सांस्कृतिक राष्ट्रवादाविरोधात राजकीय राष्ट्रवाद उभा करा - डॉ. रावसाहेब कसबे

राजेश सरकारे 
बुधवार, 11 एप्रिल 2018

समतेचा विचार या मोदी सरकारला बदलायचा आहे. म्हणूनच त्यांना सांस्कृतिक राष्ट्रवाद जपायचा आहे. त्यातूनच हळूहळू राज्यघटना त्यांना बदलायची आहे, हे सगळे बहुजनांनी हाणून पाडायला हवे. नाहीतर असे राजकारण करणारे राष्ट्रापेक्षा मोठे होतात आणि त्यातून राष्ट्र कोसळून पडते हा धोकाही विचारात घेतला पाहिजे,

- डाॅ. रावसाहेब कसबे

कणकवली - सांस्कृतिक राष्ट्रवाद जाती - धर्मांची, समाजातील अनिष्ट प्रथांची परंपरा जोपासतो, तोच राष्ट्रवाद मोदी सरकारला हवा आहे. त्यांच्या विचाराच्या संघटना हेच काम करण्यासाठी कार्यरत झाल्या आहेत. यासाठी सांस्कृतिक राष्ट्रवादाविरोधात राजकीय राष्ट्रवाद उभा करण्यासाठी सर्वांनी संघटित व्हावे, असे आवाहन संविधानाचे अभ्यासक तथा ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी येथे केले.

मातोश्री मंगल कार्यालयात सत्यशोधक व्याख्यानमालेतील "भारतीय संविधान - आजची आव्हाने आणि सामाजिक समतेच्या लढ्याची दिशा' या विषयावर डॉ. कसबे यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्‌घाटन झाले.

व्याख्यानात डॉ. कसबे यांनी मोदी सरकारच्या काळात स्त्रियांना कुठलेही हक्क द्यायचे नाहीत, जाती, धर्माच्या संरचनेत बदल करायचा नाही, ही मानसिकता बनविली जात असल्याचा आरोपही केला. सत्यशोधक जनआंदोलनाचे राज्याध्यक्ष कॉ. किशोर जाधव, अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पार्थ पोकळे, देवगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, जिल्हा परिषद सभापती शारदा कांबळे, संस्थेचे अध्यक्ष अमोल कांबळे, सचिव योगेश सकपाळ, अंकुश कदम आदी उपस्थित होते.

डॉ. कसबे म्हणाले, भारतीय संविधानात प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले आहे. पण जे परंपरावादी, जात-धर्मवादी सरकार सत्तेवर येते. ते इथल्या व्यक्ती-व्यक्तीचे स्वातंत्र्यच नाकारण्याचे काम करीत असते. मोदी सरकार हेच काम करीत असून आज स्त्रियांना कुठलेही हक्क द्यायचे नाहीत, जाती-धर्मात बदल करायचा नाही ही मानसिकता बनवली जात आहे. मोदी सत्तेवर आल्यावर देश शाकाहारी बनविण्याचे प्रयत्न सुरू झाले.

ते म्हणाले, बहुजन मुलांना आपण वेदात काय आहे हे सांगितलं नाही, धर्म चिकित्सा आपण केली नाही, संतांचे विचार आपण आत्मसात केले नाहीत. म्हणूनच बहुजनांची मुले संघ आणि मोदींच्या मागून धावत गेली. कबीर म्हणतो, वेद म्हणजे आंधळय़ाच्या समोर धरलेला आरसा आहे. आपल्या देशात  संत नामदेव हे भारतीय भक्ती चळवळीचे नेते होता. संत नामदेवांचे अभंग ऐकताना आपण रंगून जातो. हीच गोष्ट संत मीराबाईंमध्ये आहे. पण संत मीराबाईंचा विचार आपण समजूनच घेतला नाही. मीरा एकतारी वाजवून अठरापगड संतांबरोबर नाचली. हा तिचा केवढा तरी मोठा विद्रोह होता. हा सगळा समतेचा विचार या मोदी सरकारला बदलायचा आहे. म्हणूनच त्यांना सांस्कृतिक राष्ट्रवाद जपायचा आहे. त्यातूनच हळूहळू राज्यघटना त्यांना बदलायची आहे, हे सगळे बहुजनांनी हाणून पाडायला हवे. नाहीतर असे राजकारण करणारे राष्ट्रापेक्षा मोठे होतात आणि त्यातून राष्ट्र कोसळून पडते हा धोकाही विचारात घेतला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

उद्घाटन सत्रात शारदा कांबळे, जयप्रकाश परब यांनी विचार मांडले. सूत्रसंचालन जितेंद्र पेडणेकर यांनी, प्रास्ताविक योगेश सपकाळ यांनी, तर स्वागत अमोल कांबळी यांनी केले. परिचय अंकुश कदम यांनी करून दिला.

Web Title: Sindhudurg News Dr Ravsaheb Kasabe comment