चौपदरीकरणाच्या वाढीव मोबदल्यासाठी गुरूवारी कणकवली बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 डिसेंबर 2017

कणकवली - चौपदरीकरणाच्या वाढीव मोबदल्यासाठीची शासकीय पातळीवरील टोलवाटोलवी खूप झाली. आता व्यापारी बांधवांना प्रखर आंदोलनाशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे गुरुवारी (ता. ७) प्रशासनाचा निषेध म्हणून कणकवली शहर बंद ठेवून मूक मोर्चा काढला जाणार आहे.

कणकवली - चौपदरीकरणाच्या वाढीव मोबदल्यासाठीची शासकीय पातळीवरील टोलवाटोलवी खूप झाली. आता व्यापारी बांधवांना प्रखर आंदोलनाशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे गुरुवारी (ता.७) प्रशासनाचा निषेध म्हणून कणकवली शहर बंद ठेवून मूक मोर्चा काढला जाणार आहे. तसेच या आंदोलनाची दखल न घेतल्यास शहरात चौपदरीकरणाचे कामच होऊ देणार नाही, अशी माहिती महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पग्रस्तांच्या संघर्ष समितीचे अध्यक्ष उदय वरवडेकर यांनी दिली.

कणकवली बंद मध्ये शहरातील विविध संघटना सहभागी होत आहेत. गुरुवारी (ता. ७) शहरातील काशीविश्‍वेश्वर मंदिराकडून सकाळी नऊ वाजता मूक मोर्चा निघणार आहे. यात व्यापारी बांधवांसह संपूर्ण शहरवासीयांनीही सहभागी व्हावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. 

या पत्रकार परिषदेला कणकवली व्यापारी संघाचे अध्यक्ष विशाल कामत, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, नगरसेवक बंडू हर्णे, समीर नलावडे, अनिल शेट्ये, शिशिर परुळेकर, रत्नाकर देसाई, विलास कोरगावकर, नितीन पटेल, रामदास मांजरेकर, संजय मालंडकर, जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष महेश नार्वेकर, चंदू कांबळी आदी उपस्थित होते.

कणकवली शहरातील महामार्ग प्रकल्पग्रस्तांना तुटपुंजा मोबदला मिळाला आहे. वाढीव मोबदल्यासाठी व्यापारी बांधवांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, महसूलमंत्री, मुख्यमंत्री ते केंद्रीय वाहतूक मंत्र्यांची भेट घेतली. सर्वांनीच मोठमोठी आश्‍वासने दिली. यात गडकरी हवा तेवढा मोबदला मिळेल असे सांगतात. तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील लवादाकडे अपील करा, असे सांगतात. लवादाचे अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी गुणक वाढल्याखेरीज भरपाई वाढणार नसल्याने सांगतात. एकूणच सर्वच मंत्री, अधिकारी टोलवाटोलवीची करीत आहेत. यात सर्वच प्रकल्पग्रस्तांच्या वाऱ्यावर येणार आहेत. प्रांताधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या निवाड्याचा जाहीर निषेधही केला. 

आंदोलनाची दखल न घेतल्यास, आंदोलन तीव्र करण्याचा व पुढील सर्व परीणामास शासन जबाबदार असेल असा इशारा महामार्ग प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष उदय वरवडेकर यांनी दिला.

कणकवली बंद मध्ये कणकवली शहर व्यापारी संघटना, स्टॉल  व्यावसायिक संघटना, नाभिक संघटना, सुवर्णकार संघटना, हॉटेल मालक संघटना, बेकरी मालक, रोटरी क्‍लब, रिक्षा चालक-मालक, मुस्लीम समाज संघटना, सिंधुदुर्ग जिल्हा फुटवेअर असोसिएशन शाखा कणकवली, ज्येष्ठ नागरिक संघटना, भाजी व्यावसायिक, विदेशी मद्य संघटनांनी बंदला पाठिंबा दिला आहे. तसेच राजकीय पक्षांनीही या बंदला पाठिंबा दिला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

पुनर्वसन अशक्‍य - रामदास मांजरेकर
शासनाने महामार्ग चौपदरीकरणात बाधित प्रकल्पग्रस्तांना नगण्य मूल्य देत प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडले. यात काही बाधितांची दखलही शासनाने घेतलेली नाही. तर भाडेकरूबाबत कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. जे व्यावसायिक चौपदरीकरणात विस्थापित होत आहेत त्यांचे या मोबदल्यात पुनर्वसन अशक्‍य आहे. 

प्रक्रिया चुकीची - रत्नाकर देसाई 
कणकवली शहरातील मालमत्ता आणि जमिन यांची संपूर्ण मुल्यांकन प्रक्रिया चुकीची झाली आहे. प्रकल्पग्रस्तांचे हित न पाहता प्रशासनाने केवळ सोपस्कार पार पाडले आहेत.. थ्रीडी नोटीस नंतर घेतलेल्या हरकतींची सुनावणीच झालेली नाही. 

प्रत देण्याला उशीर - शिशिर परुळेकर
निवाड्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल करण्यासाठी निवाडा आणि त्याच्या विवरण पत्र आवश्‍यक आहे. त्याबाबतची मागणी प्रांताधिकाऱ्यांकडे केल्यानंतर पंधरा ते वीस दिवसानंतर ही प्रत दिली जाते. यात लवादाकडे दाद मागण्यासाठी विलंब होत आहे.

सहनशीलता पाहू नका - बंडू हर्णे
शहरातील मालमत्तांचे मुल्यांकन करताना अत्यंत नकारात्मक विचार करण्यात आलाय. शहरातील मालमत्तांचे फेर मुल्यांकन व्हायलाच हवे. तुटपुंजा निवाडा देऊन कणकवलीकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असा इशारा नगरसेवक बंडू हर्णे यांनी दिला.

प्रशासनाकडून चुकीची माहिती - अनिल शेट्ये
भाडेकरूंना मोबदला मिळण्याबाबत कायद्यात तरतूद आहे. परंतु  सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी मात्र भाडेकरूंना न्यायालयात जाण्याच्या सूचना देऊन चुकीची माहिती देत असल्याचा आरोप अनिल शेट्ये यांनी केला.

Web Title: Sindhudurg News Kanakavli Shutdown on Thursday