राणेंची चिंता कोणी करू नये - नारायण राणे

राणेंची चिंता कोणी करू नये - नारायण राणे

सावंतवाडी - `नारायण राणे मंत्री कधी होणार या विषयावरून मी विरुद्ध सगळे असे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात आहे; परंतु राणे आज आणि उद्याही रुबाबातच जगणार. त्यामुळे आमची चिंता कोणी करू नये,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे महोत्सवाच्या समारोपात केले.

‘कलाकारांची झाडाझडती घेण्याचा काल झालेला प्रकार चुकीचा आहे याची चौकशी अधीक्षकांनी करावी, अन्यथा यापुढचे आंदोलन पोलिसांच्या विरोधात असेल,’’ असा इशाराही त्यांनी दिला. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सावंतवाडीच्या वतीने सुंदरवाडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

श्री. राणे म्हणाले,‘‘ महोत्सवाला भव्य स्वरूप आले आहे. तालुक्‍यात आनंदमय वातावरण आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी राणे कुटुंब नेहमी झटले आहे. आम्ही नेहमीच आंदोलन केले; पण सत्ताधारी गप्प आहेत. गेल्या साडेतीन वर्षात जिल्ह्यात कोणताही विकास झाला नाही. पोलिसांनी काल केलेला प्रकार चुकीचा आहे. कलाकार असलेल्या पाहुण्यांना त्रास देणे चुकीचे आहे. गुन्हेगारी वाढली ती कमी करा. पोलिस कायद्याच्या विरोधात वागले तर कोणाला जुमानणार नाहीत. त्या गृह राज्यमंत्र्यांना सांगा, उद्या पदावरून उतरल्यानंतर कोकणातील रस्त्यावर फिरू देणार नाही, अशी टीकाही राणे यांनी पालकमंत्री केसरकर यांचे नाव न घेता केली.

डॉ. नीलेश राणे म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील लोकांसाठी अनेक उपक्रम राबविले. यामध्ये महोत्सवाबरोबर लाखाची दहीहंडी, सिंधुदुर्गचा राजा आदींचा समावेश आहे. आता काही राजकीय बोलणार नव्हतो; पण रात्री कलाकार हॉटेलमध्ये असताना पोलिसांनी तेथे छापा टाकला. हे सर्व पालकमंत्र्यांनी केले. रात्रीच्या वेळी महिला कलाकारांचे दरवाजे ठोठावण्यात आले. हा सर्व प्रकार चुकीचा आहे. गोव्यातील पळून गेलेल्या आरोपीला पकडण्यासाठी आलो होतो, असे पोलिसांचे म्हणणे असले तरी रात्रीच्या वेळी हॉटेलमध्ये जाऊन महिला कलाकारांना अपमानास्पद वागणूक देणे चुकीचे आहे. स्पर्धा असावी; पण कपटी राजकारण करणे चुकीचे आहे. सावंतवाडीकरांनी हे लक्षात ठेवावे. जे पोलिस गेले त्यांच्यावर विनयभंगाची केस होऊ शकते. तशी तक्रार देण्याचे आदेश मी कार्यकर्त्यांना देणार आहे. आमच्या वाटेला जाऊ नका, नाहीतर आम्ही गप्प बसणार नाही. विरोधक विरोध करत राहिले; पण राणे साहेब मोठेच होत गेले ही वस्तुस्थिती आहे.’’

तालुकाध्यक्ष संजू परब यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ‘‘महोत्सवाचे हे तिसरे वर्ष आहे. नारायण राणेंच्या पाठिंब्यामुळे हे काम करू शकलो. राणेंना सावंतवाडीकरांनी भरभरून प्रेम दिले आणि जास्तीत जास्त जागा दिल्या. या ठिकाणी महोत्सवासाठी आलेल्या कलाकारांना पोलिसांकडून मिळालेली अपमानास्पद वागणूक दिली ती निषेधार्ह आहे.’’

डॉ. उत्तम पाटील, तुषार चिपळूणकर, जगदीश पाटील, अमृता स्वार, प्रमोद कामत, राजू भालेकर, बाबूराव कविटकर, राजेंद्र नाईक, संजू विरनोडकर, उदय धुरी, बाबूल अल्मेडा टीम, अनिता सडवेलकर, रवी कदम, अमित वेगुर्लेकर, अबूबक्कर शेख, संजय वरेरकर, चैतन्या सावंत आदींचा सत्कार करण्यात आला

नीलम राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्‍मा सावंत, स्वाभिमान जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, उपाध्यक्ष अशोक सावंत, आनंद शिरवलकर, जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत, स्वाभिमान तालुकाध्यक्ष संजू परब, संदीप कुडतडकर, पंचायत समिती सभापती रवी मंडगाकर, सदस्य पंकज पेडणेकर, संदीप नेमळेकर, नगरसेवक राजू बेग, दीपाली भालेकर, शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर, गुरुनाथ पेडणेकर, ॲड. परिमल नाईक, किरण सावंत, मंदार नार्वेकर, समृद्धी विर्नोडकर, केतन आजगावकर विशाल परब, सावी लोके, प्रमोद सावंत, गुरू मठकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com