राजमातांचे शैक्षणिक कार्य

डॉ. जी. ए. बुवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

सावंतवाडीच्या शैक्षणिक क्षेत्राला चालना देण्याचे कार्य सावंतवाडीच्या राजघराण्याने पिढ्यानपिढ्या जपले व जोपासले. हा वारसा राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांनी सक्षमपणे पेलला.

सावंतवाडीच्या शैक्षणिक क्षेत्राला चालना देण्याचे कार्य सावंतवाडीच्या राजघराण्याने पिढ्यानपिढ्या जपले व जोपासले. हा वारसा राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांनी सक्षमपणे पेलला.

पुण्यश्‍लोक पंचम खेमराज तथा बापूसाहेब महाराज यांनी आपल्या कालखंडात शिक्षण हा समाजविकासाचा पाया मानून शिक्षणाचा विविध स्तरावर ग्रामीण परिसरात, अगदी दुर्गम ठिकाणापर्यंत विकास केलाच, शिवाय व्यावसायिक शिक्षणाबरोबरच प्रौढ व महिला शिक्षणासही चालना दिली.

त्यांच्या पश्‍चात त्यांच्या पत्नी राजमाता पार्वतीदेवीसाहेब यांनी १९४४-४५ या कालखंडात सावंतवाडीत आर.पी.डी. कॉलेज तत्कालीन स्थितीच्या अडचणीमुळे बेळगावला हलवावे लागले आणि सावंतवाडी व परिसर पुन्हा उच्चशिक्षणाला पोरका झाला. ही खंत (कै.) शिवरामराजे भोसले यांच्या मनात सलत असल्यानेच त्यांनी १९६१ मध्ये पुण्यश्‍लोकांच्या स्मरणार्थ त्यांच्याच नावाने महाविद्यालय सुरू केले. अर्थात हे सोपे नव्हते. अनेक संघर्ष व अडचणीतून हे साध्य केले.

प्रत्यक्षात महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी (कै.) राजेसाहेब शिवरामराजे भोसले यांनी १८ ऑगस्ट १९५९ ला एक सदस्य समिती नेमली. यातून महाविद्यालयाच्या निर्मिती प्रक्रियेत राजमातांचा प्रत्यक्ष सहभाग झाला. महाविद्यालयाच्या निर्मितीसाठी सार्वजनिक विश्‍वस्त कायद्याअंतर्गत दक्षिण रत्नागिरी जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करताना विश्‍वस्त पदाची जबाबदारी राजमातांवर आली.

१९६१ मध्ये महाविद्यालय सुरू करण्यापूर्वी भविष्यातील वाढती विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन वर्गखोल्यांना व प्रयोगशाळेस फर्निचर करण्याची जबाबदारी राजमातांनी हिंडलगा येथे राहून अत्यंत दक्षतेने पार पाडली. त्यांनी तयार करून घेतलेले फर्निचर आजही चांगल्या स्थितीत आहे. याचबरोबर महाविद्यालयात येणाऱ्या ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांकरीता राजवाड्यात एक मोफत वसतीगृह सुरू केले. काही वर्षे हे उत्तमप्रकारे चालविले. यातून गोरगरीब घराण्यातील शेकडो विद्यार्थी घडले.

महाविद्यालय सुरू झाले. एक प्रकारे केवळ दुरूनच विकास पावणाऱ्या या संस्थेवर राजमाता लक्ष ठेवून होत्या. विकासाच्या पार्श्‍वभूमीवर संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाच्या कार्याध्यक्षापदाची जबाबदारी १९८० मध्ये राजमातांच्यावर येऊन पडली.

पुढे १३ जुलै १९९५ ला राजेसाहेबांचा स्वर्गवास झाला. राजमातांवर झालेला हा सर्वांत मोठा आघात होता. कुटुंबाची जबाबदारी, संस्था आणि कला व्यवसायांची जबाबदारी राजमातांवर पडली. आपल्या सर्व सहकाऱ्यांना, महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी या सर्वांनाच विश्‍वासात घेऊन महाविद्यालयाला आणखी मोठे रूप दिले. आज महाविद्यालयाचे के.जी टू पी.जी चे स्वरूप याचे श्रेय राजमातांच्या कुशल नेतृत्वाला जाते.

Web Title: Sindhudurg News Rajmata Satvashiladevi special