‘ग्रीन रिफायनरी’ला माझा स्पष्ट विरोध - नारायण राणे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जानेवारी 2018

कुडाळ - ‘‘कोकणचे पर्यावरण बिघडेल असा कोणताही कारखाना कोकणात येऊ देणार नाही. रत्नागिरीसह जिल्ह्याच्या सीमेवर होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरीला माझा स्पष्ट विरोध राहील,’’ असे पत्रकार परिषदेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जाहीर केले.

कुडाळ - ‘‘कोकणचे पर्यावरण बिघडेल असा कोणताही कारखाना कोकणात येऊ देणार नाही. रत्नागिरीसह जिल्ह्याच्या सीमेवर होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरीला माझा स्पष्ट विरोध राहील,’’ असे पत्रकार परिषदेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जाहीर केले. विद्यमान सरकार व पालकमंत्र्यांमुळे सिंधुदुर्ग विकासाबाबतीत १० वर्षे मागे गेल्याचा आरोपही त्यांनी केला.

श्री. राणे यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्हा येथील निष्क्रिय पालकमंत्र्यांनी १० वर्षे विकासापासून मागे नेला आहे. फक्त घोषणाबाजी केली. प्रत्यक्षात काहीच केले नाही. चिपी विमानतळ, आरोग्याचा प्रश्‍न, जागतिक पातळीवरील पर्यटक येतील असा सी-वर्ल्ड प्रकल्प याबाबत त्यांच्याकडून कोणत्याही हालचाली नाहीत. दोडामार्ग एमआयडीसीचा प्रश्‍न ‘जैसे थे’ आहे. महसूल विभाग जिल्ह्यातील लोकांचे शोषण करत आहे. सर्वच बाबतीत हे सरकार व पालकमंत्री पूर्णतः निष्क्रिय ठरले आहेत. अधिकारीवर्ग पालकमंत्र्यांना अजिबात किंमत देत नाही.

एका महिन्यात हॉस्पिटल सुरू
उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पडवे हॉस्पिटलबाबत श्री. राणे म्हणाले, ‘‘उद्‌घाटनासाठी पंतप्रधान यांची वेळ मागितली आहे; मात्र उद्‌घाटनाची वाट न पाहता केवळ रुग्णांना चांगली सेवा मिळावी यासाठी येत्या महिन्यात हॉस्पिटल सुरू करण्यात येईल.’’

पालकमंत्री फक्त घोषणा करतात. तिजोरीतील निधी विकासासाठी आणण्याची धमक त्यांच्यात नाही. सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्‍न अधांतरी आहे. मी मडुरा येथे टर्मिनस सुचविले होते. त्याठिकाणी लोकांचा विरोध नव्हता. या पालकमंत्र्यांनी बायपास करून सावंतवाडीची वाट लावली आहे. जिल्ह्यातील पाटबंधारेचे सर्व प्रकल्प ठप्प आहेत. जिल्ह्यात विकासात्मक कामे नसल्याने बेरोजगारीचे प्रश्‍न वाढले आहेत. सिंधुदुर्गाच्या विकासाचे नुकसान पालकमंत्र्यांनी केले आहे.’’

ते म्हणाले, ‘‘कोकणात जिल्ह्याच्या सीमेवर ग्रीन रिफायनरी हा प्रकल्प होऊ घातला आहे. त्याला माझा स्पष्ट विरोध आहे. यापुढे कोकणच्या पर्यटनाला हानीकारक ठरतील, असे केमिकल कारखान्यासह अन्य कोणतेही प्रकल्प येऊ देणार नाही. मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू असल्याचे चित्र वरवर दिसते; मात्र कामाला वेग नाही. त्यामुळे वेळेत काम होईल याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे. रेशनिंग धान्य प्रश्‍न आहे. पालकमंत्र्यांनी १०-१० महिने जिल्हा नियोजनाची बैठक घेतली नाही. हा पळपुटा पालकमंत्री आहे.’’

ते म्हणाले, ‘‘कोरेगाव भीमा प्रकरणाबाबत कोणत्याही नेत्यांनी भाष्य करू नये. प्रकरण शांत होण्याचा दृष्टीने प्रयत्न व्हावेत.’’
या वेळी पक्षाचे दत्ता सामंत, सतीश सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, विकास कुडाळकर, संदीप कुडतरकर, नगराध्यक्ष विनायक राणे, उपनगराध्यक्ष आबा धडाम, नगरसेवक ओंकार तेली, राकेश कांदे, सुनील बांदेकर, सामी सावंत, दादा साईल, संजय वेंगुर्लेकर, मोहन सावंत, रुपेश कानडे आदी उपस्थित होते.
 

Web Title: Sindhudurg News Narayan Rane Press