जैतापूरसाठी नारायण राणेंनी घातल्या होत्या पायघड्या - सुभाष देसाई

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

कुडाळ - ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला आमचा विरोधच आहे. नारायण राणे आता या प्रकल्पाला विरोध करतात. त्यावेळी जैतापूर प्रकल्प आणण्यासाठी त्यांनी पायघड्या घातल्या होत्या, अशी टीका शिवसेना नेते तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात केली.

कुडाळ - ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला आमचा विरोधच आहे. नारायण राणे आता या प्रकल्पाला विरोध करतात. त्यावेळी जैतापूर प्रकल्प आणण्यासाठी त्यांनी पायघड्या घातल्या होत्या, अशी टीका शिवसेना नेते तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात केली.

दरम्यान भाजपचे आजचे नेते शिवसेनेला पाण्यात पाहणारे आहेत. त्यामुळे भविष्यात शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढविणार. तुम्ही सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.

शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिकांचा मेळावा येथील महालक्ष्मी सभागृहात श्री. देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, भाई गोवेकर, विक्रांत सावंत, नागेंद्र परब, राजन जाधव, जान्हवी सावंत, वर्षा कुडाळकर, राजन नाईक, बाळू परब, हरी खोळरेकर, महेश कांदळगावकर, संतोष शिरसाट, संजय पडते, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. 

देसाई म्हणाले, ‘‘शिवसेना ही जनतेसाठी आहे. कोकणात कोणत्याही परिस्थितीत रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही. शिवसेनेचा विरोधच राहील. नारायण राणे यांनी रिफायनरीला विरोध केला आहे. मात्र यापूर्वी जैतापूर येथे होणाऱ्या प्रकल्पाचे त्यांनी स्वागत केले होते. असा टोला लगावला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा त्यांनी अपमान केला. हा अपमान एकही शिवसैनिक विसरणार नाही. एकवेळ आम्ही आमचा अपमान विसरू.’’

बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपला नेहमीच सन्मान दिला; मात्र आजचे भाजपचे नेते शिवसेनेला पाण्यात पाहण्याचे काम करीत आहेत. भविष्यात कोणाबरोबर आमची युती असणार नाही. आगामी निवडणुका या स्वबळावर लढविल्या जातील. आतापासून २०१९ च्या निवडणुकांची तयारी करा, असे आवाहन केले. राज्यात भगवा फडकविण्याचा निर्धार करा. त्याप्रमाणे जिल्ह्यात कामाला लागा. राजकारणात काहींचा जिल्ह्यात रिव्हर्स गिअर पडला आहे, असा टोलाही त्यांनी नारायण राणेंना लगावला.

पालकमंत्री केसरकर म्हणाले, ‘‘काहीजण विकासकामांचे फुकटचे श्रेय लाटण्याचे प्रयत्न करीत आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून झालेली कामे जनतेपर्यंत पोचविण्याचे काम तुम्ही करा. शिवसेना संघटनात्मक काम करणारा एकमेव पक्ष आहे. भविष्यात मी प्रत्येक तालुक्‍यात महिन्याला एक दिवस देणार. काही शासकीय अधिकारी राजाप्रमाणे वागत आहेत. त्यांची गय केली जाणार नाही. लवकरच एका अधिकाऱ्याची बदली करणार आहे.’’

आमदार वैभव नाईक म्हणाले, कोकणचा भाग यापुढे सुभाष देसाई यांच्याकडे असेल. येथील सर्व जागा या त्यांच्या नेतृत्वाखाली जिंकण्याचा आपण निर्धार करूया. शिवसेनेला संपवू पाहणाऱ्यांना शिवसैनिकांनी घरी बसविण्याचे काम केले आहे. पालकमंत्री दीपक केसरकर हे भविष्यात संघटनावादी म्हणून सातत्याने आपल्यासोबत असतील. भविष्यात शिवसेनेची सत्ता येण्यासाठी सर्वांनी जोरदार प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

Web Title: Sindhudurg News Subhash Desai comment