सिंधुदुर्गात पुन्हा ‘लेप्टो’

तुषार सावंत
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

सिंधुदुर्गात २१ वर्षांपूर्वी लेप्टो स्पायरोसीसचा पहिला रुग्ण सापडला. यानंतर या जीवघेण्या तापाने ऐन शेतीच्या हंगामात जिल्हावासीयांना बेजार केले आहे. शेतकऱ्याच्या जीवावर उठणारा ताप अशी ओळख ‘लेप्टो’ने निर्माण केली. गेली दोन वर्षे याचा प्रादुर्भाव कमी झाला होता. पण, यंदा पुन्हा ‘लेप्टो’ने डोके वर काढल्याने जिल्हावासीय भीतीच्या छायेखाली, तर आरोग्य यंत्रणा हतबलतेच्या ओझ्याखाली दबली गेली आहे. एकंदर लॅप्टो स्पायरोसीसविषयीचा घेतलेला हा आढावा... 

पहिला रुग्ण...
कणकवली प्राथमिक आरोग्य केंद्रात १९९६ ला पहिला रूग्ण आढळला. यावेळी तापाची साथ आली होती. त्या काळात विविध उपचार करून ताप नियंत्रणात येत नव्हता. त्यावेळी अधिक माहिती मिळवीत असताना तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. बी. जी. शेळके यांच्या लेप्टोसदृश्‍य ताप असल्याचे प्रथम निदर्शनास आले. त्यानंतरच्या गेल्या २१ वर्षात लेप्टोसदृश्‍य तापाची साथ वाढताना दिसत आहे. या तापसरीत रूग्णांच्या रक्तातील प्लेटलेट घटून रूग्णाचा बळी जातो, असे निदर्शनास आले आहे. 

सप्टेंबरपासून होते सुरवात...
भातशेती हंगामात सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात लेप्टोसदृश्‍य तापाची साथ सुरू होते. गेल्या २०१० पर्यत सलग १५ वर्षे या साथीचा प्रादुर्भाव जिल्ह्यात आढळला आहे. मागील काही वर्षात लेप्टो पॉझिटीव्हचे शेकडो रूग्ण आढळले आहेत. २००७ मध्ये जिल्ह्याच्या विविध गावामध्ये सर्वाधिक ४९ रूग्ण आढळले होते. या तापाचा प्रादुर्भाव कणकवली तालुक्‍यात सर्वाधिक दिसून आला होता; मात्र २०१० मध्ये जिल्ह्यात या साथीने कहरच केला. त्यानंतर अनेक उपाययोजना करून आणि जनजागृतीने या साथीवर नियंत्रण मिळवले. पण या महीन्यात लेप्टोसदृश्‍य तापसरीने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. 

कसा होतो प्रसार?
जंगली प्राणी, उंदीर, डुक्कर, गाय, म्हैस, मांजर, कुत्रा यांच्या लघवीवाटे जंतूंचा प्रादुर्भाव होतो. विशेषतः शेतात काम करत असताना किंवा गोठ्यात जनावरांची विष्टा काढताना जखमेवाटे या जंतूंचा मानवी शरीरात शिरकाव होतो. 

ठराविक काळातच फैलाव...
या साथीचा प्रादुर्भाव पावसाळ्याच्या सुरवातीला आणि त्यानंतरच्या टप्प्यात होतो. विशिष्ट तापमानाच्या काळातच हे विषाणू फैलावत असल्याने हा प्रकार घडत असावा, असा अंदाज वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करतात. या तापाची शिकार बनणाऱ्यांमध्ये शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. भात लावणीसाठी गेलेल्यांना याचा जास्त प्रादुर्भाव होतो; पण गेल्या वर्षी शेतीशी संबंध नसलेल्यांनाही या तापाने ग्रासले. यातील काहींनी प्राणही गमावले.

अस्वच्छता कारण...
जिल्ह्याच्या शहरी भागात स्थानिक प्रशासनाकडून कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जात नाही. रस्त्या-रस्त्यावर किंवा वस्तीत उभारलेले कचरा पेट्या बाहेर कचरा फेकलेला आढळतो. हा कचरा खाण्यासाठी घुशी, उंदीर, रानटी प्राणी धाव घेतात. येथेच रोगराई पसरणे आणि जंतूंची उत्पत्ती सुरू होते. ग्रामपंचायत पातळीवरही कचऱ्याची विल्हेवाट लागत नाही. त्यामुळे अस्वच्छतेच्या कारणाने लेप्टोसारखा आजार बळावत आहे.

यापूर्वी शंभर गावांत...
लेप्टोस्पारोसीस तापाने रूग्ण दगावत असल्याचे संशोधन सिंधुदुर्गात १९९६ मध्ये प्रथम उघडकीस आले. कणकवलीतील डॉ. बी. जी. शेळके यांनी हे संशोधन केले होते. त्यावर्षी कणकवली तालुक्‍यातील वरवडे गावातील आठ रूग्ण आठवडाभराच्या कालावधीत दगावले होते. त्यानंतर लेप्टोचे दगावणाऱ्यांची संख्या आब्रंड (ता. कुडाळ) गावात मोठी होती. लेप्टो साथीची व्याप्ती शिवडाव, वरवडे, कलमठ, हळवल, वागदे आदी गावात होती. गेल्या एकवीस वर्षात ही साथ जिल्ह्यातील शंभर पेक्षा अधिक गावात पोचली. 

कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रडारवर...
कणकवली उपजिल्हा रूग्णालयात गेल्या काही दिवसापासून तापसरीच्या रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. या तापसरीत प्लेटलेट घटण्याची संख्या रूग्णामध्ये वाढत आहे. हळवल गावातील रूग्णात वाढ होत आहे. याच बरोबर आता सावंतवाडी आणि कुडाळमधील काही गावात लेप्टोस्पारोसीसचे रूग्ण सापडत आहेत. या आधी कणकवलीतच याचा प्रादुर्भाव जास्त असायचा. आता याचे प्रभावक्षेत्र सावंतवाडीपर्यंत विस्तारल्याचे चित्र आहे.

संशोधन झाले; पण...
सिंधुदुर्गात गेल्या काही वर्षात जी तापसरी सुरू आहे. तिचे नेमके निदान व्हावे, यासाठी अंदमान येथील केंद्रीय लेप्टो संशोधन पथकाला पाचारण करण्यात आले होते. यावेळी तापसरीच्या साथीने पंचवीस जणांचे मृत्यू झाले होते. तर १५८ जणांची चाचणी पॉझिटीव्ह आली होती. साथीची व्याप्ती वाढून वेगवेगळे गाव ही बाधित झाले होते. त्यावेळच्या प्राथमिक अहवालात लेप्टोला ‘हेन्टपल्मरी’ विषाणूची जोड मिळाली हे स्पष्ट झाले होते; मात्र गेल्या तीन-चार वर्षात तापसरीचा तसा उद्रेक झाला नाही; मात्र माकडतापाने जिल्ह्यात हाहाकार माजवला होता. आता पुन्हा लेप्टोने डोके वर काढल्याने चिंता वाढली आहे. 

भात कापणीचा हंगाम सुरू असताना जमिनीत साचलेल्या पाण्यातून रानटी प्राण्यांमुळे लेप्टोपायरोसीस हा आजार उद्‌भवलेला आहे. यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. ताप आलेल्या रूग्णांनी शासकीय रूग्णालयात उपचार घ्यावेत.
- डॉ. योगेश साळे, 

जिल्हा आरोग्य अधिकारी, सिंधुदुर्ग

ही आहेत लक्षणे...
डोकेदुखी, तीव्र ताप, थंडी वाजणे, डोळे सुजणे, स्नायुमध्ये वेदना, कावीळ व रक्तस्त्राव होणे. 

खबरदारी काय घ्यावी?
 जखम बॅण्डेजने बांधावी दुषित पाणी, माती संपर्क टाळावा  पाळीव प्राणी संपर्क नसावा उंदीर घुशींचा नायनाट करावा  शेतात जाणे टाळावे 

नियंत्रण कसे ठेवावे?
लेप्टोस्पायरोसीस ताप हा विशेषतः पावसाळ्यानंतरच उद्‌भवतो. भातशेती किंवा चिखलात काम करणाऱ्या व्यक्तीला याची लागण होते. परदेशात या तापाची लागण रोखण्यासाठी विशेष उपाय केले जातात. त्याच धर्तीवर शेतात काम करणाऱ्या व्यक्तीच्या हातात हातमौजे, पायात गमबूट आणि डोळ्यात गॉगल असल्यास संसर्ग रोखता येतो. 

जनजागृती गरजेची...
यंदा जी तापसरी सुरू झाली आहे. या तापाची लक्षणे लेप्टोस्पायरोसिस सारखी आहेत. या तापसरीने रूग्णांच्या शरीरातील मल्टीऑर्गन बाधित झाले आहेत. यातील विषाणूची बाधा फार वेगाने झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला पुन्हा एकदा कंबर कसावी लागणार आहे. या तापसरीबाबत जनजागृती करावी लागणार आहे. 

प्रशासनाकडून दक्षता...
- प्लेटलेट रोपण यंत्रणा पुरवठा 
 -रक्त तपासणी मोहिम
- गावागावात जनजागृती
- रूग्णावर तात्काळ उपचार

उपचारांसाठी जिल्ह्याबाहेरच...
गेल्या काही वर्षात या तापसरीने डोकेवर काढूनही लेप्टोस्पायरोसीसच्या रुग्णांवर आणि प्लेटलेटस्‌ घटलेल्या अस्वस्थ रुग्णांवर जिल्ह्याबाहेरच उपचार होत आहेत. यासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालय आणि गोव्यातील शासकीय मेडिकल कॉलेज हाच पर्याय आहे. सध्या येथे दोन स्वतंत्र कक्ष आणि २४ तास मनुष्य सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. असे असले तरी आरोग्य यंत्रणेकडे अपुरे कर्मचारी, तज्ज्ञ अशा कितीतरी समस्या आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांनाही मर्यादा पडत आहेत. हे प्रश्‍न मंत्रालयात बसलेले वरिष्ठ अधिकारी आणि मंत्रीच सोडवू शकतात; पण त्यांना त्याचे सुख-दुःख नाही.

Web Title: Sindhudurg News leptospirosis in District