सावंतवाडीतील बंद प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्नशील -  राहूल इंगळे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

सावंतवाडी - पालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने शहरातील बंदावस्थेत असलेले प्रकल्प सुरू करण्यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत, असा दावा येथील नवनिर्वाचित मुख्याधिकारी राहूल इंगळे यांनी आज येथे केला.

सावंतवाडी - पालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने शहरातील बंदावस्थेत असलेले प्रकल्प सुरू करण्यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत, असा दावा येथील नवनिर्वाचित मुख्याधिकारी राहूल इंगळे यांनी आज येथे केला.

येथील मावळते मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार द्वासे यांना काल (ता.18) निरोप देण्यात आला. त्यानंतर श्री. इंगळे यांनी आज आपला कार्यभार स्विकारला. त्यांनी यापुर्वी भिवंडी पालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून काम केले आहे. स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून त्यांची त्याठिकाणी नेमणूक झाली होती. सद्यस्थितीत त्यांचे सहा महिन्याचे प्रशिक्षण बाकी आहे.
कार्यभार स्विकारल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आपण सर्वात आधी पदाधिकारी आणि प्रशासन यांच्याकडुन शहराची माहिती घेणार आहे आणि त्यानंतर कामाला सुरवात करण्यात येणार आहे. त्याच बरोबर शहरात कॉंक्रीटचे जंगल उभे राहू नये, यासाठी वसाहती उभारलेल्या ठिकाणी झाडे लावण्याची सक्ती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील बंद प्रकल्पाबाबत त्यांना माहिती दिली असता ते म्हणाले, ""पालिकेचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने माझे प्रयत्न आहेत. त्यासाठी बंदावस्थेत असलेले प्रकल्प सुरू करून त्यातून काही आर्थीक स्त्रोत कसे वाढविता येतील यादृष्टीने आपण चाचपणी घेणार आहे. त्यासाठी प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संधान साधणार आहे.''

नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी त्यांचे स्वागत केले. नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, शुभांगी सुकी, बाबू कुडतरकर, दीपक म्हापसेकर, देविदास आडारकर, बाबू पिंगुळकर आदी उपस्थित होते.

सुंदर सावंतवाडी स्वच्छ ठेवणार 
यावेळी श्री. इंगळे म्हणाले, ""मी भिवंडी सारख्या ठिकाणी काम केले आहे. पनवेल हे माझे जन्मस्थान आहे; परंतु याठिकाणी कार्यभार स्विकारल्यानंतर येथील वातावरण निसर्गरम्य आहे. सुंदर आहे. त्यामुळे स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून सावंतवाडी अधिक स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.''

Web Title: Sindhudurg News Rahul Ingale comment