कसई दोडामार्गमध्ये नाट्यमय सत्ताबदल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

दोडामार्ग - कसई दोडामार्ग नगरपंचायतीत अडीच वर्षांनी सत्ताबदल झाला. शिवसेनेने भाजपच्या चार आणि मनसेच्या एका सदस्याच्या साथीने आपला झेंडा फडकवला. नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या लीना कुबल ९ विरुद्ध ५ मतांनी, तर उपनगराध्यक्षपदी भाजपचे गटनेते चेतन चव्हाण ९ विरुद्ध ७ मतांनी विजयी झाले.

दोडामार्ग - कसई दोडामार्ग नगरपंचायतीत अडीच वर्षांनी सत्ताबदल झाला. शिवसेनेने भाजपच्या चार आणि मनसेच्या एका सदस्याच्या साथीने आपला झेंडा फडकवला. नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या लीना कुबल ९ विरुद्ध ५ मतांनी, तर उपनगराध्यक्षपदी भाजपचे गटनेते चेतन चव्हाण ९ विरुद्ध ७ मतांनी विजयी झाले.

भाजप नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार रेश्‍मा कोरगावकर यांना भाजपकडे पाच सदस्य असूनही केवळ त्यांचेच मत पडले. उपनगराध्यक्ष निवडीवेळी त्या तटस्थ राहिल्या तर स्वाभिमानची पाच आणि राष्ट्रवादीची दोन अशी सात मते स्वाभिमानच्या हर्षदा खरवत यांना मिळाली. उपनगराध्यक्ष चव्हाण यांना मनसेच्या रामचंद्र ठाकूर यांच्यासह भाजप आणि शिवसेनेची मिळून नऊ मते पडली. नगराध्यक्ष निवडीवेळी राष्ट्रवादीच्या उपनगराध्यक्ष साक्षी कोरगावकर आणि नगरसेवक अरुण जाधव अनुपस्थित होते. भाजपच्या अधिकृत उमेदवार कोरगावकर यांचे ते सूचक अनुमोदक होते; पण निवडी वेळी दोघे अनुपस्थित होते. हात उंचावून मतदान झाले. प्रांत सुशांत खांडेकर आणि मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

गतवेळी शिवसेना भाजपकडे प्रत्येकी पाच नगरसेवक असूनही राजकीय सुंदोपसुन्दीमुळे सहा संख्याबळ असलेल्या काँग्रेस आघाडीच्या हातात सत्ता गेली होती. त्यावेळी त्यांना सहकार्य करणारा एक सदस्य अपात्र ठरला होता. भाजपच्या कोरगावकर यांनी कमबॅक केले होते. बहुमत असूनही सत्ता स्थापन करण्यात अडसर ठरलेल्याना बाजूला ठेवत शिवसेना भाजपच्या आठ नगरसेवकांनी मनसेला सोबत घेत सत्ता स्थापन केली.

असे झाले मतदान....(कंसात मते)

नगराध्यक्ष
 लिना कुबल (९) - शिवसेना ४, भाजप ४, मनसे १
 उपमा गावडे (५)- स्वाभिमान ५
 रेश्‍मा कोरगावकर (१) - स्वतःचे
 राष्ट्रवादीचे दोन सदस्य अनुपस्थित

उपनगराध्यक्ष
 चेतन चव्हाण (९) - शिवसेना ४, भाजप ४, मनसे १
 हर्षदा खरवत (७) -  स्वाभिमान ५, राष्ट्रवादी २
 रेश्‍मा कोरगावकर - तटस्थ

अडीच वर्षांपूर्वी जनतेने सत्ता स्थापनेसाठी कौल दिला होता; पण काही व्यक्तींमुळे सत्ता आली नाही. त्याचे उट्टे आज काढले. यापुढे कसई दोडामार्ग विकासासाठी कटिबद्ध आहोत. आम्हाला पक्षाचा व्हीप मिळालेला नाही; मात्र कुणी कितीही बदनामी करो, आम्ही भाजपचेच आहोत.
- चेतन चव्हाण,
उपनगराध्यक्ष

सर्वांना सोबत घेऊन काम करणार. गावाचा विकास हाच ध्यास आहे.
- लीना कुबल,
नगराध्यक्ष

 

Web Title: Sindhudurg News Kasai Dodamarg Nagarpanchayat Election