काळसेतील डंपर रोको आंदोलन तुर्तास स्थगित 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

मालवण - पाट-परुळे मार्गावरून होणारी वाळू वाहतूक बंद केल्यामुळे सर्व अवजड डंपरच्या साह्याने होणारी वाळू वाहतूक चौके- काळसे-धामापूर मार्गे वळविली. त्यामुळे या मार्गावर वैध तसेच विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या शेकडो डंपरमुळे रस्ता नूतनीकरणाच्या कामावर वाईट परिणाम होत आहे.

मालवण - पाट-परुळे मार्गावरून होणारी वाळू वाहतूक बंद केल्यामुळे सर्व अवजड डंपरच्या साह्याने होणारी वाळू वाहतूक चौके- काळसे-धामापूर मार्गे वळविली. त्यामुळे या मार्गावर वैध तसेच विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या शेकडो डंपरमुळे रस्ता नूतनीकरणाच्या कामावर वाईट परिणाम होत आहे.

परिणामी ग्रामस्थांना रस्त्यावर चालणे मुश्‍कील झाल्याने आज काळसे सरपंच केशव सावंत यांच्या नेतृत्वाखाली काळसे येथे रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले. परंतु रास्ता रोको सुरू करण्यापूर्वी मालवण पोलिसांनी सरपंच केशव सावंत आणि उपस्थित ग्रामस्थांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून जिल्ह्यात जमावबंदी आदेश जारी असल्याची कल्पना दिली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा सन्मान करून काळसे ग्रामस्थांनी अवजड आणि अवैध वाळू वाहतुकीसाठी होणारी डंपर वाहतूक थांबवण्यासाठी पुकारलेले रास्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित केले. 

दरम्यान पाट परुळे मार्गावरील काळसे मार्गावर वळविण्यात आलेली वाहतूक तत्काळ थांबवावी अन्यथा पूर्वकल्पना न देता पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला. याविषयी लवकरच प्रांतांची भेट घेऊन आपल्या समस्या त्यांच्या समोर मांडून दाद मागणार असल्याचे सरपंच केशव सावंत यांनी सांगितले. 

स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी काळसे येथे येऊन सरपंच आणि ग्रामस्थांशी चर्चा केली. तहसीलदारांची भेट घेऊन अवैध आणि रात्रीच्या वेळी होणारी वाळू वाहतूक बंद करू असे आश्वासन दिले.

माजी सभापती राजेंद्र परब, मिलिंद काळसेकर, श्रीकृष्ण भाटकर, अमोल परब, नाथा परब यांच्यासह काही ग्रामस्थ तसेच पोलिस उपनिरीक्षक डॉ. बालाजी सवंडकर, दशरथ चव्हाण, सचिन पाटील, विजय धुरी, वाय. डब्ल्यू. सराफदार, एस. आर. तांबे, रूपेश सारंग, वाहतूक पोलिस सूरजसिंग ठाकूर, एम. डी. साबळे, पोलिस पाटील विनायक प्रभू आदी उपस्थित होते. 
 

Web Title: Sindhudurg News Kalse Dumper agitation cancelled