सुपरफास्ट गाड्यांचा वेग आणखी वाढणार

तुषार सावंत
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

भारतीय रेल्वेमध्ये लोकप्रिय असलेल्या लांब पल्ल्यांच्या ५०० रेल्वे गाड्यांना सुपरफास्ट गाड्यांचा दर्जा देऊन त्यांचा वेग वाढविला जाणार आहे. त्यामुळे रेल्वेकडे असलेल्या सध्याच्या गाड्यांमध्ये तशी रचना केली जाणार आहे.

कणकवली - देशभरातील लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या दर्जात आणि वेळांत वाढ करण्याची घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील सुपरफास्ट गाड्यांचा वेळ आणखी वाढणार असून, याची अंमलबजावणी १ नोव्हेंबरच्या नव्या वेळापत्रकापासून सुरू होणार आहे. अद्याप या गाड्यांची घोषणा झाली नसली तरी नियोजित गाड्यांच्या रचनेत बदल केला जात आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे. 

भारतीय रेल्वेमध्ये लोकप्रिय असलेल्या लांब पल्ल्यांच्या ५०० रेल्वे गाड्यांना सुपरफास्ट गाड्यांचा दर्जा देऊन त्यांचा वेग वाढविला जाणार आहे. त्यामुळे रेल्वेकडे असलेल्या सध्याच्या गाड्यांमध्ये तशी रचना केली जाणार आहे. नव्या वेळापत्रकानुसार लांब पल्ल्याच्या सुपरफास्ट गाड्यांच्या वेळा १ ते ३ तास इतक्‍या कमी केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर ज्या रेल्वेगाड्या १३० कि.मी. प्रतितास या वेगाने धावतात, त्यांच्या रचनेत बदल करून वेग वाढविला जाणार आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाने अंतर्गत ऑडिट सुरू केले असून, ५० मेल आणि एक्‍स्प्रेस गाड्यांना सुपरफास्टचा दर्जा दिला जाईल, अशी शक्‍यता आहे. 

कोकण रेल्वे मार्गावर हजरत निजामुद्दीन ते त्रिवेंद्रम राजधानी एक्‍स्प्रेस, मंगला एक्‍स्प्रेस, मत्स्यगंधा एक्‍स्प्रेस, कोकणकन्या एक्‍स्प्रेस, नेत्रावती एक्‍स्प्रेस, पुणे-एर्नाकुलम सुपरफास्ट एक्‍स्प्रेस, दुरांतो एक्‍स्प्रेस या गाड्यांचा वेग वाढण्याची शक्‍यता आहे. कोकण रेल्वे दरवर्षी १० जून ते ३१ ऑक्‍टोबर या कालावधीत पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी करते. यात गाड्यांचा ताशी वेग हा प्रतिकिलोमीटर शंभरपेक्षा कमी असतो.

उन्हाळी हंगामातील वेळापत्रकात सरासरी वेग ताशी १२० ते १३० कि.मी. असतो. मुळात कोकण रेल्वेचा मार्ग हा ताशी १४० ते १५० वेगाने गाड्या धावण्यासाठी बनविण्यात आला होता. मात्र, पावसाळी हंगामातील दरडी कोसळण्याच्या घटना घडल्यानंतर वेगावर मर्यादा आली होती.

आता रोहा ते ठोकूर या कोकण रेल्वेच्या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचा वेग वाढविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने नवी योजना आणली आहे. पावसाळी हंगामातील कोकण रेल्वेचे वेळापत्रक हे १ नोव्हेंबरपासून बदलणार आहे. याच वेळी सुपरफास्ट गाड्यांच्या वेगात वाढ करून वेळेत बचत केली जाणार आहे.

Web Title: sindhudurg News iKonkan rail express speed will increase