मासे साठवणुकीसाठी 'फॉर्मेलीन'चा वापर नाही - हरी खोबरेकर 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जुलै 2018

मासे ताजे राहण्यासाठी केवळ बर्फाचा वापर होतो. अन्य कोणतेही केमिकल वापरले जात नाही. त्यामुळे मत्स्य खवय्ये यांनी निश्‍चिंत राहावे, अशी माहिती मत्स्य उद्योजक तथा शिवसेना जिल्हा परिषद हरी खोबरेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

मालवण - कोकण किनारपट्टीवर सर्वाधिक ताजी मासळी मिळण्याचे ठिकाण म्हणून मालवण ओळखले जाते. समुद्रात मिळणाऱ्या ताज्या मासळीचा दररोज बाजार भरतो, मासळीची खरेदी विक्री होते. काही मासळी लगतच्या जिल्ह्यात व राज्यात विक्रीसाठी नेली जाते; मात्र मासे ताजे राहण्यासाठी केवळ बर्फाचा वापर होतो. अन्य कोणतेही केमिकल वापरले जात नाही. त्यामुळे मत्स्य खवय्ये यांनी निश्‍चिंत राहावे, अशी माहिती मत्स्य उद्योजक तथा शिवसेना जिल्हा परिषद हरी खोबरेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

गोवा येथील मासळी बाजारातील मासे अन्न व औषध प्रशासन खात्याने तपासले असता त्या माशांत फॉर्मेलीन या रसायनाचा अंश सापडला होता. त्यानंतर हा वाद सुरु झाला आहे. गोवा सरकारने 10 दिवसांपूर्वी परराज्यातून मासे आणून ते गोव्यात विकण्यास बंदी घातली आहे. मुख्ममंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंत्रालयातच तातडीने घेतलेल्या पत्रकार परीषदेत या बंदीची घोषणा केली होती.

मृतदेह टिकवण्यासाठी वापरल्या जाणारे फॉर्मेलीन काही ठिकाणी मासे टिकवण्यासाठी वापरण्यात येत असल्याची माहिती उघड झाल्याने कित्येकांनी मासे खाणे सोडून दिले. काही मासे बाजार ओस पडले. या पार्श्‍वभूमीवर हरी खोबरेकर यांनी येथे मिळणाऱ्या मासळीच्या विक्रीबाबत वस्तुस्थिती स्पष्ट केली.

देशाच्या पश्‍चिम किनाऱ्यावर 1 जून ते 31 जुलै या कालावधीत मासेमारी बंदी असते; मात्र 1 ऑगस्ट पासून नवा मासेमारी हंगाम सुरू होणार आहे. अशा स्थितीत मालवणसह सिंधुदुर्गात विक्री होणाऱ्या माश्‍यांच्या दर्जाबाबत निश्‍चिंत राहावे, असे आवाहन खोबरेकर यांनी केले आहे.

येथे कोणत्याही प्रकारे जास्त दिवस माश्‍यांची साठवणूक करून त्यांची विक्री होत नाही. मिळालेले मासे ताजे स्वरूपातच विक्री केले जातात. ताजे मासे म्हणून मालवणची असलेली ओळख आम्हाला कायम ठेवायची आहे. त्यामुळे मालवणातील मासे टिकवण्यासाठी कोणतेही केमिकल वापरले जात नसल्याचा दावा खोबरेकर यांनी केला आहे.

Web Title: Sindhudurg News no use of formalin to store Fish