मालवणातील शासकीय कार्यालयात महिला कर्मचाऱ्याशी असभ्य वर्तन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

मालवण - शहरातील एका शासकीय कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याशी त्याच कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने असभ्य वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याने खळबळ उडाली आहे.

मालवण - शहरातील एका शासकीय कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याशी त्याच कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने असभ्य वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याने खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेने येथील पोलिस ठाण्यात न्यायासाठी धाव घेतली. ज्याच्या विरोधात तक्रार करायची होती, तोच तेथे होता. त्याच्याच समोर पोलिसांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. त्यामुळे संबंधित महिलेने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दिली आहे.

दरम्यान, पोलिस ठाण्यात मिळालेल्या वागणुकीच्या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

महिला कर्मचारी कार्यरत असलेल्या ठिकाणीच हा कर्मचारी कार्यरत आहे. महिलेला मुद्दामहून अडगळीच्या ठिकाणी कामाला पाठविणे, पाठीमागून येऊन धक्‍का देणे, काम करीत असताना पायावर पाय देणे अशाप्रकारच्या अनेक गोष्टी नेहमीच सुरू होत्या. याबाबत संबंधित महिलेने आपल्या कार्यालयातील प्रमुख अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला बोलावून तोंडी ताकीद दिली होती. त्यानंतरही तो कर्मचारी असभ्य वर्तन करीतच होता. त्यामुळे तिने पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा निर्णय घेतला, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. 

तक्रारीत म्हटले आहे, की वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे असभ्य वर्तणुकीबाबत अनेकदा तक्रार देऊनही संबंधित कर्मचारी आपल्या वर्तनात बदल करत नव्हता. जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना याची कल्पना देण्यासाठी महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेतली. असे असतानाही स्थानिक कार्यालयप्रमुखाकडून संबंधित महिलेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

यात विनापरवानगी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी गेल्याबद्दल शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, याचा खुलासा करण्यात यावा किंवा आपल्यावर योग्य ती प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे असभ्य वर्तनाबाबत संबंधित कर्मचाऱ्याला कोणतीही नोटीस किंवा त्याच्यावर कारवाई न करता महिलेलाच नोटीस बजावण्यात आल्याने संबंधित महिलेने याबाबत वरिष्ठांचे लक्ष वेधले आहे.

Web Title: Sindhudurg News rude behavior with women employees in government office