विडंबन न थांबवल्यास भजनबारी बंद करण्याचा दशावतार मंडळाचा इशारा

मालवण - सिंधुदुर्ग जिल्हा दशावतार लोकनाट्य मंडळाच्यावतीने भालचंद्र केळुसकर यांना निवेदन देताना बाळा सावंत, सुहास माळकर, संतोष सामंत आदी
मालवण - सिंधुदुर्ग जिल्हा दशावतार लोकनाट्य मंडळाच्यावतीने भालचंद्र केळुसकर यांना निवेदन देताना बाळा सावंत, सुहास माळकर, संतोष सामंत आदी

मालवण - दशावतार ही कोकणची लोककला आहे. या कलेचे डबलबारी भजनांमध्ये काही बुवांद्वारे नको त्या पद्धतीने भजन रसिकांसमोर सादरीकरण करून विडंबन केले जाते. ते रोखण्यासाठी तसेच अशा बुवांना योग्य तो समज देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा दशावतार लोकनाट्य मंडळाच्या वतीने जिल्हा भजन संघटनेचे अध्यक्ष भालचंद्र केळुसकर यांना निवेदन देण्यात आले. 

दशावतार कलेचे विडंबन रोखले न गेल्यास ज्याठिकाणी डबलबारी भजनाच्या वेळी दशावतार सादर करण्यात येत असेल तेथे जाऊन भजनबारी बंद करण्यात येईल, असा इशाराही दशावतारी कलावंतांनी यावेळी दिला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा दशावतार लोककला मंडळाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ दशावतारी कलाकार बाळा सावंत, सुहास माळकर, दिलीप मेस्त्री, संतोष सामंत, दत्तप्रसाद शेणई, शिवप्रसाद मेस्त्री, उमेश मेस्त्री, भाई मांजरेकर, वैभव मांजरेकर आदी उपस्थित होते. 

दशावतार ही लोककला कोकण, महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही सादर केली जाते. मात्र, अलीकडच्या काही वर्षांत या लोककलेचे दुरंगी, तिरंगी डबलबारी भजनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विडंबन सुरू आहे. काही बुवा लोकांचे मनोरंजन होण्यासाठी दशावतार कलेतील पात्रांप्रमाणे मुखवटा लावून नृत्य करतात. तर दशावतारातील अभंग डबलबारीमध्ये सादर करतात हे कितपत योग्य आहे? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला आहे. याला काही प्रमाणात आयोजकही तेवढेच जबाबदार असतात. आयोजकांनीही डबलबारीत दशावतार सादर करणाऱ्या बुवांना विरोध करावा. सध्या नवीन पिढीमध्येही वैचारिक पातळी खालावल्यामुळे अशा बुवांना प्रोत्साहन मिळते अशी टीका करत अशा बुवांना भजन रसिकांनी प्रोत्साहन देऊ नये. आणि जर कोणत्याही भजन मंडळाच्या बुवाने असा प्रयत्न केल्यास त्याला तिथेच योग्य तो धडा शिकवला पाहिजे, असेही आवाहन दशावतार कलाकारांनी केले आहे. 

दशावतार या कलेचा प्रचार आणि प्रसार लोकांमध्ये करण्यासाठी आम्ही तत्पर असताना तुम्ही त्या कलेची वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर सादरीकरण का करता? असा सवाल उपस्थित करण्यात आला. यापुढे कुठेही भजनबारीत दशावताराचे विडंबन केले गेल्यास ते सहन करणार नाही. अशा बुवा आणि आयोजकांवर योग्यती कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com