३ हजार हेक्‍टर क्षेत्रच लागवडीखाली आणण्यात आले. म्हणजेच दिलेल्या उद्दीष्टापैकी १० हजार हेक्‍टर क्षेत्र पडीक राहिल्याचे समजते. गेल्यावर्षी ८ हजार तर यंदा जवळपास १० हजार हेक्‍टर क्षेत्र पडीक राहिल्यामुळे कृषी अर्थव्यवस्था उद्दीष्टाप्रत वाटचाल करण्यात कमी पडत असल्याचे दिसून येते. 

जिल्ह्याचा भातपिक हा येथील शेतकऱ्याचा प्रमुख व्यवसाय आहे. शेतकऱ्यांना पाऊस, रानटी प्राण्याचा उपद्रव, आर्थिक ताळमेळ, अशा अनेक समस्याना तोंड देत शेती करण्याची वेळ येते. त्यात शासनाकडून फारश्‍या आशा ठेवण्यासारखी मदतही मिळत नाही. हवालदिल झालेल्या शेतकऱ्याची भातशेतीकडे पाठ फिरत असल्यामुळेच जिल्ह्यातील पडीक क्षेत्रात वाढ होत असल्याची मोठी शक्‍यता कृषी विभागाकडूच वर्तविण्यात येत आहे.

गतवर्षीपेक्षा कृषीविभागाला शासनाकडून तब्बल ५ हजार हेक्‍टर क्षेत्र कमी उद्दीष्ट दिले होते. असे असतानाही त्यात २ हजार हेक्‍टर क्षेत्र पडीक राहणे म्हणजे कृषी विभागाचा पालथ्या घड्यावर पाणी असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. पडीक क्षेत्रात झालेली वाढ ही कृषी विभागाकडे पुर्वनियोजनाचा अभाव असल्याचे समजून येते. त्यामुळे जिल्ह्यातील भातपिक लागवडीवर दिवसेंदीवस संकटात सापडत आहे. जिल्ह्यातील कणकवली व कुडाळ तालुक्‍यात पड क्षेत्राचे प्रमाण जास्त आहे. जिल्ह्यातील या पडीक क्षेत्रावर फळझाड लागवड करण्यात येणार आहे. त्यात ९० टक्के क्षेत्र हे काजु लागवडीखाली आणण्यात येणार आहे. वेंगुर्ले व देवगड तालुक्‍यात आंब्याला प्राधान्य देण्यात आले.

संयुक्त पंचनाम्याची मागणी
गेल्या दोन महिन्यात परतीच्या पावसाने जिल्ह्यात मोठे नुकसान केले. याबाबतचा सर्व्हेक्षणाचा अहवाल कृषी विभागाच्या हाती आला नाही; मात्र प्राथमिक अंदाजानूसार ६० हेक्‍टर क्षेत्रावर नुकसानग्रस्त झाल्याचे सांगण्यात येते. या क्षेत्रात झालेल्या नुकसानीचा सयुक्त पंचनामे करण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकरीवर्गाकडून करण्यात येत आहे. गेल्या दोन महिन्यात परतीच्या पावसाने जिल्ह्यात मोठे नुकसान केले. याबाबतचा सर्व्हेक्षणाचा अहवाल कृषी विभागाच्या हाती आला नाही; मात्र प्राथमिक अंदाजानूसार ६० हेक्‍टर क्षेत्रावर नुकसानग्रस्त झाल्याचे सांगण्यात येते. या क्षेत्रात झालेल्या नुकसानीचा सयुक्त पंचनामे करण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकरीवर्गाकडून करण्यात येत आहे.

डोंगरी शेतीची जागा घेतली काजूने
जिल्ह्यात पूर्वी डोंगरी भागामध्ये नाचणीचे पीक घेतले जायचे. ठराविक क्षेत्र आलटून-पालटून हे पीक घेतले जात असे. मधल्या काळात ही डोंगरी भागातील शेती करण्याचे प्रमाण कमी झाले. आता या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात काजूची लागवड केली जात आहे. सह्याद्रीचे डोंगर काजू लागवडीखाली येत आहेत.

Web Title: Sindhudurg News decline in rice cultivation