कोकण रेल्वे दुसऱ्या दिवशीही विस्कळीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

कणकवली - सावंतवाडी-झाराप स्थानका दरम्यान झालेल्या दुरांतो एक्‍स्प्रेस अपघातानंतर, आज दुसऱ्या दिवशीही कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत राहिले. प्रमुख गाड्या तीन तास विलंबाने धावत होत्या. तर काल (ता. 26) मुंबईहून येणाऱ्या गाड्या रात्री दहा नंतर दाखल झाल्याने प्रवाशांना घर गाठताना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. 

कणकवली - सावंतवाडी-झाराप स्थानका दरम्यान झालेल्या दुरांतो एक्‍स्प्रेस अपघातानंतर, आज दुसऱ्या दिवशीही कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत राहिले. प्रमुख गाड्या तीन तास विलंबाने धावत होत्या. तर काल (ता. 26) मुंबईहून येणाऱ्या गाड्या रात्री दहा नंतर दाखल झाल्याने प्रवाशांना घर गाठताना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. 

कोकण रेल्वेचे मार्ग गुरुवारी (ता.26) सायंकाळी 7.20 वाजता सुरळीत झाला. त्यानंतर कोकणकन्या, तुतारी एक्‍स्प्रेस, मंगलोर, राजधानी एक्‍स्प्रेस या गाड्या मुंबईकडे रवाना करण्यात आल्या. तर सिंधुदुर्गात येणारी दिवा पॅसेंजर, मांडवी एक्‍स्प्रेस, मंगला एक्‍स्प्रेस या गाड्या रात्री दहा नंतर रेल्वे स्थानकांत दाखल झाल्या. तोपर्यंत गावी जाणाऱ्या नियोजित एस.टी. बसेस निघून गेल्याने, प्रवाशांना खासगी वाहन करून आपापले गाव गाठावे लागले. या प्रवासासाठी दोनशे ते पाचशे रुपयापर्यंत भाडेही द्यावे लागल्याने, प्रवाशांतून तीव्र नाराजीही व्यक्‍त झाली. 

दुरांतो अपघातानंतर कोकणकन्या, तुतारी, मंगलोर ह्या गाड्या अडीच तास विलंबाने रवाना करण्यात आल्या होत्या. याच गाड्या परतून कोकणात येतात. त्यामुळे सिंधुदुर्गात येणारी कोकणकन्या एक्‍स्प्रेस आज तीन तास विलंबाने धावत होती. याखेरीज वेरावळ-तिरूवनंतपुरम तीन तास, एलटीटी-करमळी 3.30 तास, तुतारी एक्‍स्प्रेस 2 तास आणि मंगलोर एक्‍स्प्रेस दोन तास विलंबाने धावत होत्या. तर मुंबई सीएसटी स्थानकातून कोकणात येणारी मांडवी एक्‍स्प्रेस आज (ता.27) सकाळी 7.10 ऐवजी सकाळी 10.50 वाजता सोडली जाणार असल्याचे मध्यरेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. त्यामुळे सायंकाळी सहाच्या सुमारास सिंधुदुर्गात येणारी मांडवी एक्‍स्प्रेस रात्री साडे नऊ नंतर दाखल होण्याची शक्‍यता रेल्वेकडून व्यक्‍त करण्यात आली. 

चाकरमान्यांना फटका 
सध्या दिवाळीच्या सुट्टीत आलेले चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. सुट्ट्या पूर्व नियोजित असल्याने अनेकांनी काही महिन्यापूर्वी कोकण रेल्वेची तिकीटे आरक्षित केली होती. मात्र वेळापत्रक विस्कळीत झाल्याचा सगळ्यात जास्त फटका त्यांना बसला. 

Web Title: Sindhudurg News Konkan railway running late