कणकवलीचे रुपडे पालटणार

तुषार सावंत
सोमवार, 19 मार्च 2018

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात कणकवली शहराच्या मुख्य बाजारपेठेतून जाणाऱ्या फ्लायओव्हर ब्रिजमुळे शहराच्या व्यावसायिक उलाढालीचे विस्तारीकरण होणार आहे. दोन नद्यांच्या तीरावर स्थिरावलेल्या कणकवली शहराचा व्यावसायिक विस्तार महामार्गाच्या दुतर्फा वाढत जाणार आहे. याचबरोबर महामार्गावरील सध्याचे पार्कींग, तीन आसनी आणि सहा आसनी रिक्षा थांबे, खासगी वाहतूकदारांसाठी वाहनतळ आणि अवजड वाहतूकदारांसाठी वाहनतळ असे विविध प्रश्‍न सोडवायचे आव्हान असणार आहे. महामार्गाच्या एका प्रकल्पामुळे कणकवलीत काय काय स्थित्यंतरे होतील, याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न...

कणकवलीचा व्यापार विस्तार
कणकवली शहरात दीडशे वर्षांपूर्वी बाजारपेठ अस्तित्वात आली. स्वातंत्र्यानंतर बाजारपेठेचा विकास झाला. अलीकडील १५-२० वर्षांत बाजारपेठेची आर्थिक उलाढाल वाढली. लोकसंख्यावाढी बरोबरच नवे उद्योग आणि व्यवसाय उभे राहिले. शहराची लोकसंख्या १६ हजार इतकी असली तरी शहरात वास्तव्य करणाऱ्यांची संख्या २५ हजारापेक्षा अधिक आहे. याचबरोबर तालुका आणि अन्य भागातून येणाऱ्या रोजच्या नागरिकांची संख्या लक्षात घेता हा आकडा ५० हजारापेक्षा जास्त आहे. अशा अनेक मार्गांनी शहराच्या आर्थिक उलाढालीला बळ येत आहे; मात्र महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर या आर्थिक उलाढाल केंद्राचा विस्तार अजूनही वाढणार आहे. 

अतिक्रमण होणार इतिहासजमा
कणकवली शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर होणारे अतिक्रमण ही नगरपंचायत प्रशासनाची मोठी डोकेदुखी होती. महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे ही समस्या आता मार्गी लागणार आहे. एस. एम. हायस्कूलपासून नरडवे नाक्‍यापर्यंत फ्लायओव्हर ब्रीज प्रस्तावित आहे. या पुलाच्या बांधकामाबरोबरच मूळ रस्त्याचे रुंदीकरण होणार आहे. या रुंदीकरणामुळे जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील वाढलेले अतिक्रमण काढून टाकले जाणार आहे. महामार्गाच्या मध्यापासून ४५ मीटर अंतरापर्यंत कोणतेही बांधकाम किंवा कोणताही व्यवसाय करता येणार नाही. त्यामुळे सध्या महामार्गाच्या दुतर्फा ४५ मीटरच्या आत व्यवसाय करणाऱ्यांना विस्तारित महामार्गाच्या दुतर्फा आपले व्यवसाय थाटावे लागणार आहेत. 

पार्किंगचा प्रश्‍न सुटणार
राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाबरोबरच नगरपंचायतीला पार्किंगची आरक्षणे विकसित करावी लागणार आहेत. त्यामुळे पुढील पाच वर्षांत शहरातील पार्किंगचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे. शहरातून जाणाऱ्या फ्लाय ओव्हर ब्रीजच्या खालील मोकळ्या जागेत पार्कींगची सुविधा उभारता येणार आहे. यासाठी महामार्ग प्राधिकरण आणि नगरपंचायत प्रशासन यांच्या समझोता आवश्‍यक आहे. त्यामुळे नव्याने निवडून येणाऱ्या नगराध्यक्षांची मोठी जबाबदारी वाढणार आहे. 

रिक्षा थांबे हटणार
कणकवली ग्रामपंचायतीच्या कालखंडात मुंबई-गोवा महामार्गावर केवळ शहरातच तीन आसनी रिक्षांना अधिकृत थांबे देण्यात आले आहेत. महामार्गावर मुख्य चौकात दोन्ही बाजूला तीन आसनी रिक्षा उभ्या केल्या जातात. जसजशी तीन आसनी रिक्षांची संख्या वाढली तसे शहरात २० ते २५ रिक्षा थांबे वेगवेगळ्या ठिकाणी निर्माण झाले; परंतु बहुतांशी रिक्षा या महामार्गाच्या दुतर्फाच उभ्या केल्या जातात. चौपदरीकरणात अशा तीन आसनी रिक्षांचे थांबे काढून टाकले जाणार आहेत. त्यामुळे तीन आसनी रिक्षा पार्कींगचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या नव्या सत्ताधिशांना तीन आसनी रिक्षांचे प्रश्‍न सोडवावे लागणार आहेत.

