#KonkanRain कोकण किनारपट्टीला पावसाचा तडाखा

प्रशांत हिंदळेकर
गुरुवार, 21 जून 2018

मालवण - जिल्ह्यातील किनारपट्टी भागाला पावसाने आज अक्षरशः झोडपले. यामुळे शहरासह अनेक भागात पाणी घुसले. देवगड तालुक्‍यात २४ तासांत तब्बल २७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे

मालवण - जिल्ह्यातील किनारपट्टी भागाला पावसाने आज अक्षरशः झोडपले. यामुळे शहरासह अनेक भागात पाणी घुसले. देवगड तालुक्‍यात २४ तासांत तब्बल २७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. काल रात्रीपासून किनारपट्टी भागात पावसाने प्रचंड झोड उठवली. देवगड, वेंगुर्ले, मालवण तालुक्‍यात याची तीव्रता जास्त होती. किनारपट्टीवरील अनेक भागात पाणी भरले. मालवण, शिरोडा बाजारपेठामध्ये गुडघाभर पाणी साचल्याचे प्रकार घडले. यामुळे अनेक ठिकाणी पडझडही झाली

खवणे (ता. वेंगुर्ले) येथे ओहोळाचे पाणी वस्तीत घुसून नुकसान झाले. मालवण, शिरोडा परिसरातही पावसाने जनजीवन विस्कळीत केले. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. सर्वाधिक पावसाची नोंद देवगड तालुक्‍यात झाली.
मालवणात सकाळी पाऊस थोडा कमी होता; मात्र दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने सायंकाळी कहरच केला. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने दुकानदारांची चांगलीच धावपळ उडाली. तालुक्‍यातही मुसळधार पावसाने सर्वत्र दाणादाण उडविली. काही ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक बंद झाली होती. विद्युत तारा तुटल्याने वीजपुरवठाही खंडित झाला होता. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.

 

गेले काही दिवस अधूनमधून किरकोळ स्वरूपाच्या सरी कोसळत होत्या. काल सायंकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच होती. आज सकाळी काही काळ विश्रांती घेतल्यानंतर दुपारी मुसळधार पावसाला सुरवात झाली. मेघगर्जनेसह दाखल झालेल्या पावसाने सायंकाळच्यावेळेस कहर केला. शहरातील बाजारपेठ, भरड, मेकॅनिकल रोड, फोवकांडा पिंपळ तसेच अन्य भागात गुडघाभर पाणी साचले होते. बाजारपेठेतील काही दुकानांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याचेही दिसून आले. शाळेतील मुले तसेच अन्य महिला, पादचारी याच पाण्यातून वाट काढत जात असल्याचे चित्र होते. 

तालुक्‍यातील देवबाग मोंडकरवाडी येथील मुख्य रस्त्यावर झाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक दुपारी उशिरापर्यंत बंद होती. यात झाड पडून विद्युत तारा पडल्याने गावातील वीजपुरवठाही खंडित झाला होता. दुपारनंतर झाड हटविण्यात आले. वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. मेढा येथील गणपत चव्हाण, संजय टेमकर यांच्या घरात तर किशोर पेडणेकर यांच्या गाईच्या गोठ्यात पाणी घुसले. बिळवस येथील संजय आत्माराम पालव यांच्या घरावर मोठी घळण कोसळून एक लाख रुपयांचे नुकसान झाले.

अन्य ठिकाणीही पडझडीच्या किरकोळ घटना घडल्या. सकाळी आठपर्यंत १९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती तहसील कार्यालयातील नियंत्रण कक्षातून देण्यात आली. जिल्ह्यात २४ तासात १२९.५ तर आतापर्यंत ८७१.४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Web Title: Sindhudurg News Heavy Rains in Konkan