मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाने डोकेदुखी

राजेश सरकारे
सोमवार, 25 जून 2018

पावसाळ्यात मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग सुस्थितीत असेल अशी ग्वाही ठेकेदारांसह, महामार्ग प्राधिकरण आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी दिली होती. प्रत्यक्षात महामार्गाची दुरवस्था थांबलेली नाही. पावसात खड्डेमय रस्त्यामधून प्रवास तर पाऊस थांबल्यानंतर धुळीचा त्रास अशा दुहेरी कोंडी वाहनचालकांसह प्रवाशांची झाली आहे. चौपदरीकरण पूर्ण होईपर्यंत मुंबई-गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा तर बनणार नाही ना, अशी भीती निर्माण झाली आहे. 

त्रुटी चव्हाट्यावर
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामातील त्रुटी पहिल्याच पावसात उघड झाल्या. खारेपाटण ते झाराप या दरम्यान अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी जाणे, शेतीमध्ये भरावी माती घुसणे असे प्रकार होत आहेत. दुसरीकडे महामार्गावरील खड्डे वाहन चालकांसाठी जीवघेणे ठरण्याची शक्‍यता आहे.

मलमपट्‌टी 
चौपदरीकरण करताना अस्तित्वात असलेल्या महामार्गालगत रूंदी वाढवून तेथे डांबरीकरण केले; मात्र या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याने या नव्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी अनेक ठिकाणी ग्रीट मिश्रीत खडी टाकली जातेय; मात्र या खडीची प्रचंड धूळ वाहन चालकांसह प्रवाशांना धोकादायक ठरत आहे. पाऊस थांबल्यानंतर महामार्गावरून वाहने जाताना खडीच्या धुळीचे लोट निघत आहेत. यात समोरून येणारे वाहनही दिसत नाही. सप्टेंबरमध्ये गणेशोत्सव आहे.  हजारो वाहने आणि लाखो चाकरमानी सिंधुदुर्गात येणार आहेत. तोपर्यंत मार्ग सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी ठेकेदारासह, महामार्ग विभागाला पार पाडावी लागणार आहे.

नव्या मार्गिकेला साईडपट्टी नाही
मुंबई-गोवा महामार्गावरील तयार झालेल्या नव्या मार्गिकेवरून काही ठिकाणी वाहतूक सुरू आहे. पण, या मार्गिकेच्या लगतचा भराव एक ते दोन फुटांनी खचला आहे. त्यामुळे मार्गिकेच्या बाहेर वाहन गेल्यास अपघाताची शक्‍यता आहे.

वाहने बेदरकार
नव्या मार्गिकेवरून बेदरकारपणे वाहने चालविली जात आहेत. या मार्गिकेला जोडणारे अनेक रस्ते आहेत. अचानक हायवेवर येणारी ही वाहने वाहन चालकांना दिसत नाहीत.

गणेशचतुर्थीपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावर एकही खड्डा राहणार नाही याची दक्षता घेत आहोत. ओसरगाव येथील नव्या मार्गीकेचे काम आठवडाभरात पूर्ण होईल. त्यानंतर  नव्या मार्गावरून वाहतूक सुरू केली जाणार आहे.
- के. के. गौतम,
डेप्युटी मॅनेजर दिलीप बिल्डकॉन

महामार्गावरील अधिकाऱ्यांनी हायवेवरच तैनात राहावे, जेथे रस्ता धोकादायक होईल तेथील कामे तातडीने करावीत, अशा सूचना महामार्ग विभागाला दिल्या आहेत. नव्या मार्गीकेवरून त्वरित वाहतूक सुरू करावी, असेही निर्देश ठेकेदारांना दिले आहेत.
- विनायक राऊत,
खासदार

Web Title: Sindhudurg News Mumbai-Goa Highway four track issue