पद असो वा नसो; राणेंचे महत्त्व कायम

पद असो वा नसो; राणेंचे महत्त्व कायम

माजी मुख्यमंत्री नारायण राणे गेले तीन-चार महिने प्रसार माध्यमांमध्ये ब्रेकिंग न्यूज बनले आहेत. त्यांची न्यूज मेकर ही ओळख आजची नाही. ते भाजपमध्ये जाणार की वेगळा पक्ष काढणार याची उत्सुकता कोकणच नाही तर अवघ्या महाराष्ट्राला आहे. वास्तविक सध्या त्यांच्याकडे फारसे मोठे पद नाही. मात्र मास लीडर म्हणून त्यांनी आतापर्यंत निर्माण केलेली ओळखच त्यांना पदापलीकडे महत्त्व मिळवून देणारी ठरली. ही ओळख निर्माण करण्यामागे त्यांच्या स्वभावाचे, कर्तृत्वाचे अनेक पैलू आहेत. ते पैलू उलगडण्याचा हा प्रयत्न...

सावंतवाडी -  सामान्य शिवसैनिक म्हणून राजकीय करिअरची सुरुवात केलेल्या नारायण राणे यांनी राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत मारलेली मजल आणि त्यानंतरही पद असो वा नसो, आपले वजन कायम ठेवण्याचे कौशल्य फार थोड्या नेत्यांना आत्मसात करता आले. कोकणचा राजकीय इतिहास लिहिताना राणेंच्या राजकारणाची शैली कायमच ठळक अक्षरात लिहिली जाईल, असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.

राणेंचे मूळ गाव कणकवलीजवळचे वरवडे. मात्र त्यांचे बालपण मुंबईतच गेले. मुंबईतील चेंबूर भाग त्यांचे कार्यक्षेत्र. तेथूनच त्यांचे नेतृत्व खुलत गेले. शिवसेना आणि बाळासाहेब यांचे ते भक्त होते. शिवसेनेसाठी काहीही करण्याची, झोकून देण्याची वृत्ती त्यांच्या रक्तात भिनली. १९६८ मध्ये वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी राणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या संपर्कात आले. शिवसेनेसाठी तो काळ संघर्षाचा होता. एक आक्रमक आणि मराठी माणसाचे प्रश्‍न मांडणारी संघटना म्हणून शिवसेना पुढे येत होती.

बाळासाहेबांना जीवाभावाच्या, मागचा-पुढचा विचार न करता झोकून देऊन काम करणाऱ्या निडर, धाडसी आणि निष्ठावान शिवसैनिकांची गरज होती. या फ्रेममध्ये राणे अगदी चपखलपणे बसत होते. ते बाळासाहेबांबरोबर सावलीसारखे वावरू लागले. संघटनेनेही त्यांच्यावर जबाबदाऱ्या सोपवायला सुरुवात केली. ते अवघ्या दोन वर्षांत चेंबूरचे शाखाप्रमुख बनले. त्यांच्या रोमारोमात शिवसेना भिनली. शिवसेनेसाठी ते नारायणास्त्र बनले.

१९८५ मध्ये ते मुंबई महापालिकेचे नगरसेवक झाले. बाळासाहेबांच्या शब्दावर वाटेल ते करण्याची तयारी असलेले नेतृत्व म्हणून राणेंनी ओळख निर्माण केली. याच दरम्यान शिवसेनेतील वजनदार नेते छगन भुजबळ यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

त्यांच्यासारख्या नव्या नेतृत्वाचा शिवसेनेत शोध सुरू होता. राणेंनी अगदी नकळत ही जागा  भरून काढली. एखादी संघटना चालवायची तर आर्थिक पायाही भक्कम लागतो. त्यातही शिवसेनेसारखी संघटना चालविण्यासाठी आक्रमकपणाही जपावा लागतो. या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडण्याची क्षमता राणेंमध्ये होती. बाळासाहेबांनी ती पक्की ओळखली. यामुळे राणेंना झपाट्याने वरची पदे मिळत गेली. ते बेस्ट समितीचे अध्यक्ष झाले. यानंतर त्यांचे पक्षातील वजन वाढत गेले. नंतरच्या काळात ते सिंधुदुर्गातील राजकारणात सक्रीय झाले. अर्थात बाळासाहेबांच्या आदेशानेच ते कोकणच्या राजकारणात उतरले. मात्र मुंबईतील मातोश्रीवरील त्यांचे वजन तिळमात्र कमी झाले नाही. उलट ते वाढत गेले. यातूनच त्यांनी अगदी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते पदापर्यंतची पदे मिळविली.

मैदानात उतरणारे नेतृत्व...
शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सुभाष देसाई, सुधीर जोशी, मनोहर जोशी अशा सोबर नेतृत्वाला कायमच दरबारी राजकारणामध्ये महत्त्वाचे स्थान मिळाले. पण ही संघटना काँग्रेस, भाजपसारखी चालणारी नव्हती. तिला मराठी माणसांच्या प्रश्‍नासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवणेही तितकेच गरजेचे होते. यासाठी विशेषतः मुंबईत कार्यकर्त्यांचे बळ राखायला आक्रमक नेतृत्वाचीसुद्धा तितकीच आवश्‍यकता होती. हीच गरज रामदास कदम, नारायण राणे आदींसारख्या नेत्यांनी पूर्ण केली. यातही राणे प्रत्यक्ष मैदानातील लढाईत कायमच अग्रस्थानी राहिले. यामुळे शिवसेनेची ताकद निर्माण करणाऱ्या नेत्यांमध्ये राणेंचीही गणती सुरू झाली.

वजनदार नेतृत्व...
एखाद्या नेत्याचे वजन त्याच्यामागे किती मोठा प्रांत उभा आहे आणि मतांची ताकद किती यावर ठरते. मुळात मतांची संख्या कमी असलेल्या कोकणातील फार थोड्या नेत्यांना राज्यस्तरावर वजन निर्माण करता आले. राणेंनी आपल्या शैलीच्या जोरावर गेली कित्येक वर्षे आपले राजकीय वजन टिकवून ठेवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com