सिंधुदुर्गात ढिसाळ नियोजनामुळे क्रीडा स्पर्धा रद्द

सिंधुदुर्गात ढिसाळ नियोजनामुळे क्रीडा स्पर्धा रद्द

सिंधुदुर्गनगरी - जिल्हा क्रीडा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे शालेय मैदानी स्पर्धा रद्द करण्याची वेळ जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेवर आली. पंचांचा अभाव, मैदानात वाढलेले गवत आणि मुसळधार पावसामुळे झालेल्या चिखलात स्पर्धा कशा घ्यायच्या या संघटनेच्या सवालालाही क्रीडाधिकाऱ्यांकडे उत्तर नव्हते. अखेर जिल्ह्याभरातील खेळाडूंना स्पर्धेविना माघारी फिरावे लागले. त्यांना आर्थिक भुर्दंडही सोसावा लागला. क्रीडा विभागाच्या अनागोंदीमुळेच ही स्थिती ओढवण्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष अजय शिंदे यांनी केला.

जिल्हा क्रीडा विभागामार्फत येथील क्रीडा संकुलामध्ये आज जिल्हास्तरीय शालेय स्पर्धांचे आयोजन केले होते; मात्र या स्पर्धेसाठीचे कोणतेही नियोजन क्रीडा विभागाकडून केलेले नव्हते. वाढलेले गवत आणि संततधार पावसामुळे क्रीडांगणावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. क्रीडा संकुलाच्या सभागृहाचे पत्रेही तुटून गेल्याने सभागृहात पाणी साचले होते. यामुळे विद्यार्थी खेळाडूंची गैरसोय निर्माण झाली आहे. शौचालयासह, ड्रेिसंग रूम आणि सभागृहात अस्वच्छता आहे. खेळाडूंना येथे थांबणेही अवघड बनले. विविध मैदानी स्पर्धा येथे आयोजित केल्या; मात्र एकाही क्रीडा प्रकारासाठी क्रीडांगण सुस्थितीत नव्हते. खेळाडूंना कोणतीही दुखापत अथवा अपघात घडल्यास याची जबाबदारीही शिक्षकांवर ढकलण्यात आली आहे.

जिल्ह्याचा क्रीडा विभाग कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार नाही, मग अशा धोकादायक स्थितीत स्पर्धा कशा घ्यायच्या अशा संभ्रमात पडलेल्या शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांची भेट घेतली व त्यांना जाब विचारला; मात्र त्यांनीही याची कोणतीही दखल घेतली नाही. स्पर्धांच्या तारखा निश्‍चित असून, त्यानंतर विभागीय स्पर्धा होणार असल्याचे स्पष्ट केले; मात्र संततधार कोसळणारा पाऊस आणि स्पर्धांसाठी खेळाडूंना कोणतीही सुरक्षितता नाही, याचा विचार करून या स्पर्धा न खेळवण्याचा निर्णय क्रीडाशिक्षक संघटनेने घेतला.

क्रीडा विभागाकडून या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी दामदुप्पट फी आकारली जाते; मात्र खेळाडूंना कोणत्याही सुविधा नाहीत किंवा सुरक्षितता नाही. जिल्हा क्रीडा विभागाचा अनागोंदी कारभार सुरू आहे. त्याकडे येथील लोकप्रतिनिधीही दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे येथील खेळाडूंचे नुकसान होत असल्याचा आरोप संघटनेने या वेळी केला. दरम्यान, जिल्ह्यात संततधार पडणारा पाऊस आणि स्पर्धा घेण्यात येत असलेल्या अडचणी लक्षात घेता या स्पर्धा आता २३ व २५ सप्टेंबरला घेण्याचे जाहीर केले आहे.

क्रीडा संकुल समस्यांच्या विळख्यात
येथील क्रीडा संकुलाच्या सभागृहाचे पत्रे तुटले आहेत. त्यामुळे सभागृहातही पाणीच पाणी झाले आहे. तसेच क्रीडांगणाची स्वच्छता नाही, गवत वाढले आहे. पावसामुळे चिखल झाला आहे. क्रीडा विभागाला शासनाचा लाखो रुपये निधी उपलब्ध होत असताना आणि शाळांकडूनही स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी भरमसाट फी आकारली जात आहे, असे असतानाही सुविधा निर्माण करण्यासाठी क्रीडा विभागाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही.

प्रवास खर्च वाया
आजच्या स्पर्धांसाठी जिल्हाभरातून विद्यार्थी भाड्याची वाहने घेऊन स्वखर्चाने आले होते; मात्र मुसळधार पाऊस आणि क्रीडा विभागाच्या अनागोंदी नियोजनशून्य कारभारामुळे आज स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे खेळाडू विद्यार्थ्यांना अखेर माघारी फिरावे लागले. प्रवास खर्च वाया जाऊन नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागला.

पंचांशिवाय स्पर्धा होणार कशी?
आजच्या स्पर्धेसाठी क्रीडा विभागाकडून कोणतेही पंच नियुक्त केले नसल्याचेही या वेळी उघड झाले. त्यामुळे क्रीडा विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला. येथील लोकप्रतिनिधी येथील खेळाडू राज्यात चमकले पाहिजेत, असे वक्तव्य केवळ भाषणांतूनच करत आहेत; मात्र खेळाडूंना मिळणाऱ्या सुविधांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com