सागरी पर्यटक प्रवासी वाहतूक 26 पासून बंद करण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

मालवण - समुद्रात पावसाळी वातावरण बदलाला सुरवात झाली आहे. त्यामुळे बंदर विभागाने 26 मेपासून सागरी पर्यटक प्रवासी वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे वातावरणावर लक्ष ठेवून दिली जाणारी मुदतवाढ मिळावी, यासाठी किल्ला होडी सेवा संघटनेतर्फे दाद मागण्यात येण्याची शक्‍यता आहे. 

मालवण - समुद्रात पावसाळी वातावरण बदलाला सुरवात झाली आहे. त्यामुळे बंदर विभागाने 26 मेपासून सागरी पर्यटक प्रवासी वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे वातावरणावर लक्ष ठेवून दिली जाणारी मुदतवाढ मिळावी, यासाठी किल्ला होडी सेवा संघटनेतर्फे दाद मागण्यात येण्याची शक्‍यता आहे. 

दरम्यान याबाबतचे आदेश वेंगुर्ले प्रादेक्षिक बंदर अधिकारी कॅ. अजित तोपणो यांनी सर्व बंदर विभागांना दिले आहेत. तसेच आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचेही निर्देश दिले आहेत. त्यानुसार बंदर विभागाने सर्व संबंधितांना याची माहिती दिली आहे. 

दरवर्षी बंदर विभागाकडून 26 मेपर्यंत होडीसेवा व अन्य सागरी पर्यटन सुविधा सुरू ठेवण्याबाबत निर्देश आहेत. मात्र, वातावरणातील परिणामांचा विचार करता एक-एक दिवसांची मुदतवाढ पर्यटन सेवेसाठी दिली जात होती. यावर्षीही मुदतवाढ मिळण्याच्या आशेवर पर्यटन व्यावसायिक आहेत.

मात्र, मेरीटाईम विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मुदतवाढ देण्याचे अद्याप स्पष्ट केलेले नाही. सध्या येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल असल्याने शनिवारपासून होडी सेवा अगर साहसी क्रीडा प्रकार बंद झाल्यास पर्यटकांची गैरसोय होण्याची शक्‍यता आहे. 

यासंदर्भात बंदर विभागाशी संपर्क साधला असता, पर्यटकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. सागरी पर्यटक वाहतूक 26 मे पासून बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. होडी सेवा आणि इतरही समुद्रातील पर्यटन प्रवासी वाहतूक बंद केली जाणार आहे. देवबाग आणि तारकर्ली येथेही याची कार्यवाही केली जाईल. मुदतवाढीसंदर्भात अद्याप कोणतीही मागणी पुढे आलेली नाही. अशी मागणी झाल्यास ती प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांकडे पाठविली जाईल असे स्पष्ट करण्यात आले. 

Web Title: Sindhudurg News marine tourist passenger traffic closed from 26