कोकण विधानपरिषद निवडणूक विजयाच्या चाव्या ठाकूर, राणेंकडे 

शिवप्रसाद देसाई
शुक्रवार, 4 मे 2018

सावंतवाडी - विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातील विजयाच्या चाव्या पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि स्वाभिमान पक्षाचे संस्थापक खासदार नारायण राणे यांच्या हातात आहेत. शिवसेनेचे उमेदवार राजीव साबळे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार तथा माजी मंत्री सुनील तटकरेंचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांच्यात खरी लढत आहे.

सावंतवाडी - विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातील विजयाच्या चाव्या पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि स्वाभिमान पक्षाचे संस्थापक खासदार नारायण राणे यांच्या हातात आहेत. शिवसेनेचे उमेदवार राजीव साबळे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार तथा माजी मंत्री सुनील तटकरेंचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांच्यात खरी लढत आहे. विजयासाठी 471 ही मॅजीक फिगर गाठायची असल्यास साबळेंसाठी आमदार ठाकूर तर तटकरेंसाठी खासदार राणे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. घोडेबाजार मात्र तेजीत येणार आहे. 

या पदावर पूर्वी सुनील तटकरेंचे भाऊ अनिल तटकरे निवडून आले होते. त्यावेळी विजयाची गणिते जुळवण्यासाठी फोडाफोडीचे राजकारण झाले होते. आताही कॉंटेकी टक्‍कर असल्याने घोडेबाजार तेजीत असणार आहे. शिवसेना-भाजपची अप्रत्यक्ष युती झाली असली तरी ती प्रत्यक्षात कीती पाळली जाणार याबाबत प्रश्‍न आहे. मतदारसंघात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रभावाखालील भाजपच्या मतांची संख्या जास्त आहे. श्री. ठाकूर भाजपचे असले तरी त्यांचे घराणे याआधी शेकाप व कॉंग्रेसशी संबंधित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी स्वतः लक्ष घातले तरच त्यांच्याकडील भाजपची मते शिवसेनेकडे वळू शकतात. यासाठी या दोन्ही पक्षातील मनोमिलन किती प्रभावीपणे होते यावरच बरीच गणिते अवलंबून आहेत. शिवसेनेने उमेदवारी दिलेले ऍड. साबळे यांचे वडील अशोक साबळे माणगावमधून पूर्वी आमदार होते. त्यांचा या भागावर प्रभाव होता. ऍड. साबळे यांनी तटकरेंसोबतही काम केले आहे. यानंतर ते शिवसेनेत आले. 

अनिकेत तटकरे संभाव्य मतांमध्ये युतीच्या तुलनेत थोडे मागे दिसत असले तरी सुनील तटकरेंचे पाठबळ ही त्यांची मजबूत बाजू आहे. नारायण राणेंची भूमिका तटकरेंसाठी महत्त्वाची आहे. त्यांच्याकडे जवळपास नव्वद मते आहेत. नुकत्याच झालेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीत स्वाभिमान आणि राष्ट्रवादीची झालेली युती याच निवडणुकीची पूर्व तयारी मानली जात होती. राणेंकडे असलेली मते एक गठ्‌ठा आहे. शिवाय इतर मते फोडण्याची ताकद सिंधुदुर्गात राणेंकडे आहे. यामुळे तटकरेंच्या दृष्टीने राणे काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे. 

अशी आहेत \संभाव्य मते 
* मतदारसंघाचे नाव - रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य मतदारसंघ 
* एकूण मतांची संख्या - 941 
* विजयासाठीची मॅजीक फिगर - 441 
* शिवसेनेची मते - 291 
* भाजपची मते - 160 
* कॉंग्रेसची मते - 60 
* शेकापची मते - 95 
* मनसेची मते - 20 
* राष्ट्रवादीकडील मते - 170 
* महाराष्ट्र स्वाभिमानची मते - 90 
* इतर मते - 54 
(वरील आकडेवारी अंदाजे आहे.) 

Web Title: Sindhudurg News Konkan Legislative Council election