माटणेतून बाबुराव धुरींची उमेदवारी

माटणेतून बाबुराव धुरींची उमेदवारी

दोडामार्ग - माटणे पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे तालुकाप्रमुख बाबूराव धुरी यांनी  उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रोहिणी रजपूत यांच्याकडे त्यांनी अर्ज सादर केला. भाजपचे पंचायत समिती सदस्य म्हणून माटणेतून निवडून आलेल्या भरत जाधव यांचा १३ जूनला वझरे तिठा येथील अपघातात मृत्यू झाल्याने ती जागा रिक्त झाली होती. त्यासाठी १३ डिसेंबरला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज (ता. २८) शेवटचा दिवस आहे.
माटणेची निवडणूक भाजप आणि शिवसेनेने प्रतिष्ठेची केली आहे. शिवसेनेचे बाबूराव धुरी याच जिल्हा परिषद मतदार संघातून उभे होते; पण त्यांचा १०० मतांनी पराभव झाला होता.

माटणे पंचायत मतदार संघात त्यांना सर्वाधिक मते मिळाली होती; पण जिल्हा परिषद मतदार संघात नव्याने समाविष्ट झालेल्या उसप गावातून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांना सर्वाधिक मते पडली आणि श्री. धुरी १०० मतांनी पिछाडीवर गेले. पराभव झाला म्हणून त्यांनी माटणे मतदार संघातील लोकांची कामे करणे सोडले नाही. निवडणुकीआधी ते जसे मतदारांना वेळ द्यायचे तसाच वेळ त्यांनी पराभवानंतरही देणे सुरूच ठेवले. त्यानंतर काही महिन्यात भरत जाधव यांचा मृत्यू झाला आणि ती जागा रिक्त झाली.

त्या जागी श्री. धुरी यांनीच अर्ज भरावा, असा आग्रह माटणे मतदारसंघातील मतदारांनी धरल्याने त्यांनी आज अर्ज दाखल केला. साहजिकच शिवसेना आणि भाजपने आता ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. भाजपला आपली जागा कायम राखायची आहे तर शिवसेनेला तेथे पंचायत समिती अथवा जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचा नसतानाही त्यांनी केलेल्या लाखो रुपयांच्या विकास कामामुळे, मतदारांसाठी पुरेपूर वेळ देऊन त्यांची वैयक्तिक आणि सार्वजनिक लाभाची असंख्य कामे केल्यामुळे ती जागा शिवसेनेकडे मतदारांनी द्यावी, असे वाटते आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक चुरशीची होणार आहे. 

श्री. धुरी यांनी अर्ज दाखल करतेवेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख गणेशप्रसाद गवस, पंचायत समिती सदस्य धनश्री गवस, जिल्हा परिषद सदस्य संपदा देसाई, तालुका संघटक संजय गवस, विभागप्रमुख लक्ष्मण आयनोडकर, विजय जाधव, वसंत गवस, बाबी साटेलकर, बबलू पांगम, कृष्णा पर्येकर, सोमनाथ गवस, श्‍याम खडपकर, पांडुरंग गवस, रामचंद्र देसाई आदींसह माटणे मतदार संघातील अनेकजण उपस्थित होते.

दिवसभरात दोन अर्ज 
दरम्यान सोमवारी दिवसभरात दोन अर्ज दाखल झाले. त्यांतील एक श्री. धुरी यांचा तर दुसरा अर्ज रुपेश गवस यांनी भाजपकडून दाखल केला. गवस यांच्यासोबत भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली, तालुकाध्यक्ष सुधीर दळवी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. श्री. गवस हे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य म्हणून माटणेतून निवडून आले आहेत. काँग्रेस आज (ता. २८) अर्ज दाखल करण्याची शक्‍यता आहे. उमेदवार निश्‍चितीसाठी तालुकाध्यक्ष संतोषकुमार दळवी प्रयत्न करीत आहेत. स्वाभिमान पक्ष भाजपला मदत करण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com