ओरोसमध्ये उद्या मराठा संकल्प दिन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

कुडाळ - सिंधुदुर्ग मराठा मूक क्रांती मोर्चाच्या वर्षपूर्तीनिमित्त संकल्प दिन व मराठा मेळाव्याचे आयोजन ओरोस येथील शरद कृषी भवनामध्ये २३ ला दुपारी अडीच वाजता करण्यात येणार आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग मराठा मूक क्रांती मोर्चाचे मुख्य संयोजक ॲड. सुहास सावंत यांनी पत्रकार 
परिषदेत दिली.

कुडाळ - सिंधुदुर्ग मराठा मूक क्रांती मोर्चाच्या वर्षपूर्तीनिमित्त संकल्प दिन व मराठा मेळाव्याचे आयोजन ओरोस येथील शरद कृषी भवनामध्ये २३ ला दुपारी अडीच वाजता करण्यात येणार आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग मराठा मूक क्रांती मोर्चाचे मुख्य संयोजक ॲड. सुहास सावंत यांनी पत्रकार 
परिषदेत दिली.

येथील मराठा समाज कार्यालयात आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत सावंत म्हणाले, ‘‘कोपर्डी हत्याकांडाच्या पार्श्‍वभूमीवर ९ ऑगस्ट २०१६ पासून  महाराष्ट्रभर मराठा क्रांती मूक क्रांती मोर्चाचे आयोजन संपूर्ण राज्यभरात मराठा समाजाच्या वतीने केले होते. जिल्ह्यातही २३ ऑक्‍टोबर २०१६ ला ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधवांनी मोर्चा नेला होता. या मोर्चाला २३ ऑक्‍टोबरला एक वर्ष पूर्ण होत असून या दिवसाचे औचित्य साधून मराठा समाजाच्या वतीने मराठा मेळावा होणार आहे.

मेळाव्यात सिंधुदुर्ग मराठा फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा व ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या सर्व मराठा समाजातील सरपंचाचा सत्कार ही या मेळाव्यात करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मराठा समाजाची दिशा, ध्येय धोरण व भविष्यातील मराठा कसा असावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.’’

अध्यक्षस्थानी गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजन साळवी, नितेश राणे हे उपस्थित राहणार आहेत. तरी या मेळाव्याला सर्व मराठा समाज बांधव, भगिनींनी व मराठा समाजातील सर्व सरपंचांनी मोठ्या संख्येने, उपस्थित रहावे, असे आवाहन सावंत यांनी केले.

या वेळी सावंत म्हणाले,‘‘रत्नागिरी येथील तथाकथित पाटील बुवा प्रकरणी कोणीतरी खोटा बनाव करून वैभववाडी येथील आमच्या मराठा समाजातील चांगले व्यक्तिमत्त्व असणाऱ्या जयेंद्र रावराणे यांच्यावर पोलिसांनी कारवाई करण्याअगोदर विचार केला पाहिजे होता. रावराणे यांचे मराठा समाजाच्या चळवळीत मोठे असून त्यांच्याकडे गुन्हेगार म्हणुन न बघता ते आपलेच मराठा बांधव असुन त्यांना मराठा बांधवांचा पूर्णपणे पाठिंबा असुन त्यांच्या अडीअडचणीत मराठा समाज त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहणार आहे.’’

यावेळी सिंधुदुर्ग मराठा मुक क्रांती मोर्चाचे प्रभाकर सावंत, सचिन काळप, धीरज परब, संध्या तेरसे, प्रशांत राणे, प्रज्ञा राणे, संग्राम सावंत, चंद्रशेखर जोशी, प्रथमेश परब, शैलेश घोगळे हे उपस्थित होते. यावेळी पोलिस शहीद दिनानिमित्त शहीद झालेल्या पोलिसांना मराठा समाजाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.

Web Title: SIndhudurg News Maratha Sankalpa Din in Oros