मत्स्य आयुक्त कार्यालय जागेसाठी ८ जागांचा पर्याय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

मालवण - येथील सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालय कुंभारमाठ येथे न हलविता अन्य ८ जागा मच्छीमारांनी सुचविल्या आहेत, त्यापैकी एका जागेची निश्‍चिती करावी. तोपर्यंत हे कार्यालय स्थलांतरित करू नये, अशी सूचना आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे मत्स्य व्यवसाय आयुक्तांना केली.

मालवण - येथील सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालय कुंभारमाठ येथे न हलविता अन्य ८ जागा मच्छीमारांनी सुचविल्या आहेत, त्यापैकी एका जागेची निश्‍चिती करावी. तोपर्यंत हे कार्यालय स्थलांतरित करू नये, अशी सूचना आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे मत्स्य व्यवसाय आयुक्तांना केली.

त्यानुसार त्या संबंधित जागांचा अहवाल सहायक मत्स्य व्यवसाय कार्यालयाने तत्काळ आपल्याकडे सादर करावा, अशा सूचना मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच कार्यालय स्थलांतर करू नये, याबाबतच्या लेखी सूचना सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्तांना दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

शहरातील सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालय कुंभारमाठ येथे हलविणार असल्याचे सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त यांनी स्पष्ट केले. याला स्थानिक मच्छीमारांनी तसेच जिल्हा मच्छीमार संघटनेने तीव्र विरोध दर्शविला. या संदर्भात मच्छीमारांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांचे लक्ष वेधले असता त्यांनी कार्यालय स्थलांतर करू नये, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, याबाबतचे लेखी आदेश प्राप्त नसल्याचे सांगत सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त श्री. वस्त यांनी कार्यालय कुंभारमाठ येथेच स्थलांतर केले जाईल, असे स्पष्ट केले. येथील मच्छीमारांनी शहरातील कार्यालय कुंभारमाठ येथे स्थलांतरित केल्यास मच्छीमारांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे शहरातीलच आठ जागा सुचविल्या. तरीही हे कार्यालय स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. याची माहिती मिळताच आज जिल्हा मच्छीमार सहकारी संस्था फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी येथील मत्स्य व्यवसाय कार्यालयास भेट देत कार्यालय स्थलांतरास विरोध दर्शविला. या वेळी फेडरेशनचे अध्यक्ष मेघनाद धुरी, संतोष खांदारे, अन्वय प्रभू, स्वप्नील आचरेकर, रॉकी डिसोझा, सुधीर जोशी, संदीप कोयंडे, मार्शल डायस, संतोष देसाई, भिवा आडकर, गंगाराम आडकर, नारायण आडकर, मनीष खडपकर, मुरारी सावंत, श्रीराम जामसंडेकर, लक्ष्मीकांत सावजी, रविकिरण तोरसकर, कांचन चोपडेकर यांच्यासह अन्य मच्छीमार बांधव उपस्थित होते.

फेडरेशनच्यावतीने मत्स्य व्यवसाय कार्यालयाच्या अखत्यारित असलेली ट्रेनिंग सेंटरची जागा, नगरवाचन मंदिर पहिला गाळा, सुभाष पाटील यांची पूर्वी वसाहतगृहासाठी दिलेली जागा, मालवण मच्छीमार सोसायटीच्या इमारतीचा पहिला गाळा, सिंधुदुर्ग मच्छीमार संघ आवार दांडी येथील सोसायटीची संपूर्ण इमारत, मालवणी बझार समोरची इमारतीची जागा, कृ. सि. देसाई शिक्षण मंडळाच्या कन्याशाळा या इमारतीचा पहिला मजला, सुनील देसाई मेढा यांच्या मालकीची इमारत अशा आठ जागा सुचविण्यात आल्या. पैकी एका जागेची पाहणी करून निश्‍चिती करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान, मालवण दौऱ्यावर आलेल्या आमदार वैभव नाईक यांनी सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयास भेट दिली. या वेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांच्यासह अन्य मच्छीमार बांधव उपस्थित होते. शहरातील कार्यालय कुंभारमाठ येथे हलविण्यात येत असल्याचे मच्छीमारांनी आमदार नाईक यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी राज्याचे मत्स्य व्यवसाय आयुक्त यांच्याशी संपर्क साधत मच्छीमारांनी सुचविलेल्या आठ जागांपैकी एका जागेची निश्‍चिती करावी, तोपर्यंत हे कार्यालय स्थलांतरित करू नये, असे सांगितले.

Web Title: SIndhudurg News Fisheries Commissioner office place issue