स्वार्थासाठी सेना, स्वाभिमानचा विरोध - प्रमोद जठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

कणकवली - स्वतःची आणि पक्षाची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठीच शिवसेना आणि स्वाभिमान पक्षाची मंडळी रिफायनरी आणि विजयदुर्ग बंदर विकासाला विरोध करीत आहेत. पुढील काळात तडजोडी करून हीच मंडळी या प्रकल्पाचे समर्थनही करतील; पण त्यावेळी जनतेच्या पदरात काहीच पडणार नाही, असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे केले.

कणकवली - स्वतःची आणि पक्षाची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठीच शिवसेना आणि स्वाभिमान पक्षाची मंडळी रिफायनरी आणि विजयदुर्ग बंदर विकासाला विरोध करीत आहेत. पुढील काळात तडजोडी करून हीच मंडळी या प्रकल्पाचे समर्थनही करतील; पण त्यावेळी जनतेच्या पदरात काहीच पडणार नाही, असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे केले.

येथील भाजप कार्यालयात जठार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा सरचिटणीस रवींद्र शेट्ये, तालुकाध्यक्ष संदेश सावंत यांच्यासह शिशिर परुळेकर, चंद्रहास सावंत आदी उपस्थित होते.

जठार म्हणाले, ‘‘आंबा-काजू संरक्षणासाठी फळपीक संशोधन केंद्र, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसाठी मोफत पंचतारांकित हॉस्पिटल आणि किमान एक लाख लोकांना थेट रोजगार देण्याची हमी घेऊनच रिफायनरी आणि विजयदुर्ग बंदर प्रकल्प आम्ही आणला आहे; मात्र सिंधुदुर्ग-रत्नागिरीचा सर्वांगीण विकास आणि प्रत्येकाच्या हाताला काम देणारा हा प्रकल्प शिवसेना आणि स्वाभिमान पक्षाच्या मंडळींना नकोसा झाला आहे. २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा निवडून येण्यासाठी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत या प्रकल्पाला तीव्र विरोध करीत आहेत. तेथील जनमत कलुषित करीत आहेत. दुसरीकडे राणेंना मंित्रपदाची घाई लागली आहे. जेवढा विरोध करू तेवढे मंित्रपद लवकर मिळेल, अशी त्यांची अपेक्षा आहे. शिवसेना आणि स्वाभिमानच्या मागण्या आणि तडजोडी यशस्वी झाल्या, तर हीच मंडळी यापुढे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आपली ताकद पणाला लावतील.’’

नारायण राणे किंवा शिवसेनेने हा प्रकल्प पुढे रेटला तर येथील नागरिकांना अद्ययावत रुग्णालय, हेक्‍टरी एक कोटींचा मोबदला व इतर सोईसुविधा मिळणार नाहीत. स्वाभिमान, शिवसेनेची मंडळी आपलेच खिसे भरण्याचे काम करतील. जैतापूर, चिपी विमानतळ, रेडी, विजयदुर्ग बंदर विकासाचे करार यातून हेच निष्पन्न झालेय. त्यामुळे जनतेने प्रकल्प होण्यासाठी पुढाकार घ्यावा. राजकीय मंडळींच्या नादी लागून आपले नुकसान करू नये, असे जठार म्हणाले.

रामेश्‍वर-गिर्ये येथे आपला पुतळा जाळणाऱ्या कुणावरही राग नाही. पुढील काळात त्या गावात जाऊन आम्ही आमची भूमिका मांडणार आहेत. या प्रकल्पात आमचा एक रुपयाचाही फायदा नाही तर जनतेचाच सर्वांगीण विकास होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत आमची भूमिका देखील ठाम आहे. उलट स्वतःचे आणि पक्षाचे हितसंबंध जपण्यासाठी शिवसेना आणि स्वाभिमानची मंडळी या प्रकल्पाला विरोध करीत असल्याचा पुनरुच्चार जठार यांनी केला.

...तर नाणारला विरोध का ?
कैकपटींनी प्रदूषण करणाऱ्या जैतापूर प्रकल्पाला राणेंनी पाठिंबा दिला. त्या आंदोलनात एकाचा बळीही गेला, तरीही हा प्रकल्प पुढे रेटला गेला. गिर्ये भागात त्यांनी औष्णिक प्रकल्प येऊ घातला. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांवर राणे समर्थकांनी दगडधोंडे मारले. जैतापूर आणि औष्णिक प्रकल्पाला समर्थन करणारे आता नाणारला पर्यावरणाच्या नावाखाली विरोध करीत आहेत. त्यांची भूमिका दुटप्पी असल्याचीही टीका जठार यांनी केली.

मंत्रिपद लांबणीवर...
रिफायनरी प्रकल्प झाला तर जैतापूर प्रकल्प आपोआपच रद्द होणार आहे. राणेंना अल्टीमेटम देण्याची सवयच लागली आहे. या सवयीमुळेच त्यांचे मंत्रिपद लांबणीवर पडते आहे, असे जठार म्हणाले.

एजंटगिरीत राणेंचीच मंडळी पुढे...
राजापूर परिसरातील पाच हजार एकर जागा यापूर्वीच खासगी कंपन्यांनी विकत घेतली आहे. तर विजयदुर्ग-गिर्ये परिसरातील शेकडो एकर जागेचीही खरेदी यापूर्वी झाली आहे. हे खरेदी विक्री व्यवहार करण्यात राणेंचीच मंडळी पुढे होती. वेळ आल्यास त्यांची नावे आम्ही जाहीर करू. त्यामुळे आमदार नीतेश राणेंनी दुसऱ्यांवर एजंटगिरीचे आरोप करण्यापूर्वी आपल्या पक्षात डोकावून पाहावे, असे जठार म्हणाले.

Web Title: SIndhudurg News Pramod Jathar press