कुडाळात दुय्यम निबंधक कार्यालयासाठी प्रस्ताव द्यावा - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जुलै 2018

कुडाळ शहरात दुय्यम निबंधक कार्यालयाचा प्रस्ताव त्वरित सादर करण्याचे आदेश "महसूल'च्या प्रधान सचिवांना दिले आहेत. 

कुडाळ - तालुक्‍यासाठी प्रस्तावित दुय्यम निबंधक कार्यालय स्थापन झाले नसल्याने स्थानिक नागरिकांना दस्तऐवजांसाठी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ओरोस येथे जिल्हा निबंधक कार्यालयामध्ये जावे लागते. यामुळे नागरिकांच्या वेळेचा व पैशाचा अपव्यय होत आहे. त्यामुळे हे कार्यालय तालुक्‍याच्या मध्यवर्ती ठिकाणी कुडाळ शहरात व्हावे, अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी कुडाळ शहरात दुय्यम निबंधक कार्यालयाचा प्रस्ताव त्वरित सादर करण्याचे आदेश "महसूल'च्या प्रधान सचिवांना दिले आहेत. 

सिंधुदुर्ग जिल्हा निर्मिती झाल्यानंतर जिल्ह्याचे मुख्यालय हे कुडाळ तालुक्‍यातील ओरोस येथे स्थापन झाले आहे. यामुळे प्रमुख सर्व शासकीय कार्यालये जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ओरोस याठिकाणी आहेत. त्यामुळे जिल्हा निबंधक कार्यालय हेदेखील ओरोस येथे स्थापन झाले.

ओरोस जरी कुडाळ तालुक्‍यात येत असले तरी तालुक्‍याचे मध्यवर्ती ठिकाण कुडाळ शहर आहे. तालुक्‍यासाठी प्रस्तावित असलेले दुय्यम निबंधक कार्यालय स्थापन झालेले नसल्याने स्थानिक नागरिकांना दस्तऐवज करण्यासाठी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणीच जिल्हा निबंधक कार्यालयात जावे लागत आहे. यामुळे नागरिकांच्या वेळचा व पैशाचा अपव्यय होत आहे.

स्थापन न झालेले दुय्यम निबंधक कार्यालय तालुक्‍याच्या मध्यवर्ती ठिकाणी कुडाळ शहरात होणे गरजेचे असून यासाठी जागासुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांचा वेळचा होणार अपव्यय कमी करण्यासाठी कुडाळ तालुक्‍याचे दुय्यम निबंधक कार्यालय कुडाळमध्ये स्थापन करण्याची मागणी आमदार नाईक यांनी निवेदनाद्वारे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. 

Web Title: Sindhudurg News Proposal for the Office of the Sub-Registrar in Kudal