आरोग्य अभियान कर्मचारी महासंघाचा सिंधुदुर्गात मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

सिंधुदुर्गनगरी - राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी होत जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. 

सिंधुदुर्गनगरी - राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी होत जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. 

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांच्या पुर्ननियुक्ती प्रक्रियेत अन्यायकारक बदल करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांच्या पुर्ननियुक्तीबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. 2005 पासून या अभियानात प्रामाणिकपणे कार्यरत राहून शासनाच्या विविध आरोग्य विषयक योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जात आहे.

या आहेत मागण्या... 

  • नियमित शासनसेवत विनाशर्त समायोजन करणे.
  • शासनाच्या सरळ सेवा भरतीमध्ये वयाची अट शिथील करून प्राधान्य द्यावे.
  • कार्यरत कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करू नये.
  • समान काम समान वेतन कायदा लागू करावा.
  • आरोग्याचे खाजगीकरण करण्यात येवू नये.
  • महिला कर्मचाऱ्यांना गरोदरपण ते बाळंतपणाच्या कालावधीत 180 दिवस पगारी रजा मंजूर व्हावी.
  • अभियानातील कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रस्तावांना मान्यता द्यावी व याबाबतचे धोरण निश्‍चित करावे.
  • नियमीत कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रवासभाडे, मोबाईल भत्ता मिळावा.
  • पुर्ननियुक्तीकरीता मुल्यांकन फॉर्म लागू करू नये.
  • सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण लागू करावे. 

आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना नियमीत शासन सेवेत समायोजन करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या 9 सदस्यीय समितीकडून गेल्या तीन महिन्यात अहवाल सादर करणे अपेक्षित होते; मात्र या समितीने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. या विरोधात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.

ओरोस फाटा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढताना आरोग्य कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जोरजोरात घोषणा देवून परिसर दणाणून सोडला. आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना शिथील करून शासनाच्या सरळसेवा भरतीमध्ये प्राधान्य द्यावे. कार्यरत कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करू नये आदी घोषणा दिल्या. 

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आणि शासन धोरणाला विरोध करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान महासंघाचे जिल्हाध्यक्ष हेमदीप पाताडे, सचिव सुवर्णा रावराणे, जिल्हा संपर्कप्रमुख अजित सावंत, राज्य सदस्य लीना फर्नांडीस यांच्या नेतृत्वाखाली आज काढलेल्या मोर्चात जिल्ह्यातील सुमारे 350 हून अधिक अधिकारी- कर्मचारी सहभागी झाले होते. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले. 

उद्यापासून बेमुदत कामबंद 
विविध मागण्यांसाठी उद्या (ता.12) सर्व कर्मचारी काळ्या फिती लावणार असून 13 पासून बेमुदत काम बंद आंदोलन छेडण्याचा निर्धार केला आहे. याचा परिणाम जिल्ह्यातील विविध आरोग्याच्या योजनांवर होणार आहे. 

Web Title: Sindhudurg News Health Mahasangh March in district