वैभववाडी तालुक्‍यातील भातशेती संकटात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

वैभववाडी - सतत पडत असलेला पाऊस आणि किडीचा वाढत असलेला प्रादुर्भाव यामुळे वैभववाडी तालुक्‍यातील भातशेती संकटात आली आहे. भात पिकलंय पण पावसामुळे कापायचे कसे हा प्रश्‍न सध्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक हातातून जाईल या शक्‍यतेने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

वैभववाडी - सतत पडत असलेला पाऊस आणि किडीचा वाढत असलेला प्रादुर्भाव यामुळे वैभववाडी तालुक्‍यातील भातशेती संकटात आली आहे. भात पिकलंय पण पावसामुळे कापायचे कसे हा प्रश्‍न सध्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक हातातून जाईल या शक्‍यतेने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

तालुक्‍यात भातशेतीचे मोठे क्षेत्र आहे. भातेशती हेच येथील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक आहे. तालुक्‍यात सुमारे ३ हजार ६०० हेक्‍टर क्षेत्र भातशेतीखाली आहे. भातशेतीसोबतच येथील शेतकरी नाचणी, वरी अशी पिके देखील घेतो परंतु भातशेतीच्या तुलनेत ती नगण्य आहे. 

गेल्या काही दिवसांपासून तालुक्‍यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. काही भागात तर ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे नदी, नाल्यालगतच्या भातपिकांमधून पुराचे पाणी जाऊन भातशेती वाहून गेली. कमी कालावधीची भातपिके वीस दिवसांपूर्वीच तयार झाली आहेत. परंतु सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना भातकापणी करता येत नाही. दोन दिवस पावसाचे प्रमाण कमी झाले या कालावधीत शेतकऱ्यांनी भातकापणीला सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. परंतु पुन्हा पावसाचे वातावरण तयार झाले आहे.

५ ते १४ ऑक्‍टोबर या कालावधीत पाऊस पडणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. जर हवामान खात्याचे भाकित खरे ठरले तर शेतकऱ्यांची मोठी हानी होणार आहे. एकीकडे पावसामुळे भातशेती कापता येत नाही तर दुसरीकडे भातपिकांवरील किडीचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. सतत ढगाळ वातावरणामुळे किडीचे प्रमाण वाढत आहे. भात कापले आणि त्यावर पाऊस पडला तरी नुकसान आणि पावसाच्या भीतीने भात कापले नाही तरी किडीमुळे नुकसान असे दुहेरी संकट सध्या शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. काय करावे हेच शेतकऱ्यांना सुचेनासे झाले आहे. काही शेतकऱ्यांनी तर पावसाची भीती न बाळगता कापणीला सुरूवात केली आहे. हातातोडांशी आलेले पिक निसटून जाऊ नये म्हणून शेतकरी प्रयत्न करीत आहे.

दुहेरी संकट
एकीकडे पडत असलेला पावसामुळे भातशेती कापता येत नाही तर दुसरीकडे पावसामुळे भातपीक कापले नाही तर तयार झालेल्या भाताचा कीड अक्षरशः फडशा पाडत आहे. सतत असलेल्या ढगाळ वातावरणामुळे किडीचे प्रमाण वाढतच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था निर्माण झाली आहे. काय करावे हेच शेतकऱ्यांना सुचेनासे झाले आहे. शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

Web Title: sindhudurg news paddy crop in danger