दूरसंचार सेवा बंद झाल्याने सिंधुदुर्गात आर्थिक उलाढाल ठप्प

राजेश सरकारे
बुधवार, 13 जून 2018

कणकवली - गेल्या दोन दिवसापासून दूरसंचारची सेवा बंद झाल्याने कणकवलीसह जिल्ह्यातील आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. इंटरनेट नसल्याने स्वत:च्या खात्यामधील पैसे देखील काढता येत नसल्याची स्थिती ग्राहक अनुभवत आहेत. सर्व एटीएम देखील बंद असल्याने बाजारपेठेतील उलाढाल देखील मंदावली आहे.

कणकवली - गेल्या दोन दिवसापासून दूरसंचारची सेवा बंद झाल्याने कणकवलीसह जिल्ह्यातील आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. इंटरनेट नसल्याने स्वत:च्या खात्यामधील पैसे देखील काढता येत नसल्याची स्थिती ग्राहक अनुभवत आहेत. सर्व एटीएम देखील बंद असल्याने बाजारपेठेतील उलाढाल देखील मंदावली आहे.

महामार्ग चौपदरीकरण काम करताना ठिकठिकाणी ओएफसी केबल तुटण्याचे प्रकार होत आहेत. यात बीएसएनएल कंपनीची ओएफसी लाइन तुटल्याने गेले दोन दिवस बीएसएनएलची लॅण्डलाईन आणि मोबाईल सेवा बंद आहे. याखेरीज बॅंकिंग व्यवहार देखील नेट नसल्याने बंद राहिले आहेत.

सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. यात खते, शेती अवजारे आदींच्या खरेदीसाठी शेतकरी तालुक्‍याच्या ठिकाणी येत आहेत. मात्र बॅंकेची यंत्रणाच ठप्प झाल्याने वस्तूंची खरेदी न करताच त्यांना माघारी परतावे लागत आहे. सर्वच शासकीय निमशासकीय आणि खासगी संस्थांमधील कर्मचाऱ्यांचे पगार देखील ऑनलाइन स्वरूपात होतात. या ग्राहकांनाही सध्या काही खरेदी करता येत नसल्याचे चित्र आहे.

बॅंकांमधून पैसे काढता येत नसल्याने बाजारपेठांतील उलाढाल देखील मंदावली आले. चहा टपरी ते मोठ्या व्यावसायिकांनाही नेट बंद असल्याचा फटका सहन करावा लागत आहे. नोटा बंदीनंतर केंद्र सरकारने डिजिटल व्यवहाराला प्राधान्य दिले होते. मात्र डिजिटल व्यवहारातील पैसे व्यावसायिकांच्या खात्यात वेळेत जमा न होण्याचे प्रकार होऊ लागल्याने अनेक दुकानदार, व्यावसायिकांनी आपल्याकडील एटीएम द्वारे चलन स्वीकारण्याची यंत्रे बंद केली आहेत.

किती हेलपाटे मारायचे
बीएसएनएलची दूरसंचार सेवा सातत्याने विस्कळीत होतेय. यात एटीएम आणि बॅंकांतील व्यवहार ठप्प होत आहेत. शेती अवजारे आणि जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी आम्ही शहरात येतो. मात्र नेट कनेक्‍टिव्ही बंद असल्याने पैसेच काढता येत नाही. त्यासाठी किती हेलपाटे मारायचे.

- विष्णू चव्हाण, शेतकरी, तिवरे

Web Title: Sindhudurg News problems in money transaction