तुळसुलीत साकारला गिरगाईंचा प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

कुडाळ - तालुक्‍यातील वेताळबांबर्डे रांगणा तुळसुली येथे देसाई ॲग्रोफार्ममध्ये लहान-मोठ्या अशा ३५ गिरजातीच्या गाईंचा प्रकल्प साकारला आहे. या गायींच्या शेण व गोमूत्रापासून औषधे बनविण्यास उद्योजक निरंजन विजय देसाई यांनी सुरुवात केली आहे. पाश्‍चात्त्य देशात या औषधांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे, अशी माहिती देसाई यांनी दिली.

कुडाळ - तालुक्‍यातील वेताळबांबर्डे रांगणा तुळसुली येथे देसाई ॲग्रोफार्ममध्ये लहान-मोठ्या अशा ३५ गिरजातीच्या गाईंचा प्रकल्प साकारला आहे. या गायींच्या शेण व गोमूत्रापासून औषधे बनविण्यास उद्योजक निरंजन विजय देसाई यांनी सुरुवात केली आहे. पाश्‍चात्त्य देशात या औषधांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे, अशी माहिती देसाई यांनी दिली.

नोकरीनिमित्त दुबई येथे स्थायिक असलेल्या व मूळ वसई पालघर येथील निरंजन देसाई यांनी वेताळबांबर्डे रांगणातुळसुली येथे देसाई ॲग्रो फार्मची निर्मिती केली आहे. या फार्ममध्ये लहान मोठ्या गिरजातीच्या ३५ गायी आहेत. या प्रकल्पाला जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई, सभापती राजन जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली.

या वेळी सरपंच नागेश आईर, पंचायत समिती सदस्या अनघा तेंडुलकर, अरविंद तेंडुलकर, संतोष कदम, सुजाता सावंत आदी उपस्थित होते.

याबाबत देसाई म्हणाले,‘‘मी मूळ वसई येथील आहे. नोकरीनिमित्त दहा वर्षे दुबईत आहे. माझी मावशी कुडाळ तालुक्‍यातील सुकळवाड येथील आहे. तिच्याकडे देशी गायी असायच्या. ती गायीचे तूप घेऊन मुंबईला येत असे. भारतात आल्यावर याबाबत काय करता येईल. या उद्देशाने या प्रकल्पाकडे दोन वर्षापूर्वी वळलो. गिरगायीच्या तुपाचे फायदे मोठ्या प्रमाणात आहेत.

बाजारात मिळणाऱ्या तुपाला एक्‍स्पायरी डेट असते; मात्र गिरगायीच्या तूपाला एक्‍स्पायरी डेट नाही. तूप व गोमुत्र याचा औषध म्हणून आपण कित्येक वर्षे वापर करु शकतो. हृदयरोग, मतिमंद व सांधेदुखी रुग्णांसाठी गिरगायीच्या गोमुत्र व शेणापासून बनविलेली औषधे रामबाण उपाय आहेत हे हेरुन गेली अडीच वर्षे युट्‌युबवर राजू दीक्षित यांचे या गिरगायीच्या माहितीबाबतचे संभाषण ऐकले. गुजरातगीरचे अध्यक्ष बी. के. आईर यांचीही भेट घेतली. मागीलवर्षी त्यांच्याकडील १४ गिरगाई वेताळबांबर्डे येथील फार्ममध्ये आणल्या. 

ते पुढे म्हणाले,‘‘सिंधुदुर्गात गिरगाई किंवा आपल्या स्थानिक (गावठी) गायीच्या गोमूत्र व शेणापासून औषधे तयार केल्यास त्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. देशी गाईच्या काशिडामध्ये सूर्यवेल नाडी असते. त्या गायींना सकाळी सूर्यप्रकाशदरम्यान बाहेर सोडल्यास सूर्यकिरणे त्या काशिडावर पडतात. त्यानंतर संकलित केलेले गोमुत्र आणि शेण औषधी असते. लवकरच दुबईतील नोकरी सोडून पूर्णवेळ वेताळबांबर्डे येथे गायीचे गोमुत्र व शेण यापासून औषधाची मोठ्या प्रमाणात निर्मिती करणार.’’

विशेष म्हणजे या प्रकल्पामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. देसाई हे या प्रकल्पाची थेट माहिती दुबई येथून घेत आहेत. गिरगायीचा प्रकल्प साकारण्यासाठी येथील ग्रामस्थ, सरपंच यांनी चांगले सहकार्य केले. तसेच त्यांनी ऑरगॅनिक शेती कशी पुलते याबाबत माहिती दिली. या गायीपासून मिळणाऱ्या तुपाचा उपयोग तेंडोली येथे झालेल्या वाजपेय सोमयाग विधी सोहळ्यात करण्यात आल्याचे अरविंद तेंडुलकर यांनी सांगितले.

...तर सहकार्य करू
हा प्रकल्प आर्थिक उत्पन्न मिळवून देणारा आहे. जिल्ह्यातील लोकांनी अशा प्रकारे गाईचे संगोपन करून औषध निर्मिती केल्यास मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. जिल्ह्यात कोणी असा प्रकल्प राबविल्यास आपण त्यांना आवश्‍यक ते सहकार्य, मार्गदर्शन करू, असे देसाई यांनी सांगितले.

Web Title: Sindhudurg News Gir cow project in Tulsuli