गोव्यात गाडी घेऊन जाताय... सावधान!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

गोव्यात नव्याने रुजू झालेले पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी आता सर्वसामान्य गोयकरांनाच बेशिस्त वाहनचालकांवर लक्ष ठेवण्याचे काम दिले आहे.

सावंतवाडी - तुम्ही गोव्यात गाडी घेऊन जाणार असाल, तर सावधान! तुम्हाला वाहतूक नियम पाळलेच पाहिजेत. कारण आता गोव्यात केवळ वाहतूक पोलिसच नाही तर ‘गोयकार’ही तुमच्यावर नजर ठेवून आहेत. याचे कारण म्हणजे तेथील पोलिसांनी राबविलेली नवी वाहतूक नियंत्रण पद्धत आणि त्याला मिळालेला प्रतिसाद.

गोवा छोटे असले तरी वाहतूक समस्यांपासून गेली अनेक वर्षे झुंज देत आहे. गोव्यात पणजी, म्हापसा, फोंडा, मडगाव अशी मोठ्या शहरांमध्ये वाहतूक कोंडी नित्याचीच. शिवाय पणजी, वास्को, मडगाव या मार्गावरही अनेकदा वाहतूक कोंडीची समस्या जाणवते. यातून मार्ग काढण्यासाठी गोव्याने आतापर्यंत अनेक उपाय योजले. मोठ्या शहरांमध्ये तर जादा पोलिस कुमक कायमच तैनात केली जाते. सीसीटिव्ही कॅमेऱ्यासह इतर तंत्रज्ञानाचा वापरही झाला; पण गोव्यात नव्याने रुजू झालेले पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी आता सर्वसामान्य गोयकरांनाच बेशिस्त वाहनचालकांवर लक्ष ठेवण्याचे काम दिले आहे.

श्री. चंदर हे या आधी दिल्लीत वाहतूक शाखेमध्ये कार्यरत होते. त्यामुळे या क्षेत्रातील चांगले ज्ञान त्यांना आहे. गोव्यात आल्यानंतर त्यांनी वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी सोशल मीडियाचा वापर सुरू केला. त्यांनी गोव्यातील नागरिकांना एक वॉटस्‌ॲपचा नंबर उपलब्ध करुन दिला. यावर नाव, पत्ता व इतर तपशील पाठवून नागरिकांनी नोंदणी करायची आहे. त्यानंतर एक पासवर्ड दिला जातो. 

पूर्ण गोव्यात एखादा वाहनचालक नियम तोडत असल्यास त्याचा फोटो काढायचा आणि तो या पासवर्डच्या मदतीने अपलोड करायचा. तातडीने पोलिस यंत्रणा कामाला लागते. त्या गाडीच्या नंबरवरून बेशिस्त वाहनाच्या मालकाला दंडाचे चलन पाठविले जाते आणि वसुलीही होते. फोटो पाठविणाऱ्या नावावर ठराविक पॉईंटस्‌ जमा होतात. 

नियमभंगाच्या स्वरुपानुसार हे पॉईंटस्‌ असतात. १ हजार पॉईंट झाले की त्याचे मूल्य १ हजार इतके होते. ठराविक रक्कम जिंकल्यानंतर संबंधित या स्पर्धेतून बाद होतो. आतापर्यंत सर्वाधिक २७ हजार इतकी रक्कम एका नागरिकाने मिळविली आहे. याशिवाय इतरही बक्षिसे जाहीर झाली आहेत. यामुळे या योजनेला गोव्यात तुफान प्रतिसाद मिळत आहे. 

साहजिकच आता पावलापावलावर नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर स्थानिकांचीच करडी नजर असल्याचे चित्र आहे. सिंधुदुर्गातील अनेकजण सर्रास गोव्याला जातात. गोव्याच्या तुलनेत जिल्ह्यात वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीबाबत शिथिलता आहे. सीमावर्ती भागाचा तर गोव्याशी नेहमी संबंध येतो. आता त्यांना गोव्यात गेल्यानंतर वाहतुकीचे सर्व नियम काटेकोरपणे अंमलात आणल्याशिवाय गत्यंतर राहिले नसल्याचे चित्र आहे.

हेल्मेट नसल्यास दंड
गोव्यात दुचाकी चालकाला हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. पूर्वी हेल्मेट नसल्यास एकदा दंड केल्यावर त्याच पावतीवर पुढचा प्रवास चालायचा. नव्या पोलिस महासंचालकांनी वाहतूक नियमावर बोट ठेवत एका ठिकाणी दंड झाला आणि पुढे वाहतूक पोलिसाला हेल्मेटशिवाय आढळल्यास पुन्हा दंड करण्याचे आदेश दिले आहेत. गोव्यात मोठ्या शहरांच्या ठिकाणी पावलापावलावर वाहतूक पोलिस असतात. त्यामुळे हॅल्मेट नसल्यास बऱ्याचदा हेल्मेटच्या किमतीपेक्षा जास्त दंड मोजण्याची वेळ येऊ शकते.

Web Title: Sindhudurg News new concept of Traffic control in Goa