सहा आसनीही अडचणीत
कणकवली हे दळणवळण केंद्र म्हणून विकसीत झाले. कणकवली बरोबरच देवगड, मालवण, वैभववाडी, कुडाळ या तालुक्‍यातील अनेक गाव कणकवली शहराला रस्त्याच्या जाळ्याने जोडले गेले. साहजिकच वाहतुकीच्या सुविधा वाढल्या. तीन आसनी रिक्षाची जागा हळूहळू वडापने घेतली होती; परंतु वडाप मागे पडून आता सहा आसनी रिक्षा धावू लागल्या आहेत. कणकवली शहरात तीन आसनी रिक्षांची संख्या २५० ते ३०० इतकी असून सहा आसनी रिक्षा सुमारे ५० आहेत. शहराच्या विविध भागात या सहा आसनी रिक्षा उभ्या केल्या जातात; मात्र या रिक्षा व्यावसायिकांना अधिकृत थांबे देण्यात आलेले नाहीत. शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे सहा आसनी रिक्षा थांब्यांचा प्रश्‍न निर्माण होणार असून त्याचे नियोजन महामार्गाच्या रूंदीकरणाबरोबरच होणे गरजेचे आहे.

ट्रक टेम्पो टर्मिनल गरजेचा
कणकवली शहरातून विविध तालुक्‍यात आणि गावात मोठ्या प्रमाणात वाहतुक केली जाते. यासाठी शहरात १०० ते १५० ट्रक टेम्पो ठिकठिकाणी उभे केले जातात. आजवर महामार्गाच्या दुतर्फा या अवजड वाहतुकीला जागा मिळाली होती; परंतु चौपदरी करणामुळे अवजड वाहतुकदारांच्या वाहनतळाचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. यासाठी नगरपंचायत प्रशासनाला ट्रक टेम्पो टर्मिनल उभे करावे लागणार आहे.

हॉटेल व्यवसायाचा विस्तार
जिल्ह्याचे मध्यवर्ती दळणवळणाचे केंद्र म्हणून कणकवली शहर आहे. या शहरातून दिवस-रात्र प्रवाशी वाहतूक होते. राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरी करणामुळे कणकवलीच्या दळणवळणाचा वेगही वाढणार आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना किंवा पर्यटकांना वास्तव्यासाठी येथे सोय होणार आहे. त्यामुळे शहरातील हॉटेल व्यवसाय तसेच लॉजींग बोर्डींग व्यवसाय विस्तारीत होणार आहे. सध्या शहराच्या महामार्गावर उभा असलेला हा व्यवसाय चौपदरी करणामुळे शहराबाहेर जाण्याची शक्‍यता आहे. याचे कारण शहरातून जाणाऱ्या फ्लॉयओव्हर ब्रीजमुळे पर्यटक थेट शहराबाहेर थांबण्यास अधिक पसंती देणार आहेत.

मुल्यांकनानंतरही निर्णय प्रलंबित
कणकवली शहरात मालमत्तांच्या मुल्यांकनाचा प्रश्‍न चिघळला आहे. फेरमुल्यांकण झाले. पण मोबदला वाटपाचा प्रश्‍न अजूनही प्रलंबीत आहे. लवादाकडे अजूनही काही प्रकरणांचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे कणकवली शहरातील भूसंपादन व त्याच्या मोबदला वाटपाचा वाद अजूनही सुटलेला नाही. लवादाकडे हा वाद न मिटल्यास प्रलंबित प्रकरणे जिल्हा न्यायालयाकडे वर्ग होणार आहेत; मात्र हा वाद कितीही चिघळला तरी निवाडा बजावल्यानंतर ज्या जमिनीची संपादन प्रक्रीया झाली आहे. अशा जमिनीवरील मालमत्ता हटवून ती जागा प्राधिकरणकडे वर्ग करावी लागणार आहे. नव्या भूसंपादन कायद्यानुसार राष्ट्रीय विकास प्रकल्पात भूसंपादनातील संबंधीत जमीन विकास प्रक्रीयेसाठी आवश्‍यक असल्यास ती वर्ग करणे बंधनकारक राहणार आहे. 

