मालवणात पारंपरिक मच्छीमार आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

मालवण - पर्ससिननेट, परराज्यांतील हायस्पीड ट्रॉलर्सपाठोपाठ जिल्ह्याच्या सागरी हद्दीत सुरू असलेल्या प्रखर झोतातील मासेमारीच्या विरोधात पारंपरिक मच्छीमारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारी कडकडीत बंद पाळून सर्वपक्षीयांनी एकत्र येत प्रखर झोतातील मासेमारी न रोखल्यास त्यांचे ट्रॉलर्स समुद्रातच पेटवून दिले जातील असा इशारा दिला.

मालवण - पर्ससिननेट, परराज्यांतील हायस्पीड ट्रॉलर्सपाठोपाठ जिल्ह्याच्या सागरी हद्दीत सुरू असलेल्या प्रखर झोतातील मासेमारीच्या विरोधात पारंपरिक मच्छीमारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारी कडकडीत बंद पाळून सर्वपक्षीयांनी एकत्र येत प्रखर झोतातील मासेमारी न रोखल्यास त्यांचे ट्रॉलर्स समुद्रातच पेटवून दिले जातील असा इशारा दिला.
गेली अनेक वर्षे पारंपरिक मच्छीमार या अवैध मासेमारीच्या विरोधात समुद्रात संघर्ष करत आहेत.

सत्ताधाऱ्यांकडून पर्ससिनच्या मासेमारीवर बंदी घालण्यात आली; मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी न होता लोकप्रतिनिधींकडून केवळ आश्‍वासने दिली जात आहेत. त्यामुळे आता केवळ भाषणे न करता, प्रत्यक्ष कृती करून दाखवा, असे सांगितले. पारंपरिक मच्छीमारांनी आज पुकारलेल्या मासेमारी व विक्री बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दुपारनंतर मासळी विक्री व्यवसाय सुरू करण्यात आला.

प्रखर झोतातील मासेमारीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील मच्छीमारांची बैठक आज दांडी येथे झाली. यात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले. रापण, मांड, तियानी, न्हय, ट्रॉलिंग या मासेमारीच्या पद्धतीतून हजारो स्थानिक मच्छीमारांचा उदरनिर्वाह सुरू आहे. जिल्ह्याच्या किनारपट्टीवर आज भांडवलदारांनी पर्ससिननेटसह हायस्पीड व प्रकाशझोतातील मासेमारीचा अवलंब करून थेट मच्छीमारांसह शासनाला आव्हान दिले आहे.

परप्रांतीय हायस्पीड व एलईडीद्वारे होणाऱ्या मासेमारीमुळे स्थानिकांचा मासेमारी व्यवसाय संकटात आला आहे. केंद्र व राज्य सरकारने या मासेमारीविरोधात ठोस कायदे बनवूनदेखील प्रशासन योग्य प्रकारे अंमलबजावणी करत नाही. उलट तांत्रिक व्यवसायांना शासन संरक्षण देत असल्याने स्थानिक मच्छीमारांमध्ये असंतोषाची ठिणगी पडली आहे. यामुळे भविष्यात जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील प्रकाशझोतातील मासेमारी बंद न झाल्यास जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा मच्छीमारांनी यावेळी दिला. 

मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक निर्णयामुळे जिल्ह्याच्या किनारपट्टीवर पर्ससिननेटविरोधी सुरू झालेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला नसेल; मात्र स्वल्पविराम निश्‍चित मिळाला. सत्ताधारी शिवसेना-भाजपने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने सत्तेतील आमदारांना मच्छीमारांच्या संघर्षाला तोंड द्यावे लागत आहे.

