डॉ. नीलेश हेच राणेंचे वारसदार - नीतेश राणे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 फेब्रुवारी 2018

सावंतवाडी - ‘माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचा खरा वारसदार हे डॉ. नीलेश राणेच आहेत. आणि नीलेश यांच्या विचाराचा वारसा मी चालविणार आहे. त्यामुळे नाहक कोणी प्रश्‍न विचारून आमच्या ढाच्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नये,’ असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी येथे आयोजित सुंदरवाडी महोत्सवात केले.

सावंतवाडी - ‘माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचा खरा वारसदार हे डॉ. नीलेश राणेच आहेत. आणि नीलेश यांच्या विचाराचा वारसा मी चालविणार आहे. त्यामुळे नाहक कोणी प्रश्‍न विचारून आमच्या ढाच्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नये,’ असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी येथे आयोजित सुंदरवाडी महोत्सवात केले.

गेल्या तीन वर्षांत जिल्ह्याचा क्राईम रेट वाढला आहे. कोट्यवधीचा निधी आणण्यापेक्षा जिल्ह्यातील लोकांना सुरक्षा देण्यासाठी प्रयत्न करा, असा टोला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचे नाव न घेता त्यांच्यावर लगावला.

येथील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे आयोजित सुंदरवाडी महोत्सव २०१८ चे उद्‌घाटन आमदार राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले, ‘‘कार्यक्रम किंवा बोलताना अनेक पत्रकारांकडून मला राणेंचा वारसदार कोण? असा प्रश्‍न करण्यात येतो; मात्र राणेंचा वारसदार हा डॉ. नीलेश राणेच आहेत. त्यानंतर त्यांच्या विचारांचा वारसदार मी आहे. त्यामुळे आता हा प्रश्‍न नको आणि तो प्रश्‍न पुन्हा विचारू नये. महोत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी येथे मी आलो आहे. तीन दिवस कार्यक्रमाची पर्वणी मिळणार आहे.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. सिंधुदुर्ग महोत्सव ही त्यांचीच कल्पना होती. येथे सांस्कृतिक चळवळ उभी रहावी, यासाठी हा महोत्सव घेण्यात आला आहे. त्यामुळे संजू परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार 
मानले पाहिजेत.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘आंबोलीत मृतदेह फेकण्यासारखे बरेच प्रकार झाले होते. आता तर सावंतवाडी शहरात होमोसेक्‍स सारखे रॅकेट कार्यरत असल्याची चर्चा आहे. अशा प्रकारामुळे सावंतवाडीची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे नागरिक म्हणून उठाव करणे गरजेचे आहे. ही बाब चिंताजनक आहे. स्वाभिमान पक्ष या विरोधात मोठा उठाव करणार आहे. २०१४ पासून २०१७ पर्यंत जिल्ह्यातील गुन्हेगारीची आकडेवारी वाढलेली आहे. क्राईम इन महाराष्ट्र या वेबसाईटवर ही आकडेवारी आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. गृहराज्य मंत्र्यांच्या शहरात क्राईम वाढणे योग्य नाही.’’

जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्‍मा सावंत, स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, आनंद शिरवलकर, जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत, स्वाभिमान तालुकाध्यक्ष संजू परब, संदीप कुडतडकर, पंचायत समिती सभापती रवी मडगाकर, पंकज पेडणेकर, संदीप नेमळेकर, नगरसेवक राजू बेग, दीपाली भालेकर, सुधीर आडीवरेकर, गुरुनाथ पेडणेकर, विशाल परब, ॲड. परिमल नाईक, किरण सावंत, मंदार नार्वेकर, समृद्धी विर्नोडकर, केतन आजगावकर, गुरू मठकर, अन्वर खान, गितांजली सावंत, उत्कर्षा सासोलकर, उत्तम पांढरे, उदय नाईक, प्रियांका गावडे, प्रसन्न गोंदावळे, अजय गोंधावळे आदी उपस्थित होते. 

यावेळी विविध क्षेत्रात काम करणारे डॉ. राजेश नवांगुळ, डॉ. विष्णू नाईक, उद्योगपती राजन आंगणे, आदर्श शिक्षक प्रदीप सावंत, संतोष गावडे, अमोघ आजगावकर, बाल कलाकार सार्थक वाटवे, सौरभ वारंग आदींचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक किरण सावंत यांनी केले. सूत्रसंचालन अन्वर खान आणि ऋषी देसाई यांनी केले. आभार रवी मडगावकर यांनी मानले.

Web Title: Sindhudurg News Nitesh Rane Comment