केसरकरांच्या पराभवाचा ईश्‍वरी संकेत - सतीश सावंत

केसरकरांच्या पराभवाचा ईश्‍वरी संकेत - सतीश सावंत

कणकवली - ग्रामपंचायत निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघात शिवसेनेचे यश पाहता पालकमंत्री दीपक केसरकर यांचा पराभव पुढील विधानसभा निवडणुकीत होणार असल्याचे ईश्‍वरी संकेत लोकशाहीने दिले आहेत. तांत्रिक मांत्रिकांवर विश्‍वास ठेवणाऱ्या केसरकरांना घोषणांपलीकडे गेल्या तीन वर्षांत कोणताही विकास जमलेला नाही. केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी नारायण राणेंवर टीका करण्याची पोपटपंची त्यांनी थांबवावी, अशी प्रतिटीका जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेतून केली. 

महाराष्ट स्वाभिमान पक्षाच्या येथील जिल्हा कार्यालयात पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, महामार्ग संघर्ष समितीचे अध्यक्ष शरद कर्ले आदी उपस्थित होते.

श्री. सावंत म्हणाले, ‘‘ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला अपयश आल्यामुळे केसरकर या ईश्‍वरी संकेताबाबत बोलत आहे तो लोकशाहीने दिला आहे. सत्तेच्या तीन वर्षांच्या कालावधीत एकही विकासाचे काम झालेले नाही. जून २०१७ मध्ये विमानतळ पूर्ण होईल, फुलपाखरू गार्डन, सी-वर्ल्डबाबत दिलेले आश्‍वासन आणि आंबोली रस्ता याबाबतची घोषणा पोकळ ठरली आहे. चांदा ते बांदा या योजनेसाठी आतापर्यंत ५८ बैठका झाल्या. त्यामुळे घोषणा बंद करून विकासाचा आढावा घ्या. घोषणा करून जनतेची दिशाभूल करण्याची पोपटपंची थांबवावी.’’ 

ते म्हणाले, ‘‘निवडणूक कालावधीत आपल्या गाडीत तांत्रिक बाबा बसून लोकांना प्रसाद वाटतात. सोबतचे कार्यकर्ते तो प्रसाद घेत नाहीत. अशा तांत्रिक मांत्रिकावर विश्‍वास ठेवणाऱ्या केसरकर यांनी त्या बाबांकडून तरी विकासाचा ईश्‍वरी संकेत समजून घ्यावा. मुळात त्यांच्याकडे धमकच नाही. विकास करण्यासाठी राजकीय ताकद लागते. तुम्हाला राणेंची ताकद काय आहे हे काही दिवसात दिसेलच, वाटल्यास मुख्यमंत्र्यांना विचारा. शिवसेनेकडून मंत्रिपद मिळविण्यासाठी राणे विरोधात भूमिका घेणे हा एककलमी कार्यक्रम केसरकरांचा आहे. त्यामुळे केवळ राणे द्वेष करून विकास होणार नाही. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी दहा तारखा दिल्या. ठेकेदारांना काळ्या यादीत टाकू असे सांगितले. मुळात ग्रामपंचायतीच्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा अधिकार केसरकरांना नाही. खड्डे बुजविता येत नसतील तर दर दोन किलोमीटरवर वेदनाशमक मलम मिळेल अशी दुकाने थाटा. जिल्हा नियोजनाच्या १३० कोटी पैकी ३० कोटी रुपये मुख्यमंत्री सडकसाठी वर्ग झाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेला निधीच मिळणार नाही.’’ 

केसरकरांचा हात अपशकुनी 
जिल्ह्यातील ५८५ शेतकऱ्यांसाठी एक कोटी ६५ लाख रुपये कर्जमाफीची रक्कम बॅंकेत जमा झाली. मात्र, ज्या २० शेतकरी जोडप्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र आणि साडीचोळी, शर्टपीस देऊन पालकमंत्री केसरकर यांनी सत्कार केला. अशाच दांपत्यांचे पैसे जमा झालेले नाहीत. त्यांचा हातगुण अपशकुनी आहे. ज्यांचा सत्कार केला जातो त्यांची कर्जाची रक्कम मिळत नाही यावरून केसरकरांची प्रशासनावरील वचक लक्षात येईल, असेही श्री. सावंत म्हणाले.  

राऊत, नाईकांचा जनाधार संपला 
खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक हे सत्तेत आहेत. नारायण राणेंचा जनाधार संपला असे श्री. राऊत म्हणतात त्यांनी निकाल पाहिले तर सावंतवाडी मतदारसंघात १०३ पैकी १५ ग्रामपंचायत शिवसेनेकडे, कुडाळ-मालवणमध्ये १०६ पैकी २६ आहेत. कणकवलीत नीतेश राणेंच्या मतदारसंघात १२० पैकी ८५ ग्रामपंचायती राणेंच्या विचारांच्या समर्थ विकास पॅनेलकडे आहेत. त्यामुळे सत्ता असूनही ताकद कोणाची कमी झाली हे राऊत, नाईक यांनी पाहावे. राणेंच्या विरोधात बोलणे एवढेच काम त्यांना बाकी आहे, अशी टीका सावंत यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com