नरेंद्र जंगल परिसरात जुगार अड्डयावर छापा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

सावंतवाडी - येथील नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी जंगल परिसरात तीनपत्ती जुगार खेळणाऱ्यांच्या टोळक्‍यावर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई केली. यात सुमारे साडेपाच लाखाच्या साहित्यासह तीस हजार रुपये रोख जप्त केले.

सावंतवाडी - येथील नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी जंगल परिसरात तीनपत्ती जुगार खेळणाऱ्यांच्या टोळक्‍यावर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई केली. यात सुमारे साडेपाच लाखाच्या साहित्यासह तीस हजार रुपये रोख जप्त केले. ही कारवाई काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. यात चौघांना ताब्यात घेतले तर अन्य चार ते पाच जण पळून जाण्यास यशस्वी झाले. 

हेमंत रंकाळे (वय 28), नेल्सन फर्नाडीस (वय 42), पवन बिद्रे (वय 24), महेश बांदेकर (वय 30) अशी चौघांची नावे आहेत. तात्काळ रात्री टेबल जामिनवर त्यांची मुक्तता झाली. 

याबाबत अधिक माहीती अशी - नरेंद्र डोंगर परिसरातील पालिकेच्या पाणी पुरवठा टाकीच्या शेजारी गेले अनेक दिवस तीनपत्ती नावाचा जुगार खेळला जात असल्याची माहीती अज्ञाताकडुन स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. यात पोलिसांची चाहूल लागताच चार ते पाच जण पळून गेले.

रंकाळे यांच्यासह चौघा जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले. छाप्या दरम्यान त्या ठिकाणी चार लाख रुपये किमतीची कार, चाळीस हजार रुपये किंमतीची दुचाकी, पंच्चेचाळीस हजार रुपये किमतीची दुचाकी, त्रेचाळीस हजार रुपयाचे चार मोबाईल, पट लावण्यासाठी घालण्यात आलेली चटई, पत्ते आदी सुमारे साडे पाच लाख रुपयाचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलिस निरिक्षक प्रल्हाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली हवालदार विजय तांबे, एस पी राणे, बी बी निवतकर, आर एन दळवी, जी. एस. आवळे यांनी केली. 

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या चौघांना येथील पोलिस ठाण्यात आणून टेबल जामीनवर त्यांची सुटका करण्यात आली. घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यानुसार पळून गेलेल्या अन्य संशयितांना पकडण्यात येणार आहे, असे पोलीस निरिक्षक सुनिल धनावडे यांनी सांगितले. 

Web Title: Sindhudurg News raid on gambling in Narendra Jungle area