अवैध मासेमारी थांबविण्यास राणेंची डेडलाईन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

मत्स्य व्यवसाय विभागाकडून तत्काळ परराज्यातील नौका पकडण्याची कार्यवाही न झाल्यास २३ पासून सिंधुदुर्ग बंद आंदोलन छेडत समुद्रातील अनधिकृत परराज्यातील नौका पकडून त्या शासनाला भेट देईन,’’ असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला.

मालवण - ‘‘अनधिकृत मासेमारी करणाऱ्या परराज्यातील नौकांवर शासन कोणतीच कारवाई करत नाही. उलट अशा नौकांविरोधात आंदोलन करून त्या पकडून देणाऱ्या मच्छीमारांविरोधातच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जातात. हा अन्याय आहे. पोलिस प्रशासनाचे सहकार्य तसेच मत्स्य व्यवसाय विभागाकडून तत्काळ परराज्यातील नौका पकडण्याची कार्यवाही न झाल्यास २३ पासून सिंधुदुर्ग बंद आंदोलन छेडत समुद्रातील अनधिकृत परराज्यातील नौका पकडून त्या शासनाला भेट देईन,’’ असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला. यानंतर त्यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेतली.

येथील नीलरत्न निवासस्थानी राणे यांची मच्छीमार बांधवांनी भेट घेत भूमिका मांडली. त्या वेळी जिल्हाध्यक्ष देवदत्त सामंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, नगरसेवक यतीन खोत, सतीश सावंत, संदीप कुडतरकर, मंदार केणी, रणजित देसाई, सुदेश आचरेकर, बाळू कोळंबकर, सुहास हडकर, आबा हडकर, लीलाधर पराडकर, कृष्णनाथ तांडेल, जॉन नऱ्होंना, सरोज परब, चारुशीला आचरेकर, सोनाली कोदे, मनीषा वराडकर, अभय कदम, राजू परुळेकर, जाबीर खान, ज्ञानेश्‍वर खवळे, दीपक पाटकर आदी उपस्थित होते.

यावेळी झालेल्या बैठकीत कृष्णनाथ तांडेल यांनी समुद्रात परराज्यातील एलईडीधारक पर्ससीनधारकांकडून होत असलेल्या अतिक्रमणाची माहिती दिली. मत्स्य व्यवसाय विभागाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्यानेच मच्छीमार आक्रमक बनले आहेत. दोन दिवसांपूर्वी गोव्यातील जे तीन ट्रॉलर्स पकडण्यात आले. यात प्रकारात आपला भाऊ गोपी तांडेल याचा कोणताही संबंध नसताना त्याला विनाकारण गोवल्याचे सांगितले. नऱ्होंना कुटुंबीयांनीही आपली कैफीयत यावेळी श्री. राणेंसमोर मांडली.

यानंतर श्री. राणे यांनी पोलिस ठाण्यात जात अप्पर पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांची भेट घेत चर्चा केली. पोलिसांकडून मच्छीमारांवर झालेली कारवाई चुकीची आहे. ज्यांचा या प्रकाराशी संबंध नाही त्यांना पकडण्यात आले आहे. त्यामुळे यात पोलिसांचे स्थानिक मच्छीमारांना सहकार्य मिळणे आवश्‍यक असल्याचे निदर्शनास आणून दिले.

यावेळी श्री. राणे म्हणाले, ‘‘स्थानिक मच्छीमार व पर्ससीनधारक यांच्यात समुद्रात जो संघर्ष होत आहे त्याला सर्वस्वी मत्स्य व्यवसाय खाते जबाबदार आहे. या विभागाकडे अधिकारी, कर्मचारी, गस्तीनौका यांची कमतरता असल्यानेच झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी यात स्थानिक मच्छीमार भरडला जात असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे; मात्र आता यापुढे आपण मच्छीमारांवर अन्याय होऊ देणार नाही. जिल्ह्यातील मच्छीमारांच्या मी पाठीशी आहे.’’

ते म्हणाले, ‘‘परराज्यातील नौका जिल्ह्याच्या किनारपट्टीवर घुसखोरी करत असल्याची कल्पना देऊनही मत्स्य विभागाकडून कोणतीच दखल घेतली जात नाही. याबाबत सरकारकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने मच्छीमारांवर आंदोलन करण्याची वेळ आली. स्थानिकांनी घुसखोरी केलेल्या नौकांना अडवून किनाऱ्यावर आणले आणि त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. याबाबत अपर पोलिस अधीक्षक गायकवाड यांनी मच्छीमारांची गुन्ह्यांपुरती चौकशी केली जाईल, असे सांगितले आहे. मच्छीमारांनी केलेल्या आंदोलनाचे त्यांनी समर्थन केले. या घटनेबाबत आपण मुख्यमंत्री व मत्स्य व्यवसाय मंत्री यांचे लक्ष वेधणार आहे.’’

पर्ससीनच्या मासेमारीस तसेच प्रकाश झोतातील मासेमारीस बंदी असतानाही जिल्ह्याच्या सागरी हद्दीत बारा वावाच्या आत परराज्यातील नौकांची घुसखोरी सुरू आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसाय खात्याने या नौका पकडण्याची कार्यवाही न केल्यास आपण अत्याधुनिक नौकांचा वापर करून हे ट्रॉलर्स पकडू आणि शासनास ते भेट देऊ. प्रशासनाचे सहकार्य न मिळाल्यास २३ ला आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही श्री. राणे यांनी यावेळी दिला.

सिंधुदुर्गनगरी -  मालवणातील मच्छीमार प्रश्‍नावर माजी मुख्यमंत्री राणे यांनी आज जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. या वेळी स्वाभिमान पक्षाचे जिल्हाधक्ष दत्ता सामंत, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई, अशोक सावंत, सुरेश सावंत, संदीप कुडतरकर, एकनाथ नाडकर्णी, मिलिंद मेस्त्री आदींसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिस अधीक्षकांना भेटून आल्यावर पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी आपण पालकमंत्री असताना चार चार गस्तीनौका होत्या, असा टोला यावेळी त्यांनी मारला.
पालकमंत्री, खासदारांत ‘दम’ नसल्याची टीका

यावेळी श्री. राणे म्हणाले, ‘‘जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसह, आमदार, खासदार यांच्यात दम नसल्यामुळेच मच्छीमारांवर केसिस दाखल होत आहेत. या सरकारने कोकण, सिंधुदुर्गकडे गेल्या तीन वर्षांत दुर्लक्षच केले आहे. मत्स्य विभागात गस्ती नौका नसल्याने परराज्यातील नौका घुसखोरी करत आहेत. स्थानिक मच्छीमारांनी गोव्याच्या नौका पकडल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री इकडे फोन करतात, मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय करत आहेत?’’

Web Title: Sindhudurg News Narayan Rane Comment