गोव्यातही महामार्ग चाैपदरीकरण सुरू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

झाराप - झाराप ते इंदापूर चौपदरीकरणाच्या रखडलेल्या कामाने आता वेग घेतला असतानाच गोवा राज्यांतर्गत येणाऱ्या 120 किमीच्या या महामार्गाच्या रूंदीकरणाला सुरूवात करण्यात आली आहे. पत्रादेवी ते कर्नाटक सीमेवरील पोळे या कामाचे मांडवी पूल, झुआरी पूल, मडगाव व काणकोण बायपास वगळून चार टप्पे करण्यात आले आहेत.

झाराप - झाराप ते इंदापूर चौपदरीकरणाच्या रखडलेल्या कामाने आता वेग घेतला असतानाच गोवा राज्यांतर्गत येणाऱ्या 120 किमीच्या या महामार्गाच्या रूंदीकरणाला सुरूवात करण्यात आली आहे. पत्रादेवी ते कर्नाटक सीमेवरील पोळे या कामाचे मांडवी पूल, झुआरी पूल, मडगाव व काणकोण बायपास वगळून चार टप्पे करण्यात आले आहेत.

सिंधुदुर्गाच्या हद्‌दीला लागून असलेल्या पत्रादेवी ते करासवाडा या 25 कि.मी लांबीच्या व सुमारे 630 कोटी खर्चाच्या कामाचा ठेका हैदराबाद स्थित नवयुग इंजिनीयरींग कंपनीला मिळाला असून या कामासाठी कंपनीने कोलगाव येथे आपला प्लांट उभारला आहे. जी जागा अधिग्रहीत झालेली आहे. त्याठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली आहे. या टप्प्यात पत्रादेवी, तांबोसे, तुये, नयबाग, कोलगाव अशा 15 हून अधिक ठिकाणी बॉक्‍सेल ब्रीज, वाहनांकरीता अंडरपास बांधण्यात येणार आहेत. तसेच करासवाडा, धारगळ व मोपा विमानतळ या ठिकाणी उड्‌डाणपूल तर कोलवाळ येथे ब्रीज होणार आहेत. अपघातांचे प्रमुख केंद्र बनलेल्या नयबाग सातार्डा पूल ते पेडणे दरम्यान कोकण रेल्वे मार्गाला समांतर सहापदरी बोगदा भविष्यात बांधण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे.

करासवाडा ते बांबोळी या 17.5 कि.मी. लांबीच्या व सुमारे 850 कोटी खर्चाचे काम चीनच्या क्‍विंगडाउ कंपनीने मिळविले असून त्यात म्हापसा (1.5 कि.मी.), गिरी व पर्वरी (4 कि.मी.) या ठिकाणी उड्‌डाणपूल बांधण्यात येणार आहेत.

वाहनांचा वेग ताशी 80 ते 100 कि.मी. राहील या दृष्टिने या रस्त्याचे काम करण्यात येणार असून कॉंक्रीटच्या दोन पदरी चार मार्गिका, शोल्डर लेन, डिव्हायडर, फुटपाथ, दोन्ही बाजूने स्वतंत्र सेवा रस्ते असे या महामार्गाचे स्वरूप असणार आहे. रूंदीकरणात या मार्गावरील सर्व धोकादायक वळणे व चढउतार काढण्यात येणार असल्याने सध्याची अपघातप्रवण क्षेत्रे इतिहासजमा होणार आहेत. भविष्यात मोपा विमानतळाकडे वाढणारी वाहतूक ध्यानात घेऊन सहापदरीकरणाचे नियोजन करून रस्ता बनविण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग गोव्याच्या अधिक जवळ येणार
नोकरी व्यवसाय, मासे व्यापार तसेच आरोग्य सेवा यासाठी सिंधुदुर्ग बहुतांशी गोव्यावर अवलंबून असल्याने जिल्ह्यातून गोव्याच्या दिशेने होणारी दैनंदीन वाहतूक लक्षणिय आहे. त्यामुळे मुंबई पाठोपाठ गोव्याच्या प्रवासही जिल्हावासियांसाठी वेगवान व सुरक्षीत होणार आहे. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी सिंधुदुर्ग आणखी जवळ येईल. तसेच मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेमुळे कारवार भागातील वाहने जी सध्या मुंबईकडे जाण्यासाठी पुणे-बेंगलोर महामार्गाचा वापर करतात त्यांच्यासाठी मुंबई-गोवा हा कमी अंतराचा व सुरक्षित पर्याय उपलब्ध होईल. या महामार्गाचे काम 2019 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्‌दीष्ट आहे.

Web Title: Sindhudurg News Goa-Mumbai Highway works starts