म्हाडगूत बंधुंचा दिवसात सव्वालाख अंडी वितरीत करण्याचा संकल्प

अजय सावंत
मंगळवार, 23 जानेवारी 2018

कुडाळ - सिंधुदुर्गात लेअर कुक्‍कुटपालनाच्या माध्यमातून दिवसा एक लाख 20 हजार अंडी वितरीत करण्याचा आमचा संकल्प आहे. यासाठी 2018 मध्ये दहा हजार लेअर पक्षी घेणार आहोत. भविष्यात अनेकांना रोजगाराची संधी मिळेल, अशी माहिती पोल्ट्री व्यावसायिक प्रकाश व दिनेश म्हाडगूत या बंधुंनी दिली. 

कुडाळ - सिंधुदुर्गात लेअर कुक्‍कुटपालनाच्या माध्यमातून दिवसा एक लाख 20 हजार अंडी वितरीत करण्याचा आमचा संकल्प आहे. यासाठी 2018 मध्ये दहा हजार लेअर पक्षी घेणार आहोत. भविष्यात अनेकांना रोजगाराची संधी मिळेल, अशी माहिती पोल्ट्री व्यावसायिक प्रकाश व दिनेश म्हाडगूत या बंधुंनी दिली. 

तालुक्‍यातील वाडोस येथे म्हाडगूत बंधुंनी पाचहजार लेअरपक्षी घेऊन कुक्‍कूटपालन व्यवसायात यशस्वी घौडदौड केली आहे. आज या पार्श्‍वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. 

ते म्हणाले, गेली 15 वर्षे आम्ही म्हाडगूत बंधु (वाडोस) सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अंडी वितरीत करण्याचा व्यवसाय करीत आहोत. जवळपास 80 टक्‍के मार्केटमध्ये अंडी वितरणाचे कार्य चालू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकसंख्या, हॉटेल, पर्यंटनाचा कालावधी आणि घरगुती वापर यासाठी दिवसा लागणाऱ्या अंड्यांचे प्रमाणे हे एक लाखाच्या आसपास आहे, ही मागणी पूर्ण करण्यासाठी परजिल्ह्यातून अंडी मागवावी लागतात. परजिल्ह्यातील अंड्याची आवक ही सांगली, मिरज, हॉस्पेट (कर्नाटक) अशा ठिकाणाहून होते.

दररोज लागणाऱ्या अंड्यांची मागणी विचारात घेता जिल्ह्यामध्ये अंड्याचे उत्पादन होणे महत्त्वाचे वाटू लागले. ही बाब माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या निदर्शनास आणली. अंडी उत्पादन होण्यासाठी लागणारे अर्थसहाय्य जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून करण्याची ग्वाही त्यांनी दिली व जिल्हा बॅंक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या मार्गदर्शनातून आम्ही अंडी उत्पादन व विक्री व्यवस्था जबाबदारी स्वीकारली, असेही म्हाडगूत बंधु म्हणाले. 

मार्च 2017 मध्ये वाडोस पंचक्रोशीतील 12 शेतकरी व महिला यांना 300 प्रमाणे 5000 लेअर पक्षी उपलब्ध करून दिले व आजतगायत योग्य व्यवस्थापनातून 90 टक्‍के अंडी उत्पादन होते आहे. 

- म्हाडगूत बंधु

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लेअर फार्मिंगसाठी चांगले वातावरण असून भविष्यात व्यवसाय करण्यासाठी कुक्‍कुटपालन व्यवसायासाठी लागणारे अर्थसहाय्य जिल्हा बॅंकेतून दिले जाणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या सर्व सेवा सुविधा (पुलेट पक्षी, पिंजरा, खाद्य, ट्रे) आम्ही म्हाडगुत ब्रदर्स पोल्ट्री डेव्हलपमेंट सेल्स अँड सर्वीसच्या माध्यमातून लेअर कुक्‍कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना वितरीत करणार आहोत, अशीही माहिती म्हाडगूत बंधुंनी दिली. 

अंडी विक्रीची जबाबदारी आम्ही घेतल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भविष्यात लेअर कुक्‍कुटपालन व्यवसायामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या व्यवसायाची दखल कोकण आयुक्‍त देशमुख व जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी घेऊन या प्रकल्पाला प्रत्यक्ष भेट दिली आहे. शासन दरबारी सरकारी योजनेतून मदत करण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले आहे.

जिल्हा बॅंक संचालक अतुल काळसेकर व योगेश बेळणेकर यांच्या माध्यमातून लेअर कुक्‍कुटपालन योजना "चांदा ते बांदा" या योजनेतून आर्थिक सहाय्य उपलब्ध झाले आहे. ही सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कुडाळमध्ये म्हाडगुत ब्रदर्स पोल्ट्री डेव्हलपमेंट सेल्स अँड सर्वीसच्या नावे कार्यालय उघडण्यात आले आहे.

वाडोसमधील लेअर कुक्‍कुटपालन व्यावसायिक तसेच सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष सतिश सावंत, कार्यकारी अधिकारी डॉ. कुलकर्णी व भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान झाराप यांचे मोलाचे सहकार्य याकामी लाभत आहे, असेही म्हाडगूत बंधूनी सांगितले. 

Web Title: Sindhudurg News Mhadgut brothers poultry project story