दुकानांचे स्थलांतर
शहरातील एस. एम. हायस्कूल ते उबाळे बिल्डींग  असा फ्लायओव्हर ब्रीज प्रस्तावित आहे. त्यामुळे एस. एम. हायस्कूल परिसरातील महामार्गाच्या दुतर्फा जानवली पुरापर्यंत दुकाने स्थलांतरीत होणार आहेत. परिसराच्या दोन्ही बाजूला टोलेजंग इमारती किंवा भव्य मॉल उभारण्यासाठी विस्तृत जागा आहे. त्यामुळे शहरातील पुढील व्यवसाईकरण याच परिसरात होईल. सध्या या भागात स्टेट बॅंकेच्या दोन शाखा, एचडीएफसी, आयसीआयसीआय. आयडीबीआय बॅंकेच्या शाखा आहेत. त्यामुळे बॅंकींग व्यवसाय या परिसरात वाढणार आहे; मात्र एसटी बसस्थानकाच्या पुढे उबाळे बिंल्डींग येथून आचरा बायपास होत आहे. परिणामी आचरा बायपासवरही नव्याने व्यवसाय उभे राहतील. तेथे अधिक मार्केटींगला संधी आहे; मात्र जेथे फ्लायओव्हर समांतर पुढे जाणार आहे तेथील पुळील भागात शासकीय कार्यालय आहेत. त्यामुळे बसस्थानक ते गडनदी पुलापर्यंत मोठे व्यवसाय उभे राहण्याची शक्‍यता कमी आहे. अपवाद मात्र नरडवे नाक्‍यावर व्यवसाय वृद्धीकरण होणार आहे. 

जानवली, वागदे विकास प्रक्रियेत

शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे शहरातील हॉटेल, लॉजिंग, खानावळी, फास्टफुड, आयस्क्रीम व थंडपेयाच्या व्यवसायाला उभारी मिळाली होती. वाहन दुरूस्तीबरोबरच वाहन विक्रीचे व्यवसाय उभे राहिले. पण आता हॉटेलींग, वाहन खरेदी-विक्री तसेच दुरूस्तीचे व्यवसाय हे जानवली, वागदे, ओसरगाव या भागाकडे स्थलांतरीत होतील. टू स्टार, थ्री स्टार हॉटेल व्यवसाय शहराबाहेर जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कणकवली शहराबरोबर लगतच्या गावचा विकास होणार आहे. त्या गावातील ग्रामपंचायतीच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे. शहराबाहेरील गावामध्ये रस्त्याच्या दुतर्फा विस्तृत मोकळी जागा आहे. तेथे सर्व्हीस रोड प्रस्तावित असल्याने अशा सर्व्हीस रोडलगत मोठे व्यवसाय उभे राहणार आहेत. 

कणकवली शहरातील चौपदरीकरणात जाणाऱ्या जमिनी आणि मालमत्तांचे संपादन पूर्ण झाले आहे; परंतु मोबदल्याबाबत काही दावे आहेत; तर काहींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील केले आहे. संपादन प्रक्रिया आणि मोबदल्याचे वाटप झाल्यानंतर शहरातील महामार्गाची जमीन प्राधिकरणकडे हस्तांतरित केली जाणार आहे. महामार्गाच्या चौपदरीकणात कणकवली शहर वगळून तालुक्‍यातील  इतर गावांचे संपादन आणि मोबदल्याचे वाटप जवळपास पूर्ण झाले. शहरातील मालमत्तांच्या मूल्यांकनाबाबत काही प्रश्‍न होते तेही सोडविण्यात आले आहेत. विस्थापितांच्या काही मागण्या होत्या त्या शासनदरबारी पोहोचविण्यात आल्या आहेत. त्यामुळे कणकवली शहरातील चौपदरीकरणाच्या कामाला आणि पुलाच्या बांधकामाचा मार्गही मोकळा होणार आहे. 
- नीता सावंत,
भूसंपादन अधिकारी

कणकवली शहरातील महामार्गावर तीन आसनी रिक्षासाठी पाच थांबे परिवहन विभागाने मान्यता दिलेले आहेत. सध्या जेथे थांबे आहेत, तेथेच ते मिळावेत, अशी मागाणी आम्ही महामार्ग प्राधिकरण केली आहे. महामार्गाच्या रुंदीकरणापूर्वी जी बैठक झाली होती, तेव्हा जिल्ह्यातील कणकवली आणि कुडाळ तालुक्‍यातील रिक्षा थांब्यांबाबत चर्चा झाली आहे. महामार्गाच्या रुंदीकरणाबरोबरच शहर आणि गावांमध्ये जेथे रिक्षा उभ्या केल्या जातात, तेथे थांबे मिळावेत. प्रवाशांना सोयीच्या ठिकांणीच रिक्षा थांबे असावेत, अशी मागणी आहे. तसा पत्रव्यवहारही केलेला आहे. रुंदीकरणाच्या वेळीच रिक्षा थांब्यासाठी स्वतंत्र व्यवस्था महामार्गावर असावी, अशी आमची मागणी आहे.
- अण्णा कोदे,
अध्यक्ष, 
रिक्षा चालक मालक संघटना

Web Title: Sindhudurg News Development in Kankavali