शाश्वत मासेमारीसाठी शासन प्रयत्न करते; मात्र पर्ससिन बंदीच्या अंमलबजावणीसाठी शासन अपयशी ठरत असल्याची टीका मत्स्य अभ्यासक महेंद्र पराडकर यांनी केली. सर्वच राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी मच्छीमारांसाठी काहीतरी करायचे असेल, तर निःस्वार्थी भावनेने मच्छीमारांच्या पाठीशी राहावे असे आवाहन केले. 

कोकण किनारपट्टीवर सुरू असलेल्या पर्ससिननेट, हायस्पीड ट्रॉलर्स, प्रकाशझोतातील मासेमारीबाबत शासनाच्या अधिसूचनेची अंमलबजावणी होत नसल्याचे सांगितले. पर्ससिनधारकच प्रकाशझोतातील मासेमारी करत आहेत. त्यामुळे त्यांनी ही मासेमारी बंद न केल्यास त्यांचे ट्रॉलर्स समुद्रातच पेटवून दिले जातील असा इशारा श्री. खोबरेकर यांनी दिला.

श्री. केणी म्हणाले, ‘‘गेली दोन वर्षे प्रकाशझोतातील मासेमारीबाबत मत्स्य विभागाकडून एकही कारवाई झालेली नाही; यामुळे मच्छीमारांसाठी शासन आहे का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.’’ श्री. केनवडेकर म्हणाले, ‘‘मच्छीमार महिलांमुळे स्थानिक बाजारपेठा फुलत आहेत. त्यामुळे मच्छीमार जगला पाहिजे. पक्ष बाजूला ठेवून श्रेयवाद न घेता भाजप मच्छीमारांच्या पाठीशी राहील.’’

श्री. अंधारी म्हणाले, ‘‘प्रकाशझोतातील मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमार उद्‌ध्वस्त होत आहेत. त्यामुळे या मासेमारीला आमचा विरोध राहील.’’

येथील मुजोर प्रभारी सहाय्यक मत्स्य आयुक्त यांच्या अकार्यक्षमतेमुळे जिल्ह्याच्या किनारपट्टीवर, पर्ससिननेट, हायस्पीड ट्रॉलर्स व प्रकाशझोतातील मासेमारी राजरोस सुरू आहे. त्यामुळे या मत्स्य आयुक्ताची बदली करावी किंवा त्याला सक्तीच्या रजेवर पाठवा अशी मागणी रविकिरण तोरसकर, हरी खोबरेकर यांनी केली. यावर आमदार वैभव नाईक यांनी येत्या महिनाभरात सहायक मत्स्य आयुक्ताची हकालपट्टी केली जाईल असे स्पष्ट केले.

मासेमारी, तसेच विक्री व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय किनारपट्टीवरील मच्छीमारांनी घेतला होता. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मच्छीमारांच्या बैठकीस महिला मच्छीमार, तसेच सर्व प्रकारची मासेमारी करणारे मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी बैठक पार पडल्यानंतर जिल्हा मच्छीमार फेडरेशनचे अध्यक्ष मेघनाद धुरी यांनी विक्री व्यवसाय सुरू करण्याच्या सूचना दिल्यानंतर मासळी विक्रीला सुरवात करण्यात आली.

बैठकीस आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, सुदेश आचरेकर, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष बाळू अंधारी, भाजप तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर, स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष मंदार केणी, श्रमिक मच्छीमार संघाचे अध्यक्ष छोटू सावजी, सिंधुदुर्ग जिल्हा मच्छीमार फेडरेशनचे अध्यक्ष मेघनाद धुरी, भाजप मच्छीमार सेलचे जिल्हाध्यक्ष रविकिरण तोरसकर, दिलीप घारे, लीलाधर पराडकर, ज्ञानेश्वर खवळे, नगरसेवक पंकज सादये, सेजल परब, यतीन खोत, सुनीता जाधव, आकांक्षा शिरपुटे, आप्पा लुडबे, गणेश कुशे, तपस्वी मयेकर, गणेश कुडाळकर यांच्यासह अन्य मच्छीमार प्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title: Sindhudurg News fishing issue