जिल्हा विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही - सुधीर मुनगंटीवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

सावंतवाडी - ‘‘तुम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी निधी मागा मी द्यायला तयार असून, जिल्ह्याच्या विकासासाठी कोठेही निधी कमी पडू देणार नाही. जिल्ह्यात शतप्रतिशत भाजपला साथ द्या,’’ अशी ग्वाही येथे अर्थमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिली.

सावंतवाडी - ‘‘तुम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी निधी मागा मी द्यायला तयार असून, जिल्ह्याच्या विकासासाठी कोठेही निधी कमी पडू देणार नाही. जिल्ह्यात शतप्रतिशत भाजपला साथ द्या,’’ अशी ग्वाही येथे अर्थमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिली. येथील राजवाडा परिसरात आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्याच्या उद्‌घाटनावेळी ते बोलत होते.

या वेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, भाजप प्रदेश सरचिटणीस राजन तेली, भाजप प्रवक्ते काका कुडाळकर, माजी आमदार अजित गोगटे, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, तालुकाध्यक्ष महेश सारंग, सुधीर दळवी, बाबू देसाई, अन्नपूर्णा कोरगावकर, राजन गिरप, शहराध्यक्ष संजू शिरोडकर, राजन म्हापसेकर, मंदार कल्याणकर व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 ‘‘मी चंद्रपूर म्हणजे चांद्याचा आहे. या जिल्ह्याचे टोक म्हणजे बांदा तेथे सरपंचही भाजपचा आहे. चांदा ते बांदा सर्व भाग हा भाजपमय करून टाकू. कार्यकर्त्यांमुळेच आज भाजपची सत्ता आहे. फक्त सत्ता येणे हे ध्येय नाही, लोकसभेची खुर्ची हे ध्येय नाही, तर गरिबांच्या मनात स्थान निर्माण करणे, हे महत्त्वाचे आहे आणि ही  जबाबदारी घेऊन सर्व कार्यकर्त्यांनी काम करायचे आहे. जनतेच्या आशीर्वादाने हे सरकार आहे. या जिल्ह्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी मी जातीने लक्ष देईन.’’

-  सुधीर मुनगंटीवार

ते पुढे म्हणाले, ‘‘चंद्रपुरात ४८ टक्के, तर सिंधुदुर्गात ४५ टक्‍केवर जंगल आहे. पर्यावरणाचे शोषण केले ते मोठे झाले आणि रक्षण केले  ते मागे राहिले. लोकांना ताटात अन्न राहायला घर देऊ शकत नसलो तर असले सरकार काय कामाचे असते. बचत गटासाठी शासनाने ७५ कोटी रुपये दिले आहेत. त्याचा फायदा होणे आवश्‍यक आहे. ज्या ज्या योजना आहेत, त्या लोकांपर्यंत पोचविण्याचे काम भाजप कार्यकर्त्यांनी केले पाहिजे. या सरकारच्या माध्यमातून रोजगारालाही अच्छे दिन येणार आहेत. मोदींच्या माध्यमातून १० कोटी रुपये उपलब्ध होणार असून, त्याचा ५० लक्ष नागरिकांना फायदा होणार आहे. जिल्ह्यात आरोग्याची समस्या लक्षात घेता त्यासाठीही लवकरच प्रयत्न करू.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘ज्यांनी लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न केला ते आता निषेध रॅली काढून ढोंगीपणा करताहेत. तिजोरीवर दरोडे टाकून आता भाजपपासून सावध राहायचा सल्ला देत आहेत. १५ वर्षे सत्तेत राहून यांना विकास जमला नाही. म्हणून आता संविधान मोर्चे काढत आहेत; मात्र आपण ध्येय घेऊन काम करून विकास करायचा आहे. विषमता दूर करायची असेल तर मोदीजींना पुन्हा निवडून द्यावे.’’

‘गोमेकॉ’ उपचारासाठी सकारात्मक निर्णय
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना गोवा बांबुळीतील ‘गोमेकॉ’ रुग्णालयातील सर्व सुविधा मोफत मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आपणासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोव्याच्या आरोग्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करणार आहोत. जिल्ह्याच्या आरोग्याबाबत नक्कीच सकारात्मक निर्णय होणार, असेही मंत्री मुनगंटीवार म्हणाले.

राज्यात गॅस सिलिंडरच्या बाबतीत ४ जिल्ह्यांचे वेगळे मॉडेल आणले आहे. यात सिंधुदुर्गाचाही सामावेश असून, जिल्ह्यात आता कोठेही चूल फुंकताना महिला दिसणार नाहीत. प्रत्येक घरात गॅस शेगडी दिसेल. कितीही देव पाण्यात ठेवले तरी ईश्‍वराचा भाजपमागे असलेला आशीर्वाद मागे जाऊ शकत नाही. एकच भाजप असा पक्ष आहे, जो कार्यकर्त्याचा आहे.

आधी राज्याच्या तिजोरीत खडखडात होता; मात्र आता खणखणाट होत आहे. येत्या काळातील निवडणुकीत ३६० बूथवर ३ हजार ६५० झाशीच्या राणी बसणार आहेत. आम्ही जात धर्म मानत नाही फक्त माणूसकीचा धर्म मानतो. जनतेचा आशीर्वादाने कधीही हार होणार नाही. कोण किती दिवसांचा मंत्री आहे, हे महत्त्वाचे नसून आपल्या देशात कोण सुखी आहे, हा विचार करणे आवश्‍यक आहे. गावातील कार्यकर्ता जोडा आपोआपच एक आदर्श भारत निर्माण होईल. एकच संस्कृती टिकली पाहिजे, ती म्हणजे भारतीय. तुम्ही गरिबांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करा, असेही ते म्हणाले.’’

या वेळी श्री. तेली म्हणाले, ‘‘पालकमंत्री दीपक केसरकर पुरेसा निधी उपलब्ध करून देत नाहीत. त्यामुळे विकासात अडचण निर्माण होत आहे. जिल्ह्याला वेगळा निधी द्यावा. पर्यटनाचा विकास झाल्यास देशाची व राज्याला आर्थिक स्थिती सुधारेल. वर्षातून १ हजार कोटी दिल्यास त्याचा मोठा फायदा होईल.’’
श्री. जठार म्हणाले, ‘‘आपल्या रूपाने लक्ष्मीची पाऊले आज जिल्ह्यात आली असून, भविष्यात तेलीच्या रूपाने आमदार मिळेल. तिन्ही मतदारसंघाचे आमदारही भाजपचेच असतील. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला विविध प्रकारच्या प्रश्‍नांबाबत ऊर्जा दिली असून, येत्या काळात आम्ही जिल्ह्यासाठी हॉस्पिटल आणणार. तसेच आंबा, काजू, जमिनींना भाव मिळणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. भाजप सरकारमुळे अनेक प्रश्‍न मार्गी लागले आहेत.’’

जिल्ह्याचा विकास करण्यासाठी नारायण राणेंना मंत्रिमंडळात घ्यावे, असे मंगेश तळवणेकर यांनी सांगितले, तर पुढचा आमदार हा भाजपचा असून, जिल्ह्याच्या आरोग्याचा व वन्यप्राण्यांचा प्रश्‍न मार्गी लावावा, अशी मागणी श्री. सारंग यांनी केली. या वेळी भाजप सरपंच, उपसरपंच व कार्यकर्त्यांचा सत्कार श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg News Sudhir Mungantiwar comment