देवबाग दुभंगण्याची भीती 

प्रशांत हिंदळेकर
सोमवार, 30 जुलै 2018

निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेले देवबाग गाव समुद्री उधाणाच्या तडाख्यात सापडले आहे. समुद्राच्या अजस्र लाटांचे पाणी बंधारा उद्‌ध्वस्त करून वस्तीत घुसू लागल्याने गावचे दोन तुकडे होण्याची भीती निर्माण झाली आहे.

निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेले देवबाग गाव समुद्री उधाणाच्या तडाख्यात सापडले आहे. समुद्राच्या अजस्र लाटांचे पाणी बंधारा उद्‌ध्वस्त करून वस्तीत घुसू लागल्याने गावचे दोन तुकडे होण्याची भीती निर्माण झाली आहे.

ग्लोबल वॉर्मिग, समुद्री पाण्याच्या पातळीत झालेली वाढ यासह अन्य समस्यांमुळे देवबागचे अस्तित्वच धोक्‍यात आले आहे. त्यामुळे पर्यटन नकाशावर झळकलेले हे गाव वाचविण्यासाठी शासनस्तरावर ठोस उपायांची गरज आहे.

भुरळ पाडणारे देवबाग 
देवबाग गाव निसर्गसौंदर्याने नटले आहे. एका बाजूला खाडी आणि दुसऱ्या बाजूला समुद्र अशा कात्रीत सापडलेले हे गाव गेल्या काही वर्षात पर्यटनदृष्ट्या विकसित होत आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून प्रगती साधत असलेल्या या देवबागास पावसाळ्यात समुद्री उधाणाच्या तडाख्याचा सामना करावा लागत आहे. गेल्या पंधरवड्यात अतिवृष्टीसह समुद्री उधाणाचा जोर अचानक वाढल्याने देवबाग भांजीवाडीसह अन्य किनारपट्टी भागात लाटांचे पाणी घुसले. त्यामुळे ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन वास्तव्य करावे लागले. 

वाचवण्याचे प्रयत्न 
नारायण राणेंच्या काळात 1994 मध्ये देवबागच्या किनारपट्टी भागात संरक्षक बंधारा बांधण्यात आला. सागरी अतिक्रमणापासून देवबागचे संरक्षण व्हावे, यासाठी पावणे तीन किलोमीटरचा संरक्षक बंधारा उभारण्यात आला. त्यानंतरच्या काळात देवबाग साळगावकरवाडी भागात समुद्री लाटांचे पाणी घुसू लागल्याने तत्कालीन आमदार परशुराम उपरकर यांच्या फंडातून बंधारा घालण्यात आला. देवबाग मोबारवाडी येथील संगम पॉइंट येथे मोठ्या प्रमाणात धूप होत असल्याने तेथे धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची मागणी ग्रामस्थांनी केली. त्यानुसार क वर्ग पर्यटन निधीतून आठशे मीटरचा जिओ ट्यूबचा बंधारा घालण्यात आला. जिओ ट्यूबच्या बंधाऱ्यामुळे मोबारवाडीतील धूप थांबून तेथील घरांचा धोका टळला. 

पुन्हा आक्रमण 
गेल्या तीन चार वर्षात पुन्हा देवबाग किनाऱ्यास समुद्री उधाणाच्या लाटांचा तडाखा बसण्यास सुरवात झाली. यात किनाऱ्यावरील बंधारे उद्‌ध्वस्त करून समुद्री लाटांचे पाणी थेट वस्तीत घुसू लागले. या भागात असलेल्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची डागडुजी करणे अत्यावश्‍यक असताना शासनाकडून कोणतेही प्रयत्न झाले नाही. परिणामी यावर्षीच्या पावसाळ्यात सागरी उधाणाच्या जबरदस्त तडाखा देवबाग गावास बसला. भांजीवाडी, मोबारवाडीसह अन्य भागात उधाणाच्या लाटांच्या पाण्याने बंधारा उद्‌ध्वस्त केल्याने देवबागचे दोन तुकडे होण्याची भीती निर्माण झाली आहे. 

हतबलतेतून संघर्षाकडे 
सागरी उधाणाच्या लाटांच्या तडाख्यातून देवबागचे संरक्षण व्हावे यासाठी शासन स्तरावरून कोणतेही प्रयत्न होत नसल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांसह सर्व पक्षीयांनी एकत्र येत संघर्ष समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या माध्यमातून खाडी, समुद्राच्या बाजूने संरक्षक बंधारा होण्यासाठी लढा उभारण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या देवबागच्या संरक्षणासाठी शासनाला जाग आणण्यासाठी तीव्र लढा उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

देवबाग गावच्या संरक्षणासाठी खाडी, समुद्राच्या बाजूने संरक्षक बंधारा व्हावा यासाठी 220 कोटी रुपयांचा आराखडा बनविला आहे. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून या बंधाऱ्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पर्यटनदृष्ट्या विकसित होत असलेल्या देवबागचे अस्तित्व टिकविणे आवश्‍यक असून, त्यादृष्टीने आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे.
- हरी खोबरेकर,
 जिल्हा परिषद सदस्य 

सागरी उधाणामुळे लाटांच्या तडाख्यात किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. समुद्र किनाऱ्याची धूप होऊन ती मोठ्या प्रमाणात खाडीपात्रात जमा होते. खाडीतील पाण्याची पातळी कमी होऊन खाडी व समुद्राचे पाणी वस्तीत घुसून जीवितहानी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे खाडी व समुद्र संगमाच्या ठिकाणी ब्रेक वॉटर बंधारा झाल्यास गावचे तिन्ही बाजूने संरक्षण होण्यास मदत मिळेल त्यादृष्टीने शासन स्तरावरून प्रयत्न व्हायला हवेत.
- राजन कुमठेकर,
 स्थानिक ग्रामस्थ 

Web Title: Sindhudurg News Sea waves affects Devbag