नापणे विकास आराखडा हवेतच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

वैभववाडी - बारमाही वाहणारा नापणे धबधबा विकसित करण्याच्या हेतूने तीन वर्षापुर्वी सुमारे एक कोटी १० लाखांचा परिपूर्ण आराखडा तयार केला; परंतु आजमितीस दमडीचा निधीही मिळालेला नाही. त्यामुळे पालकमंत्री दीपक केसरकर यांची विकासाची घोषणाही हवेतच विरली आहे.

वैभववाडी - बारमाही वाहणारा नापणे धबधबा विकसित करण्याच्या हेतूने तीन वर्षापुर्वी सुमारे एक कोटी १० लाखांचा परिपूर्ण आराखडा तयार केला; परंतु आजमितीस दमडीचा निधीही मिळालेला नाही. त्यामुळे पालकमंत्री दीपक केसरकर यांची विकासाची घोषणाही हवेतच विरली आहे.

बारमाही धबधबा असल्याने नापणेकडे पर्यटकांचा मोठा ओढा असतो. तीन वर्षापुर्वी पालकमंत्री केसरकर यांनी या धबधब्याचा परिपूर्ण विकास करण्याची घोषणा येथे केली होती. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला आराखडा बनविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार बांधकाम विभागाने हायमस्ट उभारणे, झुलता पुल, पायऱ्या बांधणे, नळपाणी पुरवठा योजना, स्ट्रीट लाईट, पर्यटक गॅलरी अशा कामांसाठी एक कोटी दहा लाखांचा आराखडा तयार केला. काही महिन्याने हा आराखडा सार्वजनिक बांधकामकडून जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे व तेथून तो ग्रामपंचायत विभागाकडे देण्यात आला.

नापणे ग्रामपंचायतीने या कामांचा फेरआराखडा तयार करून पालकमंत्री केसरकर आणि जिल्हा नियोजनकडे दिला. त्याला आता दोन वर्षाचा कालावधी उलटला आहे; परंतू, अद्यापही निधी मिळालेला नाही.

धबधबा रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. धबधबा मार्गावर शौचालय, चेंजिगरूम बांधून चार वर्ष झाली आहेत. परंतू, अजूनही ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिलेले नाही.

या धबधब्याचा विकास झाला तर तालुक्‍याच्या अर्थकारणाला पर्यटनाच्या माध्यमातून गती मिळु शकेल; मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे हा विकास रखडला आहे. आवश्‍यक जमीन देण्यात आम्ही तयार आहोत.
- किशोर जैतापकर,
नापणे

नापणे धबधब्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे; मात्र निधी मिलालेला नाही. सरपंच होऊन चारच महिने झाले आहेत. काही दिवसात यासंदर्भातील माहिती घेऊन निधी मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू.
- जयप्रकाश यादव,
सरपंच, नापणे
 

Web Title: Sindhudurg News Napne Development plan