सौंदाळेतील भ्रष्टाचार प्रकरणी 26 पासून उपोषणाचा इशारा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

सिंधुदुर्गनगरी - ग्रामपंचायतीच्या विविध योजनांमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या सौंदाळे (ता. देवगड) ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचांना पाठिशी घालणाऱ्या देवगड गटविकास अधिकारी यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी सौंदाळे ग्रामस्थ 26 पासून जिल्हा परिषद भवनासमोर बेमुदत उपोषणास बसणार आहेत.

सिंधुदुर्गनगरी - ग्रामपंचायतीच्या विविध योजनांमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या सौंदाळे (ता. देवगड) ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचांना पाठिशी घालणाऱ्या देवगड गटविकास अधिकारी यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी सौंदाळे ग्रामस्थ 26 पासून जिल्हा परिषद भवनासमोर बेमुदत उपोषणास बसणार आहेत.

कारवाई न झाल्यास आत्मदहन केले जाणार असल्याचा इशाराही या ग्रामस्थांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. 

याबाबतचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना दिले. यावेळी दत्तात्रय मिठबावकर, प्रवीण मुळव, मच्छिंद्र मुळव आदी सौंदाळे ग्रामस्थ उपस्थित होते. यात असे नमूद आहे की, सौंदाळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंचांनी ग्रामपंचायतीच्या विविध योजनांमध्ये भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, यासाठी अनेक वेळा देवगड गटविकास अधिकारी यांना निवेदने देण्यात आली. त्याची दखल घेतली न गेल्याने 28 डिसेंबर 2017 ला देवगड पंचायत समिती समोर उपोषण केले होते.

26 जानेवारीला उपोषण केले जाणार असल्याचा इशारा दिला होता. यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन देत 26 जानेवारीचे उपोषण स्थगित करण्याची विनंती केली होती. त्यानुसार हे उपोषण स्थगित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे देवगड गटविकास अधिकारी यांनी केलेल्या चौकशीत सौंदाळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दोषी आढळले आहेत; मात्र असे असतानाही देवगड गटविकास अधिकारी संबंधितांना पाठिशी घालत आहेत. झालेला भ्रष्टाचार लपविण्याचा प्रकार करीत असल्याचा आरोप करत देवगड गटविकास अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी 26 पासून जिल्हा परिषद भवनासमोर बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा सौंदाळे ग्रामस्थांनी दिला आहे. 

Web Title: Sindhudurg News Soudale corruption issue