घनकचरा व्यवस्थापनासाठी मालवण पालिकेला 2 कोटी - महेश कांदळगावकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

मालवण - येथील पालिकेला 'स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. शहरे हागणदारी मुक्त करणे व शहरे घनकचरा व्यवस्थापन करून स्वच्छ करणे यासाठी राज्याच्या नगरविकास विभागाने सुमारे दोन कोटी रुपयांच्या विविध कामांना मंजुरी दिली आहे.

मालवण - येथील पालिकेला 'स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. शहरे हागणदारी मुक्त करणे व शहरे घनकचरा व्यवस्थापन करून स्वच्छ करणे यासाठी राज्याच्या नगरविकास विभागाने सुमारे दोन कोटी रुपयांच्या विविध कामांना मंजुरी दिली आहे. पालिकेकडे निधी वर्ग झाल्यानंतर तत्काळ घनकचरा विलगीकरण करण्यास सुरवात केली जाईल, अशी माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व आरोग्य सभापती आप्पा लुडबे यांनी पालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

नगर विकास विभागाअंतर्गत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या उच्चाधिकार समितीने राज्यातील मॉडेल ठरलेल्या 34 शहरांना 81 कोटी 74 लाख 92 हजार रुपये मंजूर केले. यात येथील पालिकेला एकूण 1 कोटी 95 लाख 358 रुपये मंजूर करण्यात आले. केंद्र व राज्य शासनाच्या तिजोरीतील निधी दोन टप्प्यात वितरित केला जाणार असून या प्रकल्पासाठी कोणतेही वाढीव अनुदान शासनाकडून मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे असे श्री. कांदळगावकर यांनी सांगितले. 

श्री. लुडबे म्हणाले, ""घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची यशस्विता ही घनकचऱ्याच्या निर्मितीच्या जागीच विलगीकरण करून त्याचे वर्गीकरण करण्यात आहे. शासनाने जून अखेरीपर्यंत शहरातील घनकचऱ्याचे किमान 90 टक्के विलगीकरण करणे बंधनकारक असल्याचे म्हटले असल्याने विलगीकरण केलेल्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.'' 

या वेळी नितीन वाळके, आकांक्षा शिरपुटे आदी उपस्थित होते. 

प्रकल्प आराखड्यात मंजूर कामे अशी- 
पाच घंटागाड्या- 31 लाख 25 हजार रुपये, कंपोस्ट खत मशिन- 25 लाख रुपये, विलगीकरण लोडर- 12 लाख 6 हजार 607 रुपये, सुका कचरा प्रक्रिया शेड- 11 लाख 47 हजार 682 रुपये, ओला कचरा प्रक्रिया शेड- 11 लाख 47 हजार 682 रुपये, जुना कचरा विल्हेवाट- 34 लाख 90 हजार 175 रुपये, जनजागृती कार्यक्रम- 17 लाख 76 हजार 941 रुपये, फायर सिलिंडर- 45 हजार 740 रुपये, वजन काटा- 5 लाख 71 हजार 825 रुपये, प्लास्टिक दबाई मशिन- 2 लाख 12 हजार 400 रुपये, तारांचे कंपाउंड- 1 लाख 37 हजार 338 रुपये, कचरा विलगीकरण- 5 लाख 4 हजार 135 रुपये, अंतर्गत रस्ते- 4 लाख 40 हजार 502 रुपये, सांडपाणी साठवणे व बाष्पीभवन टाकी- 1 लाख 61 हजार 947 रुपये, अंतर्गत गटार व्यवस्था- 7 लाख 1 हजार 567 रुपये, कार्यालय- 5 लाख 29 हजार 401 रुपये, वजन काटा कंट्रोल रूम- 2 लाख 8 हजार 66 रुपये, टाकाऊ वस्तू प्लॅटफॉर्म- 9 लाख 30 हजार 308 रुपये. 
 

Web Title: Sindhudurg News Mahesh Kandalgavkar press