नागरिकांच्या हस्तक्षेपामुळे गिळलेल्या भक्ष्यापासून अजगर राहिले दूर

अमोल टेंबकर
रविवार, 11 जून 2017

सावंतवाडी तालुक्‍यातील आंबोली जकातवाडी येथील शाळेजवळील मोकळ्या जागेत एका भल्या मोठ्या अजगराने सांबर (भेकरू) गिळल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळे आणि अजराला डिवचल्याने कष्टाने मिळवूून गिळलेले भक्ष तेथेच ओकून टाकत अजगर निघून गेला. याबद्दल वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) : सावंतवाडी तालुक्‍यातील आंबोली जकातवाडी येथील शाळेजवळील मोकळ्या जागेत एका भल्या मोठ्या अजगराने सांबर (भेकरू) गिळल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळे आणि अजराला डिवचल्याने कष्टाने मिळवूून गिळलेले भक्ष तेथेच ओकून टाकत अजगर निघून गेला. याबद्दल वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आंबोली जकातवाडीतील रिलान्सच्या टॉवरजवळ आज (रविवार) दुपारी तीन वाजता अजगराने भेकऱ्याला गिळल्यानंतर तो तसाच पडून होता. थोड्याच वेळात तेथे काही ग्रामस्थ व युवक पोहोचले. त्यांनी अजगराला डिवचले. दहा ते पंधरा किलोचे भेकरू गिळल्याने अजगराला हलता येत नव्हते. अशा अवस्थेत लोकांनी काठ्या घेवून त्याला डिवचले. त्यामुळे स्वत:च्या संरक्षणासाठी भक्ष तेथेच ओकून अजगर तेथून निघून गेले. त्यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिली. वनपाल एन. एस. यादव, किरण पाटील, बाळा गावडे यांनी घटनेचा पंचनामा करून भेकऱ्याला वनबागेत जाळले. नैसर्गिक प्रक्रियेत नागरिकांचा हस्तक्षेप झाल्याबद्दल सावंतवाडीचे सहायक उपवनसंरक्षक सुभाष पुराणिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

"अजगराला गिळल्याचे कोणाला तरी समजले. त्यानंतर ग्रामस्थांनी तेथे घटनास्थळी पोहोचलेले लोक फोटो काढण्यासाठी धडपड करत होते. त्यामुळे मोठ्या कष्टाने अजगराने मिळविलेले भक्ष त्याला खाता आले नाही. या संपूर्ण प्रकारात भक्षाचा प्राण गेला. आपण नैसर्गिक बाब हस्तक्षेपापासून दूर ठेवूच शकत नाहीत. अशा वेळी निसर्गप्रेमी, सजग नागरिक यांनी गर्दी होऊ न देता जमलेल्या लोकांना गडबड करू न देणे अशा उपाययोजना करणे गरजेचे होते.'
- सुभाष पुराणिक, सावंतवाडीचे सहायक उपवनसंरक्षक

Web Title: sindhudurg news marathi news python news konkan news