मालवणात पोलिस बंदोबस्तात हटविली अतिक्रमणे

प्रशांत हिंदळेकर
मंगळवार, 20 मार्च 2018

मालवण - शहरात पालिकेच्यावतीने जाहीर केलेल्या 23 अतिक्रमण हटविण्याच्या यादीतील शिल्लक बांधकामे आज ब्रेकरच्या साह्याने हटविण्याची कार्यवाही सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. काही व्यापाऱ्यांनी कारवाई टाळण्यासाठी स्वतःच अतिक्रमणे हटविल्याचे दिसून आले.

मालवण - शहरात पालिकेच्यावतीने जाहीर केलेल्या 23 अतिक्रमण हटविण्याच्या यादीतील शिल्लक बांधकामे आज ब्रेकरच्या साह्याने हटविण्याची कार्यवाही सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. काही व्यापाऱ्यांनी कारवाई टाळण्यासाठी स्वतःच अतिक्रमणे हटविल्याचे दिसून आले. यापूर्वी राबविलेल्या मोहिमेत नागरिक व अधिकारी यांच्यात बाचाबाची झाल्याने आज पोलिस बंदोबस्तात ही अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही करण्यात आली. 

पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने बाजारपेठ आणि रामेश्‍वर मांड रस्त्यावरील अतिक्रमणांवर खुणा केल्या होत्या. या खुणा करताना संबंधितांना हे अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याची कल्पना देण्यात आली होती. त्यावेळी अतिक्रमण हटविताना व्यापारी वर्गाने गुढीपाडव्यापर्यंत मुदत देण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे पालिकेने मुदत देत अतिक्रमण हटाव मोहीम थांबविली होती. त्यानंतर आज सकाळपासूनच अनेकांनी पालिकेत गर्दी केली होती. अतिक्रमण हटाव मोहिमेचे पथक हे मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाची वाट पाहत होते. सकाळी नऊपासून उपस्थित असलेल्या पथकाला अतिक्रमण हटविण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर पथकाने बाजारपेठेतील अतिक्रमण हटविण्यास सुरवात केली.

अतिक्रमणे हटविली जात असल्याचे कळताच बाजारपेठेतील अनेक व्यावसायिकांनी आपली अतिक्रमणे हटविण्यास सुरवात केली. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता. कारवाईमध्ये मुख्याधिकारी रंजना गगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख विशाल होडावडेकर, शशिकांत देऊलकर, विजय रावले, हेमंत कोचरेकर, गुरुदत्त ठाकूर, रमेश कोकरे, श्री. पाटील यांनी सहभाग घेतला होता. पालिका बांधकाम विभागातील फक्‍त होडावडेकर हे एकमेव अधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते. पहिल्या यादीतील बहुतांश अतिक्रमणे हटविण्यात पालिका प्रशासनाला यश आल्याने पुढील यादी तयार करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली होती. त्या मोहिमेस लवकरच सुरवात होणार असल्याचे कळते. 

पालिकेच्या सर्वसाधारण सभेत माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी शहरात 70 टक्‍के अनधिकृत बांधकामे असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. यावर बांधकामचे अधिकारी श्री. होडावडेकर यांनी 20 मार्चपूर्वी अनधिकृत आणि अतिक्रमण असलेली बांधकामे हटविण्याची कार्यवाही केली जाईल असे आश्‍वासन दिले होते. यात काही दिवसांनी बाजारपेठेतील नवीन बांधकाम करताना सोडलेल्या जागांवरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही पालिका प्रशासनाने सुरू केली. यात 23 जणांची यादी बनविण्यात आली होती. या यादीनुसार सर्वांना नोटिसा काढून अखेर जेसीबी आणि ब्रेकरच्या साहाय्याने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जात आहे. ही मोहीम उद्याही सुरू राहणार आहे. यामुळे पुढील मोहिमेत कोणती बांधकामे हटविली जाणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. या मोहिमेत किनारपट्टीवरील अनधिकृत बांधकामे हटविली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. 

आतून विरोध पण...
अतिक्रमण हटाव मोहीम थांबविण्यासाठी काही नगरसेवकांकडून प्रयत्न करण्यात येत होता. मात्र थेट विरोध केल्यास नगरसेवक पद जाण्याची भीती असल्याने इतर व्यक्‍तींना पुढे करत प्रशासनावर दबाव आणून काही नगरसेवकांनी याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. पहिल्यांदा अतिक्रमण आणि त्यानंतर अनधिकृत बांधकाम यांवर हातोडा चालविण्यात येणार असल्याचे निश्‍चित करण्यात आले. शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असल्याने प्रशासनाने त्यांच्यावर प्रथम कारवाई करणे आवश्‍यक असल्याचे काहींनी सांगितले. मात्र प्रशासनाच्या कडक भूमिकेमुळे काहींना चांगलाच फटका बसल्याचे चित्र आहे. 

Web Title: Sindhudurg News encroachment removal in Malvan