आंबोली घाट काँक्रिटचा होणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

सावंतवाडी -  वारंवार खराब होणारा आंबोली घाट आता काँक्रिटचा होणार आहे. या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्रस्तावित आहे. तूर्तास त्याठिकाणी चौपदरीकरणाचा मात्र कोणताही विचार नाही, अशी माहिती येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश बच्चे यांनी येथे दिली.

सावंतवाडी -  वारंवार खराब होणारा आंबोली घाट आता काँक्रिटचा होणार आहे. या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्रस्तावित आहे. तूर्तास त्याठिकाणी चौपदरीकरणाचा मात्र कोणताही विचार नाही, अशी माहिती येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश बच्चे यांनी येथे दिली.

घाटाला पर्याय असलेल्या केसरी-फणसवडे रस्त्याचे सर्वेक्षण झाले आहे. खासगी, सरकारी आणि वनजमीन किती हे ठरवून त्यांना भरपाई देण्याबाबतचे प्रस्ताव शासनाला सादर 
करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असेही बच्चे यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव राजीव गायकवाड यांनी आज येथे बैठक घेतली.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना श्री. बच्चे याबाबत म्हणाले, ‘‘बेळगाव-वेंगुर्ले महामार्ग चौपदरीकरण होणार आहे. येथून दोन नवे राष्ट्रीय महामार्ग जातील. तसे केंद्राकडून जाहीर झाले आहे. त्यासाठी साडेचारशे कोटी रुपये देण्यास तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. हे काम कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून होणार आहे; मात्र हे काम करीत असताना आजरा फाटा ते दाणोली फाटा या ठिकाणचा रस्ता हा दुपदरीच ठेवण्यात येणार आहे. वन विभागाच्या जमिनीचा अडसर असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे; मात्र हे काम करीत असताना संपूर्ण आंबोली घाटातला रस्ता हा काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.

पावसाळ्यात रस्ता खराब होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा रस्ता चौपदरीकरण होण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी सद्य:स्थिती लक्षात घेता त्याठिकाणी दुपदरीकरण होणार आहे.’’

ते म्हणाले, ‘‘आंबोली घाटाला पर्यायी ठरणाऱ्या केसरी-फणसवडे या रस्त्याच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. खासगी, सरकारी आणि वनसंज्ञा असलेली जमीन अशा तीन टप्प्यांत हे प्रस्ताव विभागले जाणार असून शासकीय आणि खासगी लोकांना भरपाई देण्यात येणार आहे. वनसंज्ञा असलेली पर्यायी जमीन मिळावी, यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. चौकुळ-कुंभवडे मार्गे तळकट या रस्ता आता येत्या काही दिवसांत सुरू होण्याची शक्‍यता आहे. तूर्तास त्या रस्त्याला वनजमीन तसेच अन्य कोणताही अडसर नाही. त्याचे अर्धे खडीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.’’

आंबोली घाटात सुरू असलेल्या खोदकामाबाबत विचारले असता बच्चे म्हणाले, ‘‘संबंधित काम करणाऱ्या कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे. खोदकाम केलेल्या ठिकाणी आठ इंच बांधकाम करण्यात यावे, अशी त्यांना अट घालण्यात आली होती. त्यानुसार काम सुरू आहे.’’

बेळगाव-रेडी मार्ग रिंगरोडला जोडणार
नियोजित बेळगाव-रेडी हा राष्ट्रीय महामार्ग भारतमाला योजनेतून होणार आहे. प्रस्तावित आराखड्यात तो दाणोली बांदा असा नेण्याचे ठरले होते; मात्र याच काळात सावंतवाडी पालिकेने शहराच्या बाहेरून ठेवलेल्या रिंगरोडचे आरक्षण लक्षात घेता पुढे आणून तो रिंगरोडला जोडण्यात यावा, असा प्रस्ताव आपण सादर केला होता. आता नव्याने घेण्यात येणाऱ्या नियोजनात तो स्वीकारण्यात येईल, अशी अपेक्षा आहे, असे श्री. बच्चे यांनी सांगितले.

Web Title: Sindhudurg News Suresh Bachhe comment on Amboli Ghat